शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

धर्मनिरपेक्षता, लोकशाहीचा वारसा चालविण्याचा दावा करणाऱ्यांचे पितळ उघडे पडले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 6:10 AM

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नामांतराचा जिन बाहेर काढण्यात आला. यातला राजकीय विरोधाभास असा की, तत्कालीन युती सरकारने काढलेले नामांतराचे नोटिफिकेशन १९९९ मध्ये रद्द करणारे काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष यावेळी मात्र या निर्णयाच्या पाठीशी आहेत!

सुमारे चारशे वर्षांपूर्वी शेक्सपिअर नावाच्या लेखकाने आपल्या एका नाटकातील पात्राच्या तोंडी ‘नावात काय आहे?’ असा प्रश्न केला होता. या प्रश्नाचे उत्तर तेव्हाही मिळाले नव्हते आणि आजही ते कोणाकडे असण्याची शक्यता नाही. मात्र, तरीही शहरांच्या नावांचे नवे बारसे करण्याची आपली हौस कमी होताना दिसत नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने जाता जाता औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करून स्वत:ची पाठ थोपटून घेतली. औरंगाबादला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव दिल्याबद्दल कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. या नामांतराच्या माध्यमातून राजेंच्या स्मृतींना उजाळा मिळणार असेल तर स्वागतच आहे. मात्र, यातूनच अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत.

लोकभावना या सबबीखाली शहरांची, महानगरांची, धर्मस्थळांची नावे बदलण्याची जणू प्रथाच पडत चालली आहे. महापुरुषांचे पुतळे उभारून प्रेरणा मिळत नसेल तर शहरांचे नामकरण करून इतिहासही बदलला जाणार नाही; परंतु प्रतिमा, पुतळे आणि अस्मितेचे राजकारण करू पाहणाऱ्यांना नेहमीच अशा तकलादू गोष्टींची गरज भासत असते. अशा निर्णयांचा भलेही तात्कालिक राजकीय लाभ मिळेल; परंतु त्यातून मूलभूत प्रश्नांची सोडवणूक होईलच, असे नाही. मद्रासचे ‘चेन्नई’, बॉम्बेचे ‘मुंबई’, अलाहाबादचे ‘प्रयागराज’ अशी अलीकडच्या काळातील नामांतराची उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत. औरंगाबाद हे तर ऐतिहासिक शहर. जगभरातून दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी येत असतात. या जागतिक पर्यटकांसाठी पुरेशा सुविधा आपण देऊ शकलेलो नाही. औरंगाबाद शहरातील नागरिकांना आजही आठ दिवसांतून एकदा पाणी मिळते. शहराच्या नामांतराने या समस्या सुटणार असतील तर त्याचे स्वागतच आहे.

बरे नामांतराचा हा प्रयोग तसा नवा नाही. १९९५ मध्ये तत्कालीन भाजप-शिवसेना युती सरकारने औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्याची अधिसूचना काढली होती. त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले. या निर्णयामुळे सामाजिक तणाव निर्माण होईल, असे कारण देत लढा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. युती सरकारचा तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला. आता पुन्हा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नामांतराचा जिन बाहेर काढण्यात आला. यातला राजकीय विरोधाभास असा की, तत्कालीन युती सरकारने काढलेले नामांतराचे नोटिफिकेशन १९९९ मध्ये रद्द करणारे काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष यावेळी मात्र या निर्णयाच्या पाठीशी आहेत! गेली अडीच वर्षे शिवसेनेसोबत केलेल्या संगतीचा हा परिणाम असू शकेल. भिन्न विचारधारा असलेल्या तीन राजकीय पक्षांचा ‘मविआ’ प्रयोग यशस्वी झाला नसला तरी यानिमित्ताने शिवसेनेच्या तोंडी धर्मनिरपेक्षता, लोकशाही मूल्यांची भाषा आली आणि जे पक्ष या मूल्यांचा वारसा चालविण्याचा दावा करत होते, त्यांचे पितळ उघडे पडले. हेही नसे थोडके!

आता या शहराच्या नामकरणावर शिक्कामोर्तब करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. सत्तेवरून पायउतार होताना महाविकास आघाडी सरकारने घेतलेला दुसरा निर्णय मात्र अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तो आहे वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्गठनाचा. वस्तुत: विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रासाठीच्या वैधानिक विकास मंडळांना अडीच वर्षांपूर्वीच मुदतवाढ मिळायला हवी होती. मात्र, मागास भागाच्या विकासाचा अनुशेष दूर करण्याकरिता राज्याच्या विकास निधीचे समन्यायी वाटपाचे अधिकार राज्यपालांकडे जाऊ नयेत, म्हणून या मंडळांची मुदतवाढ रोखून धरण्यात आली होती. आधी बारा आमदारांच्या नावाला मंजुरी द्या, मगच वैधानिक विकास मंडळे घ्या, अशी राजकीय सौदेबाजीची भाषा केली गेली. मविआ सरकारचे आणि राजभवनाचे संबंध ताणले गेले म्हणून त्याची शिक्षा विकास मंडळांना दिली गेली. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील अनेक सिंचन प्रकल्प निधीअभावी अपूर्णावस्थेत आहेत. पाणी आहे; परंतु साठवण क्षमता नसल्याने या भागात दरवर्षी दुष्काळी परिस्थिती उद्भवते. उशिरा का होईना आता या मंडळांना मुदतवाढ मिळाल्याने मागास भागाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नव्या सरकारने तातडीने या मंडळांचे पुनर्गठन करून ती कार्यान्वित केली पाहिजेत. यानिमित्ताने राज्याचा समतोल विकास साधला गेला तर नामांतराचे बारसे गोड होईल!

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीAurangabadऔरंगाबाद