मतदान नरेंद्र मोदींच्या वलयालाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 04:55 AM2019-06-04T04:55:39+5:302019-06-04T04:55:54+5:30

नरेंद्र मोदींसमोर विश्वासार्ह पर्याय उपलब्ध नव्हता. काँग्रेस पक्षाच्या धोरणात एकसूत्रतेचा अभाव होता. ही कारणे काही प्रमाणात भाजपच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या विजयासाठी कारणीभूत ठरली असावी.

Editorial on Narendra Modi victory in elections | मतदान नरेंद्र मोदींच्या वलयालाच!

मतदान नरेंद्र मोदींच्या वलयालाच!

Next

संतोष देसाई

भारतीय जनता पक्षाच्या इतक्या प्रचंड मताधिक्याने निवडणूक जिंकण्यामागील कारणे काय असावीत? या अनपेक्षित आणि मोठ्या प्रमाणावर झालेल्या विजयाचा अन्वयार्थ लावणेदेखील वेडेपणाचे ठरेल. हा निकाल आजच्या राजकारणाविषयी काय सांगतो? मतदारांना काय हवे होते आणि त्यांना ते नरेंद्र मोदींमध्ये गवसले होते का? या विजयाचा अन्वयार्थ अनेक तऱ्हेने लावता येतो. भाजपची या निवडणुकीसाठीची तयारी भक्कम होती. पुलवामा घटनेनंतर त्यांनी राष्ट्रवादाची भूमिका स्वीकारली होती आणि त्याला मीडियाकडून भरभक्कम पाठबळ लाभले होते. लोकप्रिय टी.व्ही. चॅनेल्सनी ती भूमिका आणि हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला होता. त्याच्यापुढे विकासाचा मुद्दा मागे पडला. याशिवाय नरेंद्र मोदींसमोर विश्वासार्ह पर्याय उपलब्ध नव्हता. काँग्रेस पक्षाच्या धोरणात एकसूत्रतेचा अभाव होता. ही कारणे काही प्रमाणात भाजपच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या विजयासाठी कारणीभूत ठरली असावी.

पण या पटण्याजोग्या कारणांपलीकडे आणखी काही होते जे विजयासाठी कारणीभूत ठरले. मोदी यांचा विजय झाला कारण देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता फक्त त्यांच्यातच आहे असा विश्वास लोकांना वाटला. इंदिरा गांधींनंतर त्यांच्याएवढी क्षमता आणि लोकप्रियता लाभलेला एकमेव नेता नरेंद्र मोदी हा होता. देशाचे नेतृत्व करण्यासाठीच ते आहेत असे लोकांना वाटत होते. अन्य काही घटक या विजयासाठी कारणीभूत ठरले असू शकतात. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असे काही आहे ज्यामुळे राष्ट्राचे एकमेव नेता अशी त्यांची प्रतिमा जनमानसात निर्माण झाली आहे. पक्षापेक्षा त्यांच्याविषयी वाटणारे आकर्षण प्रभावी ठरले, त्यामुळे लोकांनी पक्षाच्या धोरणाऐवजी त्यांच्याभोवती असलेल्या वलयाकडे बघून मतदान केले.ते जातीच्या आणि प्रादेशिक भूमिकेच्या पलीकडे उभे असलेले लोकांना दिसले. यावेळी त्यांनी लोकांना कोणतीही अभिवचने दिली नाहीत. अच्छे दिनाचे किंवा खात्यात पंधरा लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले नाही. त्यांना मिळालेल्या यशाचे श्रेय गेल्या पाच वर्षात त्यांनी जे काही केले त्याला देता येणार नाही. (अर्थात त्यांची भूमिका या यशात असलीच पाहिजे) किंवा ते भविष्यात काय करणार आहेत हेही लोकांसाठी महत्त्वाचे नव्हते. त्यांच्या अपयशाकडे लोकांनी डोळेझाक केली आणि त्यांच्या हेतूंकडेच लक्ष पुरविले. अपयशाबद्दल लोकांनी माफ केल्यामुळे त्यांना प्रचंड बळ मिळाले.

बालाकोटच्या हल्ल्यामुळे मोदींमधील क्षमता पहावयास मिळाली, जी लोकांना आकर्षित करीत होती. त्यामुळे अगोदरच चांगल्या असलेल्या मोदींच्या प्रतिमेला मुलामा देण्याचे काम झाले. पण त्या स्थितीतील अन्य कोणत्याही नेत्याला तसेच यश मिळण्याची शक्यता नव्हती. त्या जागी राहुल गांधी असते आणि त्यांच्याविरोधात आक्रमक भाजप असता तर त्यांनी गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाचे खापर राहुल गांधींच्या माथ्यावर फोडले असते! मीडियानेही सरकारलाच लक्ष्य केले असते! अर्थात हा माझा अंदाज आहे. पण तो शक्यतेच्या कक्षेत वाटणारा आहे. मोदींच्या प्रतिमेमुळे त्यांना बालाकोटचा फायदा करून घेता आला. त्या घटनेने मोदींची प्रतिमा तयार झाली नव्हती!
आणखी एक राजकारणी, अशी त्यांच्याविषयीची प्रतिमा मीडियाने तयार केलेली नाही. त्यांनीदेखील स्वत:ची प्रतिमा राजकारण्यांपेक्षा वेगळी जपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अन्य राजकारणी व्यक्तींपेक्षा मोदी हे वेगळे आहेत याच भूमिकेतून मतदार त्यांच्याकडे बघत होते आणि हे काही अपघाताने घडले नव्हते. त्यांच्या भक्तांची त्यांच्यावरील प्रगाढ श्रद्धा हा घटकदेखील त्यांच्यासाठी उपयुक्त ठरला. त्यांचे अनुयायी हे त्यांचे भक्त होते. पण अन्य नेत्यांच्या अनुयायांना भक्त ही उपाधी लावता येण्यासारखी नाही. अन्य पक्षातील नेत्यांना त्यांच्या पक्षातून केल्या जाणाऱ्या टीकेपासून सवलत मिळत नाही. तसेच नेता नेईल तिकडे जाण्याची अनुयायांची वृत्ती पहावयास मिळत नाही. अशातºहेची नेत्याविषयीची भावना ही लागट असण्याचीच शक्यता अधिक असते. भाजपचे मताधिक्य वाढत गेले कारण जे मतदार कुंपणावर होते त्यांनी भराभर मोदींच्या बाजूने मतदान केले.


विरोधकांपाशी राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व नसणे ही गोष्ट त्यांच्यासाठी अडचणीची ठरली. विरोधकांना त्यांच्यामागे कार्यकर्त्यांची फौज असणे पुरेसे नाही तर ते विश्वासू हवेत आणि त्यांचे निष्ठावान सेवक हवेत. जातीचे जुने गणित निवडून येण्यास पुरेसे ठरत नाही हे एकदा निश्चित झाल्यावर विरोधकांसाठी मोदींसमोर पर्यायी नेतृत्व उभे करण्यावाचून पर्याय उरला नाही. आज विरोधकांपाशी असा नेता नसणे ही वस्तुस्थिती आहे. विरोधकही तुकड्यातुकड्यात विखुरलेले आहेत. तसेच काँग्रेसही परिणामकारक उरलेली नाही. तो पक्ष आता राष्ट्रीय पक्ष म्हणून अस्तित्वहीन ठरला आहे. त्यामुळे तो पर्याय देण्याच्या क्षमतेत शिल्लक उरला नाही. अर्थात भाजपच्या संदर्भातही तीच अवस्था आहे. मोदीसारखी क्षमता असलेला दुसरा नेता त्यांच्यापाशी नाही. पण मोदींचे कमी वय लक्षात घेता, मोदींच्या नंतर कोण याची चिंता आतापासून करण्याचे कारण त्यांच्यासाठी उरलेले नाही, हेही तितकेच खरे आहे!

(लेखक राजकीय विश्लेषक आहेत)

Web Title: Editorial on Narendra Modi victory in elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.