ये घर बहुत हसीन हैं! आता सरकारने दलालांचा वेळीच बंदोबस्त करायला हवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 08:44 IST2025-08-16T08:43:26+5:302025-08-16T08:44:04+5:30
घरे कुणामुळे मिळाली हे ओळखण्याएवढा हा चाळकरी सूज्ञ आहे

ये घर बहुत हसीन हैं! आता सरकारने दलालांचा वेळीच बंदोबस्त करायला हवा
अखेर बीडीडी चाळीतील रहिवाशांना घरे मिळाली. बीडीडी चाळींसोबत मुंबईचा प्रदीर्घ इतिहास जोडला गेला आहे. रांगणारी शिवसेना साठीत प्रवेश करेपर्यंतचा प्रवास या चाळींनी पाहिला. नामदेव ढसाळांच्या गोलपीठातील कवितांमधील अंगार आणि दलित पँथरचा निखारा हातात धरून येथील चाळकरी चालले. मुंबईतील रक्तरंजित दंगली आणि प्रेतांच्या राशी मागे सोडणारे बॉम्बस्फोट या चाळींनी सोसले. गिरणी कामगारांचा संघर्ष, दत्ता सामंत यांचे विशाल मोर्चे या चाळींतील घराघराशी जोडलेले होते. दहीहंडी, गणेशोत्सव यांच्या बदलत्या स्वरूपाचे जवळचे साक्षीदार याच चाळीतील तीन पिढ्या आहेत. या चाळींचा हा इतिहास आता मागे पडला आणि त्यांचा भूगोल बदलला. तीन ते पाच मजल्यांच्या या चाळी आता चाळीस मजल्याचे टॉवर झाल्या. सार्वजनिक शौचालयातील बल्ब गेला, तर कुणी बदलायचा यावरून वाद करणारे चाळीतील रहिवासी आता लिफ्ट, पार्किंग वगैरे सुविधांच्या इमारतीत वास्तव्याला गेले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरांच्या चाव्यांचे वाटप करताना एक मोलाचा संदेश दिला. ते म्हणाले की, मुंबईत घरांची किंमत सोन्यासारखी आहे. ही घरे विकू नका, ती पुढच्या पिढीला द्यायची आहेत, हे लक्षात ठेवा. घराच्या मालकीत लाडक्या बहिणींचेही नाव जोडा. फडणवीस यांचा संदेश योग्य आहे. कुटुंबातील एका व्यक्तीला मुंबईत घर मिळाल्यावर तंटेबखेडे न करता तो तिकडे राहील, याकरिता मुंबईबाहेर गेलेल्या नातलगांनी एकजुटीचे दर्शन घडवले पाहिजे. बीडीडी चाळीतील रहिवाशांनी वर्षानुवर्षे हालअपेष्टा सहन केल्या. अनेक बिल्डरांचा या वसाहती विकसीत करण्यावर डोळा होता. बिल्डरांच्या भरवशावर राहिले असते तर कदाचित त्यांना लवकर घरे मिळाली नसती. अनेकांना आयुष्याच्या उत्तरार्धात का होईना आलिशान इमारतींमधील विविध सुविधांचा लाभ घेण्याची संधी मिळाली ही आनंदाची बाब आहे. चाळीसाव्या मजल्यावरुन मुंबईचे होणारे दर्शन हे स्वप्न साकार होणे ही खरोखरच सुखद घटना आहे. वरळी असो की दादर आता येथे टॉवर उभे राहत असल्याने आजूबाजूची लोकवस्ती, जीवनशैली बदलली आहे. मात्र बीडीडी चाळींतील अनेक कुटुंबात अनेक गुणवंत, हुशार मुले-मुली असतील. आयटीपासून गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी चमक दाखवली असेल. ही नवी पिढी या बदललेल्या परिस्थितीत तेथेच चिकाटीने वास्तव्य करून मुंबईतील मराठी माणसाचा झेंडा फडकवत ठेवील, याबद्दल विश्वास वाटतो.
मुंबईतील गिरणी कामगार संपानंतर उद्ध्वस्त झाला. त्याला मुंबईत घरे देण्याची घोषणा झाली. ती अजून प्रभावीपणे अंमलात आली नाही. बीडीडी चाळकऱ्यांप्रमाणेच गिरणी कामगारांना मुंबईत घरे देण्याकरिता सरकारने प्रयत्न करावे. अनेक झोपडपट्ट्यांमध्ये मराठी कुटुंबे वास्तव्य करीत होती. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत बिल्डरांनी फसवणूक केल्यामुळे ही कुटुंबे ट्रान्झीट कॅम्पमध्ये खितपत पडली आहेत. म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास करतानाही बिल्डरांनी फसवणूक केल्याने बेघर झालेल्यांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर म्हाडाने स्वतः विकसीत केलेली बीडीडी चाळकऱ्यांची घरे ही कौतुकास्पद घटना आहे. बिल्डरांपेक्षा म्हाडा अधिक चांगल्या दर्जाची घरे वेळेत उपलब्ध करुन देऊ शकते, त्याचे हे उदाहरण आहे. चाळकऱ्यांना घरे मिळणार हे कळल्यावरच कदाचित दलाल बीडीडी चाळकऱ्यांना आमिष दाखवून त्यांची घरे विकण्याकरिता भाग पाडण्याचा धोका नाकारता येत नाही. मात्र, मुंबईत पुन्हा मराठी माणसाने परतावे याबाबत जर सरकार ठाम असेल, तर त्यांनी अशा दलालांचा वेळीच बंदोबस्त करायला हवा.
येणाऱ्या महापालिका निवडणुकीत बीडीडी चाळकऱ्यांना घरे कुणी दिली, यावरून श्रेयवादाची मोठी लढाई रंगणार आहे. या कार्यक्रमाला स्थानिक आमदार या नात्याने आदित्य ठाकरे यांना निमंत्रित केले होते. मात्र, त्यांनी पाठ फिरवली. बीबीडी चाळकऱ्यांना घरे देण्याचा विषय गेली किमान २५ वर्षे रेंगाळलेला होता. गेल्या सात वर्षांत तो मार्गी लागला. त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीच्या दोन्हीकडील मंडळींनी केलेल्या प्रयत्नांमुळे घरे मिळाली हे जरी खरे असले, तरी चावी वाटप करतो किंवा उद्घाटनाची फीत कापतो तो श्रेय घेतो. घरे कुणामुळे मिळाली हे ओळखण्याएवढा हा चाळकरी सूज्ञ आहे. कुणामुळे कोंबडा आरवला यापेक्षा बीडीडी चाळकऱ्यांच्या जीवनात नवी पहाट उगवली याचेच समाधान व आनंद साजरा करू या.