शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

आजचा अग्रलेख : पावसाने तहान भागवली, पण घास हिरावला; 'गुलाबा'चा काटा शेतकऱ्याला टोचला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 08:47 IST

एरवी गुलाब हे प्रेमाचे, स्नेहाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते; परंतु याच नावाने आलेल्या चक्रीवादळाने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला.

एरवी गुलाब हे प्रेमाचे, स्नेहाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते; परंतु याच नावाने आलेल्या चक्रीवादळाने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. या ‘गुलाबा’ने शेतकऱ्यांचा अक्षरश: काटा काढला. निसर्गाचा हा ‘हनी ट्रॅप’ होता की काय, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. कारण, एकीकडे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्यातील जवळपास सगळी धरणे एकाएकी भरली. नद्यांना पूर आला, ओढेनाले ओसंडून वाहू लागले. शेतीच्या, जनावरांच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला, या आनंदात सगळे असतानाच शिवारात मात्र वेगळेच चित्र होते. अवघ्या दोन दिवस झालेल्या पावसाने शेतात उभ्या असलेल्या उडीद, मूग, मका, कापूस, सोयाबीन या खरीप पिकांचा अक्षरशः चिखल झाला. चाळीसहून अधिक माणसे दगावली. पशुधन किती वाहून गेले याची तर गणतीच नाही.

सुमारे सात लाख हेक्टरवरील जमीन पाण्यासोबत वाहून गेली. प्राथमिक अंदाजानुसार मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे २५ लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे, तर बाधित शेतकऱ्यांची संख्या ३५ लाख ६४ हजार इतकी आहे. ही सगळी आकडेवारी पाहता, ‘पावसाने तहान भागवली पण घास हिरावला!’ अशी सध्या स्थिती आहे. कधी नव्हे ती यंदा खरीप पिके जोमदार आली होती. सोयाबीनचा बाजारभाव वधारला होता. कापसाची बोंडेही चांगलीच बहरली होती. असे असताना अचानक आलेल्या या गुलाबी चक्रीवादळाने होत्याचे नव्हते करून टाकले. मराठवाड्यातील शेतकरी आधीच निसर्गाच्या फेऱ्यात अडकलेला. त्यात या अवकाळी संकटाची भर! आजवर अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून अतिवृष्टी, ढगफुटीचा सामना करावा लागत आहे. पिके ऐन काढणीवर असताना अतिवृष्टी होते आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला जातो. निसर्गचक्रात अडकलेल्या या शेतकऱ्यांना ना पुरेशी नुकसानभरपाई मिळते, ना विम्याची रक्कम! परवाच्या चक्रीवादळाने या भागातील जवळपास सुमारे २५ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

नुकसानीचा आकडा त्यापेक्षाही अधिक असू शकतो. मुख्यमंत्र्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत परंतु पंचनामे कसे होतात, हे सर्वांनाच माहिती आहे. सरकारने पंचनाम्याचे सोपस्कार करत बसण्याऐवजी दोन वर्षांपूर्वी सांगली, सातारा आणि कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना जशी तातडीने मदत केली होती, तशी तत्परता दाखवली पाहिजे. नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या आपद्ग्रस्तांना द्यावयाच्या मदतीचे निकष एनडीआरएफने ठरवून दिले आहेत. उदा. पशुधन वाहून गेले असल्यास संबंधित पशुपालकास मदत देण्यासाठी पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी आणि दूध संघाचा संचालक यांच्या स्वाक्षरीचा ‘स्पॉट पंचनामा’ ग्राह्य धरण्यात येतो. एवढा द्रविडी प्राणायाम कोण करत बसणार? शिवाय, गावकी अन् भावकीच्या राजकारणात एवढी मंडळी मदतीसाठी पुढे येतीलच याचा नेम नाही. तेव्हा अशा सोपस्कारात न जाता सरकारने तातडीने सरसकट हेक्टरी मदत जाहीर केली पाहिजे. मराठवाड्यातील शेतकरी, पशुधन पालक, छोट्या व्यावसायिकांना तर झुकते माप दिले पाहिजे. कारण, हा प्रदेश अवर्षणप्रवण आहे. केवळ खरिपावर गुजराण करणारा आहे. 

परवाच्या चक्रीवादळाने केवळ पिकांची नासाडीच केली नाही, तर जमीनच नापीक करून टाकली आहे. नद्यांचे प्रवाह बदलल्याने जमिनी वाहून गेल्या आहेत. जलयुक्त शिवार योजनेत नदीपात्राचे रुंदीकरण करताना सगळा भराव नदीकाठावर टाकण्यात आला. तो यंदाच्या महापुरात पुन्हा नदीत आल्याने नदीकाठावरच्या जमिनीची प्रचंड हानी झाली. हे नुकसान सरकारी यंत्रणांना मोजता येणारे नाही की, निकषात बसणारे. त्यामुळे विमा कंपन्यांकडे बोट दाखवून सरकारला आपला हात सोडवता येणार नाही. नुकसानीच्या किमान तीनपट रक्कम देतानाच ज्या शेतकऱ्यांनी पीककर्ज काढले असेल आणि ते पीक ५० टक्के वाया गेले असेल, तर संबंधित शेतकऱ्याचे पीककर्ज माफ करून टाकायला हवे.

एनडीआरएफच्या निकषात ही बाब बसू शकते. सरकारने २९ ऑगस्ट २०१९ रोजी काढलेल्या शासन निर्णयात तसा उल्लेख आहे. सणासुदीचे दिवस तोंडावर आहेत. कोरोनामुळे लांबलेली पोरीबाळांची लग्ने उरकायची आहेत. थकलेल्या कर्जाची परतफेड बाकी आहे. तेव्हा निसर्गाने जे हिरावून नेले त्याची परतफेड सरकारने करावी, ही अपेक्षा रास्त आहे. लाखो शेतकरी कुटुंबीयांसाठी एवढे मागणे लई नाही.

टॅग्स :RainपाऊसCyclone Gulabगुलाब चक्रिवादळMaharashtraमहाराष्ट्र