कुस्ती हरली! ही कुस्तीची परंपरा नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 06:54 IST2025-02-04T06:52:40+5:302025-02-04T06:54:03+5:30
महाराष्ट्राच्या दृष्टीने रंगतदार ठरलेल्या या दिवशी अहिल्यानगरातील कुस्ती आखाड्यातील मारामारीमुळे बेरंग झाला.

कुस्ती हरली! ही कुस्तीची परंपरा नाही
गेल्या रविवारी विविध ठिकाणी मैदाने गाजत होती. क्वालालंपूरमध्ये एकोणीस वर्षांखालील टी-२० महिला क्रिकेटचा अंतिम सामना भारतीय मुलींनी दिमाखात जिंकला. भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यानच्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामन्यात अभिषेक शर्मा विक्रमावर विक्रम करीत होता. उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये प्रथमच होत असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ पन्नास पदकांची लयलूट करीत होता. याचवेळी महाराष्ट्र केसरीचा ६७वा कुस्तीचा आखाडा अहिल्यानगरात रंगला होता. महाराष्ट्राच्या दृष्टीने रंगतदार ठरलेल्या या दिवशी अहिल्यानगरातीलकुस्ती आखाड्यातील मारामारीमुळे बेरंग झाला.
कोणतीही स्पर्धा असली की पंचांचा निर्णय अंतिम मानला जातो. पंचही माणूसच. त्यांच्या नजरेतून एखादा क्षण निसटण्याची शक्यता असते म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सर्वत्र सामन्याचे चित्रीकरण केले जाते. खेळाडूंच्या आक्षेपानंतर तिसऱ्या तटस्थ पंचाकरवी निर्णयाचा आढावा घेऊन अंतिम निर्णय देण्यात येतो. अहिल्यानगरातील महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दोन वाद झाले ते अंतिम लढतीतील आहेत.
या लढतीतील पंचांच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले. पंचांना ते स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार देण्यात आल्याने घोळ झाला. क्रिकेट सामन्यात पंचांचा निर्णय मान्य नसल्यास पंधरा सेकंदांत आक्षेप नोंदवून तिसऱ्या पंचाकरवी फेरनिर्णय घेण्याचा अधिकार दोन्हीही संघांना असतो. अशाप्रकारे आक्षेप घेण्याची प्रत्येक संघास तीन वेळाच संधी असते. कुस्तीमध्ये ही सुविधा आहे. दोघा हरलेल्या मल्लांचा आक्षेप स्वीकारून फेरनिर्णय घेणे गरजेचे होते.
महाराष्ट्र केसरी किंवा हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा आंतरराष्ट्रीय नियमांनुसार चालतात. भारतात या लढतींना भारतीय कुस्तीगीर परिषदेचे नियम निकष लागू असतात. अहिल्यानगरच्या कुस्ती स्पर्धेस महाराष्ट्रातील असंख्य मल्लांनी गर्दी केली होती. उपांत्य सामन्यात पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध नांदेडच्या शिवराज राक्षे यांची कुस्ती केवळ तांत्रिक कारणांनी वादग्रस्त ठरली.
मोहोळ याने अवघ्या दोन मिनिटांत राक्षे याच्यावर पकड घेत चितपट केले, मात्र राक्षे याचा आक्षेप होता की, त्याची पाठ पूर्णपणे गादीवर टेकलीच नव्हती. त्यामुळे कुस्ती चितपट झाली असे म्हणता येत नाही. या क्षणाची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. त्यात राक्षे याची पाठ पूर्णता गादीला लागली आहे असे दिसत नाही.
या स्पर्धेसाठी १२५ आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव असलेले पंच नेमले होते, अशी माहिती आहे. त्यामध्ये तिसरे तटस्थ पंचही होते. चितपट झालेल्या क्षणांची चित्रफीत पाहून पंचांनी फेरआढावा घ्यावा, ही राक्षे याची मागणी योग्य होती. तशी सोय असेल तर निर्णय बिनचूक होण्यासाठी चित्रफितीचा वापर करायला हरकत नव्हती.
तो निर्णय अमान्य असेल तर साधारणत: मल्ल नापसंती व्यक्त करीत मैदान सोडतात पण पंचांवर हल्ला करणे, त्यांची कॉलर पकडणे किंवा लाथ मारणे ही अलीकडे कुस्ती क्षेत्रातील वाढलेली बेबंदशाही म्हणावी लागेल. पूर्वी एकाच गावचा मल्ल मैदाने गाजवीत असेल तर हारजीत गौण मानून त्या मल्लाचा अभिमान बाळगला जात होता.
अनेक मल्ल कसलेल्या शरीरामुळे देखणे दिसत. त्यांचे राहणीमान साधे पण वागणे आदबशीर असे. महाराष्ट्राला अशा गाजलेल्या मल्लांची मोठी परंपरा आहे. मारुती माने यांना तर कुस्ती सोडल्यानंतरही पाहण्यासाठी गर्दी होत असे. दिल्लीचा सत्पाल महाराष्ट्रात यायचा तेव्हा त्याची कुस्ती पाहण्यासाठी मराठी माणूसही आतुर असायचा. कर्तारसिंग यालाही असाच मान मिळत होता.
कुस्तीच्या मैदानावर गाजलेल्या लढतींच्या आठवणी आजही बुजूर्ग मंडळी काढतात. अहिल्यानगरमध्ये अंतिम स्पर्धेत पंचांच्या निर्णयावर शिवराज राक्षे किंवा महेंद्र गायकवाड ज्या पद्धतीने वागले याला कुस्तीगिराचा दिलदारपणा म्हणत नाहीत. ही कुस्तीची परंपरा नाही.
एका स्पर्धेने मल्लाचे करिअर संपत नाही किंवा बहरतही नाही. मोहोळ विरुद्ध गायकवाड यांची अंतिम कुस्ती रंगतदार झालीच नाही. नकारात्मक गुणांवरच ते खेळत होते. अखेरच्या काही सेकंदात गायकवाड याने तांत्रिक कारणावरून मैदान सोडणे हा निर्णयही कुस्ती या खेळाला हरविण्यासारखाच होता. संयोजक आणि पंचांनीही अशा स्पर्धा पारदर्शी कशा होतील यासाठी अधिक दक्षता घेण्याची गरज आहे.