अदृश्य सायबर दरोडेखोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 05:47 AM2021-08-10T05:47:14+5:302021-08-10T05:47:39+5:30

आभासी जगातील दरवाजावरील टकटक करणारा किमान एकदा पारखून पाहिला तरी वास्तववादी जगात फकीर होण्याची वेळ येणार नाही.

editorial on increasing cyber crime and frauds | अदृश्य सायबर दरोडेखोर

अदृश्य सायबर दरोडेखोर

Next

अचानक समोर आलेल्या मित्राने दोन-पाचशे रुपये मागितले तर पाकीट घरी विसरल्याचा बहाणा केला जातो. मोबाइलचा पासवर्ड बायकोलाही कळू नये याकरिता नवरोबा धडपडतात. मालकी हक्क गाजवणाऱ्या सहा-आठ स्थळांना नकार दिलेल्या विवाहेच्छुक तरुणी असतात. हे सारे आपल्या अवतीभवती वास्तवात असतात, भेटतात. मात्र हीच हाडामांसाची माणसे व्हर्च्युअल विश्वात तशीच वागत नाहीत. मित्राला उसने पैसे देण्यास नकार देणारा व्हर्च्युअल विश्वात एखाद्या मद्याच्या बाटलीच्या मोहापायी लाखभर रुपये देऊन बसतो. बायकोला मोबाइलचा पासवर्ड न सांगणारा पलीकडून मधुर आवाजात संवाद करणाऱ्या तरुणीला आपल्या डेबिट कार्डाचा पिन नंबर अलगद सांगून मोकळा होतो. मालकी हक्क गाजवणाऱ्या स्थळांना नकार देणारी विवाहेच्छुक तरुणी मॅट्रिमोनिअल साइटवर भेटलेल्या उपवराला आपल्या खात्यातून मोठ्या रकमा कधी व कशी ट्रान्सफर करून मोकळी होते ते तिलाही कळत नाही.



व्हर्च्युअल विश्वात कधी न पाहिलेल्या, भेटलेल्या माणसांच्या जाळ्यात सुशिक्षित, समंजस, बुजुर्ग माणसे सावज बनून अलगद कधी अडकतात ते त्यांना का कळत नाही, हेच पोलिसांसमोरचे आव्हान आहे. अकोल्यातील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने फेसबुक फ्रेंडच्या २५ लाखांचे गिफ्ट पाठवण्याच्या आमिषाला बळी पडून ५६ लाख रुपये गमावल्याचे प्रकरण उघड झाले आहे. या प्रकरणात एका नायजेरियनसह दोन आरोपी अटकेत आहेत. फसवणूक झालेली व्यक्ती निवृत्त अधिकारी आहे म्हणजे तिने तिच्या आयुष्यात अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले आहेत. परंतु तरीही थोडीथोडकी नव्हे तर इतकी मोठी रक्कम गमावली आहे हे एक उदाहरण आहे. मात्र दररोज अशी फसवणूक होणारी शेकडो माणसे आहेत.



गेल्या काही वर्षांत सायबर दरोडेखोरांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या टोळीत काही तरुण व तरुणी असतात. ते मोठ्या प्रमाणावर सीमकार्ड खरेदी करतात. पश्चिम बंगालसारख्या राज्यातून या टोळ्यांनी सीमकार्ड खरेदी केल्याचे निदर्शनास आले आहे. टोळीचे सदस्य बिहार, झारखंडसारख्या गरीब राज्यातील गरजू व्यक्तींची बँक खाती मामुली रक्कम मोजून खरेदी करतात. एका प्रकरणात एका गरोदर स्त्रीला तिच्या प्रसूतीकरिता ८०० रुपये देऊन सायबर चोरांनी तिचे बँक खाते खरेदी केले. टोळीचे काही सदस्य सोशल मीडियावरील सर्वसामान्यांचे फोटो, व्हिडिओ, चॅट यावर लक्ष ठेवून असतात. एखादा उच्चपदस्थ निवृत्त झाला की, तो आपला निरोप समारंभाचा फोटो फेसबुक, इन्स्टाग्रामवर अपलोड करतो. नवी मोटार खरेदी करण्याच्या विचारात असलेल्यांचा जुनी मोटार विकण्याचा संदेश पाहून त्यांना लक्ष्य केले जाते. निवृत्त झालेल्या व्यक्तीला गुंतवणुकीचे आमिष दाखवून किंवा मोटार खरेदी करू पाहणाऱ्यास त्यासोबत गिफ्टची लालूच दाखवून त्यांच्या खात्यातील मोठ्या रकमा गोरगरिबांच्या खरेदी केलेल्या बँक खात्यात जमा करायला भाग पाडले जाते. रक्कम जमा होताच ती काढून घेतली जाते व त्या गोरगरिबाच्या हातावर फारच थोडे पैसे टेकवले जातात. या टोळ्यांमधील नायजेरियन हे तर क्रिप्टो करन्सीमार्फत आफ्रिकी देशात ट्रान्सफर करतात.



भारतात फसवणुकीच्या हेतूने आलेले हे नायजेरियन आपला पासपोर्ट नष्ट करून बिनदिक्कत येथे राहतात. अशा बऱ्याच सायबर गुन्ह्यांत पानवाले, रिक्षाचालक, ढाब्यावरील कामगार यांच्या नावावर सीमकार्ड खरेदी केलेली असतात व पोलीस जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांना या फसवणुकीची गंधवार्ता नसते. झारखंडमधील जामतारा हे अशा सायबर दरोडेखोरांचे मोठे केंद्र आहे. या सायबर टोळ्यांमध्ये सामील होणाऱ्यांना विवाहेच्छुक तरुणींशी लव्ह चॅट कसे करायचे, कर्करोग किंवा तत्सम दुर्धर आजाराच्या रुग्णांच्या नातलगांना आपण विदेशातील डॉक्टर असल्याचे भासवून गंडा कसा घालायचा, शेतीचे बियाणे विकण्याच्या बहाण्याने शेतकऱ्यांची फसवणूक कशी करायची, याचे रीतसर प्रशिक्षण देतात. पोलिसांनी पकडले तर त्यांच्याकरिता न्यायालयात युक्तिवाद करणारे वकील बांधलेले असतात.

आपल्या वास्तव जीवनातील नातलगांना आपल्या व्हर्च्युअल विश्वातील गुपिते कळू न देण्याचा आटापीटा अनेकजण करीत असतात. त्यामुळे कुणी चॅटिंग अथवा डेटिंग साइटवर सूत जुळवत असेल तर आर्थिक वस्त्रहरण झाल्यावरच तो हे कुटुंबात जाहीर करतो. अदृश्य सायबर दरोडेखोरांचे सर्वात मोठे लक्ष्य हे महिला व ज्येष्ठ नागरिक असतात हेही अनेक प्रकरणात उघड झाले आहे. आभासी जगातील दरवाजावरील टकटक करणारा किमान एकदा पारखून पाहिला तरी वास्तववादी जगात फकीर होण्याची वेळ येणार नाही.

Web Title: editorial on increasing cyber crime and frauds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.