Editorial: Four Wisdom Stories on coronavirus pandemic | संपादकीय: शहाणपणाच्या चार गोष्टी

संपादकीय: शहाणपणाच्या चार गोष्टी

स्मशानभूमीत चिता पेटवायला जागा मिळेनाशी झालीय, दफनभूमी कमी पडायला लागल्या आहेत, रोज लाखोंच्या संख्येत नवे रुग्ण निष्पन्न होताहेत आणि राज्या-राज्यांमध्ये शेकडोच्या संख्येने जीव जाताहेत. अशावेळी निवडणुकांमधील विजय हाच सर्व समस्यांवरील तोडगा मानणाऱ्या सत्ताधाऱ्यांना लोकांच्या जगण्या-मरण्यापेक्षा आणखी निवडणुका जिंकणे महत्त्वाचे वाटते. विजय ज्यांच्या दृष्टिपथात नाही, ते उठताबसता सत्ताधाऱ्यांवर टीका करतात. औषधे, इंजेक्शन्स, ऑक्सिजन वगैरेसाठी राज्या-राज्यांचे मुख्यमंत्री पंतप्रधानांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करताहेत, तर त्यांचे कार्यालय माननीय पंतप्रधान निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याचा उलटा निरोप देताहेत. असा निरोप आला म्हणून सायंकाळपर्यंतही वाट न पाहता मुख्यमंत्र्यांचे कार्यालय लगेच त्या उदासीनतेची माहिती माध्यमांना देण्याची घाई करतात. केंद्रातील मंत्री त्यांना राजकीय उत्तरे देण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात.

एक कॅबिनेट मंत्री केंद्र सरकारवर गंभीर आरोप करण्यात दिवस घालवतात, तर राज्याचे माजी मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाच्या कार्यालयात येऊ पाहणारा इंजेक्शनचा साठा व उत्पादकाला पोलिसांनी अडवले म्हणून पोलीस ठाण्यात रात्रीचा दिवस करतात. जनतेचे कैवारी म्हणून मिरवणाऱ्या, भाग्यविधाते म्हणून मतदारांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे हे वागणे शिसारी आणणारे नाही तर काय! काेरोना विषाणूच्या फैलावामुळे समस्त मानवजातीवरच महाभयंकर संकट कोसळलेले असतानाचे हे किळसवाणे राजकारण, आरोप-प्रत्यारोपाची नोंद इतिहास सुवर्णाक्षरांनी करणार नाही, याची या सर्वांनी गंभीर नोंद घ्यायला हवी. दुसरीकडे या सगळ्या गोष्टींबद्दल सन्माननीय पुढाऱ्यांना योग्य ती समज देण्याची ज्यांच्यावर जबाबदारी ती लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणविणारी माध्यमेही भीती विकण्यातच व्यस्त आहेत. आधीच भेदरलेल्या सामान्यांवर पुन्हा पुन्हा ब्रेकिंग न्यूज, ‘आताची सर्वांत मोठी बातमी’चा मारा सुरू आहे. जिवंतपणी व मृत्यूनंतरही सर्वसामान्यांच्या नशिबी कुत्तरओढ येत असेल तर माध्यमांनी ते लोकांपर्यंत पोहोचवलेच पाहिजे; पण ते अत्यंत संयत पद्धतीने. त्याऐवजी पिसाटल्यासारखे वृत्तांकन होत असल्यामुळेच लोक माध्यमांनाच क्वाॅरंटाइन करण्याची मागणी करू लागलेत, हे काही चांगले लक्षण नाही. क्षेत्र कोणतेही असो, लोकांना विकण्याच्या दोनच गोष्टी असतात, स्वप्ने व भीती. राजकीय नेते व माध्यमेही तेच करताहेत. स्वप्ने विकली जात नाहीत असे दिसले की भीती विकायला सुरुवात होते. कोरोना विषाणूच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेने हेच अधोरेखित केले आहे. खरे पाहता असे व्हायचे काहीही कारण नाही. संक्रमण होऊ नये म्हणून स्वत:ची, कुटुंबाची काळजी घेतली, बाधितांपासून दूर राहिले, मास्क वापरला, लस घेतली, तरीही बाधा झालीच तर आहार, विश्रांती, डॉक्टरांनी दिलेला उपचार घेतला की पुरेसे आहे.

अवघा दीड-दोन टक्के मृत्यूदर असलेली ही महामारी दिसायलाच अक्राळविक्राळ आहे. मनाचा हिय्या केला तर विषाणूवर मात करणे सहज शक्य आहे. कोट्यवधींनी तशी मात केलीही आहे. मनात आणले तर राजकीय पक्षही बरेच काही करू शकतात. कार्यकर्त्यांची फळी विधायक कामांसाठी वापरू शकतात. ही लढाई प्रशासन एकाकी लढत असल्याचे चित्र आहे. त्यांच्यासोबत ही राजकीय फळी उभी राहू शकते. विषाणूची लक्षणे दर चार-सहा दिवसांत बदलत असल्याने हवालदिल झालेल्यांना घरोघरी जाऊन धीर दिला जाऊ शकतो. ‘घाबरू नका, सगळेजण मिळून संकटावर मात करू’, असे सांगू शकतात. आपली काळजी करणारे, धीर देणारे कुणीतरी आहे, ही भावनाच जगण्याची उमेद वाढविते. खरे पाहता आपल्यापैकी प्रत्येकाने, या महाभयंकर महामारीमुळे आपण सामूहिक तारतम्य, शहाणपण गमावले आहे का, हा प्रश्न स्वत:लाच विचारायला हवा. तसे नसते तर संकटकाळात विषाणूच्या जोडीला हा शह-काटशहाचा व स्पर्धेचा विंचू, असा दिसेल त्याला दंश करीत सुटला नसता.

कोरोना विषाणू हे माणसांवर कोसळलेले पहिले संकट नाही व ते शेवटचेही नसेल. यापेक्षा भयंकर संकटांचा, रोगराई, भूक, युद्धे व नैसर्गिक आपत्तींचा सामना पृथ्वीतलावरील माणसांनी हातात हात घालून, एकमेकांना धीर देऊन केला आहे. पक्षीय मतभेद विसरून राजकारणही अशा संकटावेळी बदलले आहे, राष्ट्रीय सरकारांचेही प्रयोग झाले आहेत. हा विषाणूही घर बांधून राहणारा नाही. लवकरच स्थिती सामान्य होईल. जगण्याचे रहाटगाडगे पुन्हा पूर्वपदावर येईल. तेव्हा मागे वळून पाहताना आपण या आपत्तीचा सामना एकजुटीने, धीरोदात्तपणे, संयमाने केला, आजारी बिछाने आपुलकीने सजवले, एवढी नोंद तरी इतिहासात व्हावी.

Web Title: Editorial: Four Wisdom Stories on coronavirus pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.