...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
By विजय दर्डा | Updated: December 8, 2025 05:01 IST2025-12-08T04:51:03+5:302025-12-08T05:01:24+5:30
नव्या परिस्थितीत मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही लक्ष होते. दोघांनीही मैत्रीचा अर्थ स्पष्ट केला आहे.

...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
डॉ. विजय दर्डा
चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
'ज्या इमारतीचा पाया खोल आणि भक्कम, ती मजबूत असते. अशी इमारत वादळांची चिंता करत नाही' अशी एक जुनी म्हण आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी भारत-रशियातील सदाबहार मैत्रीच्या संदर्भात या म्हणीची आठवण करून दिली.
या भेटीनंतर नरेंद्र मोदी म्हणाले, ही मैत्री नवी आव्हाने स्वीकारायला तयार आहे.. तर दुसरीकडे पुतीन यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही परिस्थितीत रशिया भारताला निर्वेध इंधन पुरवठा करत राहील. दोघांचाही रोख सरळसरळ अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे होता.
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करू असा भरवसा नरेंद्र मोदी यांनी मला दिला आहे' असे डोनाल्ड ट्रम्प गेले काही दिवस पुनः पुन्हा सांगत आणि रशियाशी मैत्री थोडी पातळ होईल किंवा कसे? - अशी चर्चा सुरू झाल्यावर मी नेहमी सांगत आलो, अहिंसा मानणारा भारत ना कधी कुणा दरडावणाऱ्याच्या पायाशी झुकला आहे, ना झुकेल.. जिथे श्रद्धा असेल, अशाच ठिकाणी नम्रतेने झुकण्याची या देशाची परंपरा आहे.
भारत आणि सोव्हिएत युनियन (आताचा रशिया) यांचे संबंध कोणत्याही आर्थिक कारणांमुळे प्रस्थापित झालेले नाहीत. ही मनांची मैत्री सद्भाव, समान विचार आणि सांस्कृतिक जवळीक यावर उभी आहे. भारताचे काही पंतप्रधान अमेरिकेकडे झुकलेले होते हे खरे, पण त्यांनीही रशियासोबतचे मैत्र अबाधित ठेवले.
फुटबॉल वर्ल्डकप पाहण्यासाठी मी मॉस्कोला गेलो, तेव्हा जाणवले की भारतीयांविषयी रशियन लोकांच्या मनात किती नैसर्गिक प्रेम आणि आदर आहे. संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये माझी मि. पुतीन यांच्याशी भेट झाली होती. मॉस्कोमधील फुटबॉल सामन्यादरम्यान हातात तिरंगा घेऊन मी 'हिंदुस्तान आणि रशिया जिंदाबाद' अशी घोषणा केली, तेव्हा तिथे उपस्थित पुतीन यांनी स्मित हास्य केले. सोव्हिएत युनियन साम्यवादी. रशियाचाही कल तसाच. पण क्रेमलिनमधले पुतीन यांचे भव्य कार्यालय सोन्याच्या नक्षीने मढलेले आहे. त्या देशात आता साम्यवाद नावापुरताच उरला आहे.
भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले; परंतु त्यावेळी गोवा, दमण आणि दीव या ठिकाणी पोर्तुगालचे शासन ताबा सोडायला तयार नव्हते.
डिसेंबर १९६१ मध्ये आपल्या सैन्याने हल्ला करून गोवामुक्ती केली. त्यावेळी युरोपपासून अमेरिकेपर्यत सगळे जण आपल्या विरुद्ध होते. तत्कालीन सोव्हिएत संघाने मात्र भारताला पाठिंबा दिला. संयुक्त राष्ट्रांन त्यावेळी आपल्या बाजूने नकाराधिकार वापरला होता १९७१ साली भारताला धमकावून पाकिस्तानला मदत करण्यासाठी अमेरिकेने आपले सातवे आरमार बंगालच्या खाडीकडे पाठवले होते; परंतु रशियाच्य पाणबुड्या तेथे आधीच पोहोचल्या होत्या अमेरिकेसाठी रशियाचा संदेश अगदी स्पष्ट होता-मागे हटला नाहीत तर तुमचे काही खरे नाही.
या घटकेला भारताकडे जगातील चौथ्य क्रमांकावरचे सर्वात ताकदवान सैन्य असून, त्यामध्ये रशियाचे फार मोठे सहकार्य आहे. रशियाने उत्तम शस्त्रास्त्रांबरोबर या शस्त्रांचे तंत्रज्ञानही भारताला दिले. भारत आणि रशियातील मैत्री तोडण्याची कुठलीही चालबाजी यशस्वी होणार नाही हे केवळ अमेरिकाच नव्हे तर त्या देशाबरोबर उभ्या असलेल्या देशांनाही समजून घ्यावे लागेल.
पुतीन ४ डिसेंबरला भारतात पोहोचणार होते; आणि १ डिसेंबरला भारतातील एका मोठ्या इंग्रजी वृत्तपत्रात भारतातील जर्मनीचे राजदूत फिलीप एकरमेन, फ्रान्सचे राजदूत मथाऊ आणि ब्रिटनच्या उच्चायुक्त लिंडी कॅमेरून यांचा एक लेख छापून येतो. ज्याचा मथळा असतो युक्रेनचे युद्ध संपावे असे जगाला वाटते, परंतु शांततेच्या बाबतीत रशिया गंभीर दिसत नाही. ही चालबाजी नव्हे तर काय आहे? परंतु पुतीन गोष्टी आहेत. म्हणून त्यांनी चालबाजी करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना सोबतीने मोठी चोळले.
मोदी आणि पुतीन यांनी भारत-रशियाचा नवा अध्याय रचला. उभय देशांनी मैत्री नव्या उंचीवर घेऊन जाणे ही आम्हा दोघांची प्राथमिकता आहे’, असे नरेंद्र मोदी म्हणाले. २०३० पर्यंत दोन्ही देशांनी आर्थिक सहकार्याच्या योजनेवर सहमती दर्शवली आहे. आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण परिवहन मार्ग, चेन्नई- ब्लादिवोस्तोक समुद्रमार्ग अशा योजना नव्या उमेदीने पुढे जातील.
पुतीन यांनीही स्पष्ट शब्दात सांगितले की, मेक इन इंडिया'मध्ये रशिया भारताला सर्व प्रकारची मदत करायला तयार आहे. दोन्ही देशात रुबल आणि रुपयात व्यापार करत आहेत. भारत आणि रशिया ब्रिक्स देशांच्या बरोबर अधिक न्यायपूर्ण आणि बहुध्रुवीय जग निर्माण करण्यासाठी काम करत आहेत, असे पुतीन म्हणाले. ते ट्रम्प याच्यासाठीच.
नरेंद्र गोदी आणि पुतीन यांची ही भाषा ट्रम्प यांना निश्चितच कडवट लागली असणार, परंतु दोन्ही देशांतील मैत्री तोडणे ट्रम्प यांच्या आवाक्याबाहेर आहे.