आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 07:04 IST2025-05-02T07:02:58+5:302025-05-02T07:04:32+5:30

मुलांच्या मागण्या पूर्ण केल्यामुळे त्यांना नसलेलं अप्रूप ...आणि तरीही मुलांचा वेळ न जाण्याची समस्या मात्र कायम. हे असे का घडते? उपाय काय?

Editorial Special Articles If you want to protect today's children from overindulgence..? | आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?

आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?

मुग्धा शेवाळकर मणेरीकर, मुलांच्या वर्तणुकीच्या निरीक्षक आणि  अभ्यासक

“तुमच्या पिढीच्या समस्या वेगळ्या आहेत गं... आमच्या वेळेला मुलांना सांभाळणं इतकं अवघड नव्हतं, खरंच.” साडेचार वर्षांच्या मुलाबरोबर जवळजवळ महिनाभर माहेरी राहिले होते, तेव्हा आई म्हणून गेली. “तुमच्या आईवडिलांनाही असंच वाटलं असेल. प्रत्येकाला असंच वाटत असतं...” असं मी तिला म्हणून गेले खरी, पण मनात काही चक्रं फिरत राहिली, कारण हेच वाक्य मी वेगवेगळ्या संदर्भात, वेगवेगळ्या प्रसंगात माझ्या आईच्या वयाच्या बायकांकडून या महिनाभरात ऐकलं.

क्षणभर वाटलं, आपलंच काही चुकतंय का? पण नाही. मग माझ्या लक्षात आलं; आम्ही आज जितक्या दमलेल्या, वैतागलेल्या दिसतो तितक्या आमच्या आया काही दिसत नव्हत्या. यामागची अनेक कारणं आहेत. आजकाल सगळ्याचं खापर ‘बदलत्या जीवनशैली’वर फोडलं जातं. ते कारण तर आहेच, पण प्रत्येक पिढीत जीवनशैली बदलत असतेच ना? मग आता हे इतकं अधोरेखित का होतंय? मग आम्ही पालक म्हणून काय करतो आहोत, आमच्या आईवडिलांनी काय केलं, त्यांच्या आईवडिलांनी काय केलं असेल, याचा जरा विचार केल्यावर काही गोष्टी मनात आल्या.

गेल्या दहा-बारा वर्षांत अनेक बदल वेगाने घडले. त्यातला या संदर्भात जाणवण्यासारखा बदल म्हणजे, हातात आलेले पैसे खर्च करण्याची क्षमता. अगदी साध्या-साध्या गोष्टीत आम्ही आमची सोय बघतो. उदा. कुठे जायचं झाल्यास आम्ही पटकन रिक्षा करू, पण माझ्या सासूबाई किंवा माझे वडील बसची वाट बघतील. हीच गोष्ट आम्ही आमच्या मुलांच्या बाबतीत करतो का? मुलांना सर्वोत्तम गोष्टी द्यायचा आमचा हट्ट असतो. त्याचाच परिणाम म्हणून घरात भरपूर खेळणी, पुस्तकं, कपडे, बूट येतात. आमचा लेक लहान होता तेव्हा त्याला फिरवायला बाबागाडी, जेवायला खास खुर्ची, गाडीवरून घेऊन जायला कांगारू बॅग अशा कितीतरी गोष्टी आम्ही हजारो रुपये खर्चून आणल्या. त्याचा कितपत उपयोग होईल याचा विचार न करता ‘आपल्या बाळासाठी आपण इतकंही करू शकत नाही का?’ असा भावनिक विचार त्यावेळी आम्ही केला. आज आमच्या वाढलेल्या कामामुळे किंवा आम्ही मुलांना देऊ न शकणाऱ्या वेळेचा गिल्ट कॉम्प्लेक्स म्हणूनही कदाचित हे घडत असेल. याचा परिणाम म्हणजे घरात भरमसाट खेळणी आणि खेळण्यांनी भरलेलं घर असूनसुद्धा ‘काय खेळू?’ असा प्रश्न पडलेला लहानगा जीव!

 घरातला वाढता पसारा बघून अनेकदा आम्ही वैतागून जातो. मग पसारा आटोक्यात ठेवण्यासाठी, लेकाला खेळाच्या कपाटातून खेळ काढू न देणं किंवा त्याच्यामागे खेळ आवरून ठेव म्हणून भुणभुण करत राहणं हे आमच्याकडून नकळत घडत गेलं. खेळण्याच्या आड नियम आलेले मुलांना आवडत नसावेत. त्यामुळे की काय, तो खेळण्यांकडे फिरकेनासाच झाला. म्हणजे, मूळ प्रश्न सुटला नव्हताच. इतकी खेळणी, इतकी जागा तरीही त्याचा वेळ जावा, त्याची ऊर्जा खर्च व्हावी म्हणून आमची धडपड सुरूच होती.

 मुलांच्या वाढत्या मागण्या, त्या पूर्ण केल्यामुळे मुलांना नसलेलं अप्रूप, घरात वाढणारा कचरा, तो दर दोन-तीन महिन्यांनी आवरताना पालकांची होणारी दमछाक आणि तरीही मुलांचा वेळ न जाण्याची समस्या ही आव्हानं मला समोर दिसली. त्यावर उपाय म्हणजे नातेवाइकांतल्या मोठ्या भावंडांची खेळून झालेली खेळणी इतर लहान मुलांना देणं. पुस्तकांची लायब्ररी असते, तशी खेळण्यांची लायब्ररी असते का याची चौकशी करणं, नसेल तर चार-पाच पालकांनी पुढाकार घेऊन ती सुरू करणं. मनावर दगड ठेवून मुलांना नाही म्हणणं... ही समस्या माझ्या घरात जितक्या प्रमाणात आहे, तितक्या प्रमाणात सगळ्यांच्याच घरी असेल असं नाही. त्यामुळे यावर एकच सार्वत्रिक तोडगा असेल असं नाही.

खेळाची जी गत तीच कमी-जास्त प्रमाणात कपड्यांची आणि मुलांना लागणाऱ्या इतर वस्तूंची. म्हणूनच मुलांना खेळण्यांच्याच नाही तर एकूणच सगळ्या बाबतीतल्या अतिलाडाच्या सवयीपासून वाचवायचं असेल तर आपलं प्रेम दाखवण्याच्या, सिद्ध करण्याच्या आपल्या कल्पनांचा पुन्हा एकदा विचार करणं आणि त्याचबरोबर एखाद्या गोष्टीसाठी मुलांना (आणि पर्यायानं स्वतःला) नाही म्हणणं. आणि त्याबद्दल मनात अपराधी भाव न बाळगणं, हे आव्हान मला सध्या तरी सगळ्यात मोठं वाटतं.

Web Title: Editorial Special Articles If you want to protect today's children from overindulgence..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.