शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय: गांधारीचा शकुनीला शाप? अफगानिस्तानात जे घडतेय ते पाहून शांततेची शक्यता नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 07:54 IST

तालिबान आणि इस्लामिक स्टेट-खुरासान या दोन्ही संघटना एकमेकींच्या कट्टर वैरी आहेत. दोन वर्षांपूर्वी अमेरिकन व अफगाण राष्ट्रीय सैन्याने इस्लामिक स्टेट-खुरासानचा जवळपास बीमोड केला होता.

तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यानंतर भारतात समाजमाध्यमांमध्ये एक पोस्ट खूप व्हायरल झाली. ‘गांधार नरेश, तुझ्यामुळे माझ्या शंभर पुत्रांचा जीव गेला, त्यामुळे यापुढे तुझा देश कधीही शांती अनुभवणार नाही!’ असा शाप कौरव-पांडव युद्धाच्या समाप्तीनंतर गांधारीने शकुनीला दिला होता आणि त्या शापामुळेच अफगाणिस्तान सतत धगधगत आहे, अशा आशयाची ती पोस्ट आहे. यामधील विनोदाचा भाग सोडून द्या; पण अफगाणिस्तानात गत काही वर्षांपासून जे काही घडत आहे ते बघू जाता, त्या देशाला नजीकच्या भविष्यात शांतता लाभण्याची दुरान्वयानेही शक्यता दिसत नाही. विशेषतः गुरुवारी काबूल विमानतळावर झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर तर येथून पुढे अफगाणिस्तानचा प्रश्न अधिकाधिक चिघळण्याचीच चिन्हे दिसू लागली आहेत.

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेद्वारा काबूल विमानतळावर हल्ला होऊ शकतो, अशी भीती अमेरिका आणि ब्रिटनद्वारा व्यक्त केली गेली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांतच काबूल विमानतळावर घडविण्यात आलेल्या दोन आत्मघातकी बॉम्बस्फोटांमध्ये १३ अमेरिकन सैनिकांसह किमान ११० जण ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. तालिबाननेही या हल्ल्यासाठी इस्लामिक स्टेटच्या खुरासान शाखेलाच जबाबदार ठरविले आहे. तालिबान आणि इस्लामिक स्टेट-खुरासान या दोन्ही संघटना एकमेकींच्या कट्टर वैरी आहेत. दोन वर्षांपूर्वी अमेरिकन व अफगाण राष्ट्रीय सैन्याने इस्लामिक स्टेट-खुरासानचा जवळपास बीमोड केला होता. त्यामध्ये तालिबानचाही हातभार लागला होता. मात्र, आता अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर ती संघटना पुन्हा तोंड वर काढू लागल्याचे दिसत आहे. काबूल विमानतळावरील भीषण स्फोटांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती होते की काय, अशी शंका वाटू लागली आहे. वीस वर्षांपूर्वी अल कैदा या दहशतवादी संघटनेने अमेरिकेवर भीषण दहशतवादी हल्ला चढवला होता. तेव्हा ९/११ या नावाने इतिहासात नोंद झालेल्या त्या हल्ल्याचा सूड उगवण्यासाठी अमेरिकेने तालिबानच्या नियंत्रणाखाली असलेल्या अफगाणिस्तानवर भीषण हल्ला चढवला आणि अल कैदाला आश्रय दिलेल्या तालिबानच्या सत्तेचे उच्चाटन केले. यथावकाश अमेरिकेने अल कैदाचा सर्वेसर्वा असलेल्या ओसामा बिन लादेनलाही यमसदनी धाडले; परंतु या सव्यापसव्यात अमेरिकन सेना तब्बल वीस वर्षे अफगाणिस्तानात अडकून पडली. शेवटी ज्यांना सत्तेतून घालवले त्या तालिबानसोबतच वाटाघाटी करून अमेरिकेला अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधावा लागला.

आज पुन्हा एकदा तालिबान अफगाणिस्तानात सत्तेत आहे आणि अल कैदाच्या जागी इस्लामिक स्टेट-खुरासन ही दहशतवादी संघटना अमेरिकेला आव्हान देऊ बघत आहे. हे झाले साम्य! फरक हा आहे की, २००१ मध्ये तालिबान अल कैदाच्या सोबत होते, तर यावेळी इस्लामिक स्टेट-खुरासन तालिबानलाही आव्हान देत आहे. त्यामुळे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने अमेरिका व तालिबान एकमेकांना सहकार्य करतील का आणि अल कैदाप्रमाणे इस्लामिक स्टेट-खुरासनचा बंदोबस्त करण्यासाठी अमेरिका पुन्हा एकदा स्वतःला अफगाणिस्तानात अडकवून घेईल का, हे प्रश्न काबूल विमानतळावरील हल्ल्यामुळे उपस्थित झाले आहेत. काबूल विमानतळावरील हल्ल्याची ९/११ सोबत तुलना केली जाऊ शकत नाही, हे खरे आहे. मात्र, अफगाणिस्तानातून सैन्य काढून घेताना केलेल्या घिसाडघाईमुळे अडचणीत सापडलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावरील देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय दबाव काबूल विमानतळ हल्ल्यामुळे निश्चितच वाढलेला आहे. घटती लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी ते इस्लामिक स्टेट-खुरासानला शिंगावर घेण्याचा धोका पत्करतील का, हे बघावे लागेल. बायडेन यांनी तो धोका पत्करून पुन्हा अफगाणिस्तानात सैन्य उतरवायचे ठरवल्यास, त्यांना एकाच वेळी तालिबान, अल कैदा आणि इस्लामिक स्टेट-खुरासानसोबत लढावे लागेल. त्यामुळे बायडेन यांच्याद्वारा तो मार्ग स्वीकारला जाण्याची शक्यता फार कमी आहे. प्रशासनाचा अननुभव, आर्थिक तंगी, जगातील बहुतांश देश अंतर राखून, या पार्श्वभूमीवर तालिबानला हे आव्हान पेलणे सोपे सिद्ध होणार नाही. त्याचाच दुसरा अर्थ हा की, अफगाणिस्तानच्या नशिबी आणखी एक रक्तरंजित पर्व लिहिलेले आहे! गांधारीने शकुनीला खरोखरच शाप दिला होता की नाही, हे तर आपल्याला माहीत नाही; परंतु अफगाणी जनतेच्या नशिबात आणखी काही काळ शांतता, स्वस्थता नाही, ही मात्र काळ्या दगडावरची रेघ दिसत आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान