शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
2
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
3
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
4
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
5
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
6
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
7
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
8
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
9
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
10
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
11
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
12
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
13
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
14
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
15
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
16
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
17
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
18
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
19
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
20
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...

संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 08:51 IST

मंत्रिमंडळाच्या गेल्या दोन बैठकांमध्ये तब्बल ७४ निर्णय झाले. ते मतांसाठी आहेत हे अजिबात लपवून ठेवलेले नाही.

विधानसभा निवडणूक अगदीच तोंडावर आहे. राज्यातील महायुती सरकारला मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे, निवडणुकीत मतांचे भरघोस पीक देणारे निर्णय घेण्यासाठी आणखी फारतर दोन आठवडे मिळतील. त्यानंतर आचारसंहिता लागू होईल, म्हणूनच गेल्या काही बैठकांमध्ये सरकारने मतांची गणिते डोळ्यासमोर ठेवून निर्णयाचा धडाका लावला आहे. कालच्या बैठकीत संत नरहरी सोनार यांच्या नावाने सोनार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ, आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका महामंडळ आणि बार्टी किंवा सारथी, महाज्योती संस्थांच्या धर्तीवर बंजारा समाजासाठी वनाटी, म्हणजे वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या आधीच्या मंत्रिमंडळ बैठकीत भगवान परशुराम यांच्या नावाने ब्राह्मण समाजासाठी, तर वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या नावाने राजपूत समाजासाठी असेच महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय झाला. त्याशिवाय, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, कोतवाल, अंगणवाडी सेविका, ग्राम रोजगार सेवक, होमगार्ड, अशा घटकांना खूश करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या गेल्या दोन बैठकांमध्ये तब्बल ७४ निर्णय झाले. ते मतांसाठी आहेत हे अजिबात लपवून ठेवलेले नाही.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या देशभर चर्चेत आहे. तिचा प्रचार व अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री, महायुतीमधील तिन्ही पक्षांचे सगळेच नेते रात्रीचा दिवस करताना दिसत आहेत. कारण, लोकसभा निवडणुकीतील पीछेहाट भरून काढण्याचे आणि राज्यातील सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान महायुतीला पेलायचे आहे. त्यासाठी प्रयत्नांची कोणतीही कसर ठेवायची नाही, अशा तडफेने काम सुरू आहे. सोमवारच्या बैठकीत आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला. धार्मिक व वैज्ञानिक महत्त्व लक्षात घेता देशी वंशाच्या गाईला राज्यमाता-गोमातेचा दर्जा द्यायचा आणि तिच्या संगोपनासाठी गोशाळा, गोरक्षण चालविणाऱ्या संस्थांना आर्थिक पाठबळ देण्याचा हा निर्णय या क्षेत्रात काम करणाऱ्यांना सुखावणारा आहेच. योगायोगाचा भाग म्हणजे लाडक्या बहिणींना सरकार दरमहा पंधराशे रुपये देत आहे आणि देशी गाईच्या सांभाळासाठीही रोज पन्नास रुपये म्हणजे महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत. यानिमित्ताने गुजरात, उत्तराखंड अशा राज्यांनी गोहत्येसाठी जन्मठेपेसारखी जी पावले उचलली, त्या वाटेवर महाराष्ट्रानेही पाऊल टाकले आहे. अर्थात, सरकारच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित होऊ शकतात. सरकारने जिवंत माणसांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत, त्यांचे जगणे सुखी व आनंदी बनवावे की, भावनिक मुद्द्यांवर पैसा खर्च करावा? पुरोगामी, विचारसंपन्न महाराष्ट्रात राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, रमाबाई आंबेडकर अशा अनेक कर्तृत्ववान माता होऊन गेल्या. त्यांनी प्रगत समाजाची पायाभरणी केली. या सगळ्या राज्यमातांचे विचार पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन देण्याऐवजी राज्य सरकार गाईला राज्यमातेचा दर्जा देत असेल, तर लोक प्रश्न विचारणारच. अर्थात अशा प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी राज्यकर्त्यांनी नक्कीच ठेवली असणार.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गाईला देवत्व देण्यास विरोध दर्शविताना तिला उपयुक्त पशू म्हटले. त्यांचा त्यासंदर्भातील युक्तिवादही लक्षणीय होता. एखादा प्राणी कितीही उपयुक्त असला, तरी त्याला माणसांपेक्षा वरचे स्थान व पावित्र्य बहाल करणे हे विज्ञानवादी सावरकरांना अजिबात पटणारे नव्हते. त्याचाही विचार सरकारने हा निर्णय घेताना केला असेलच. गोरक्षणाबाबत कोणाचेही दुमत नाही. गाईपासून दुधदुभते मिळावे, गोमुत्र व शेणाच्या वापरातून शेतजमीन सुपीक व्हावी आणि महत्त्वाचे म्हणजे शेतीकामासाठी धष्टपुष्ट बैल उपलब्ध व्हावेत, यासाठी हे गोरक्षण अपेक्षित आहे. गाई-बैल किंवा कोणतीही शेतीउपयोगी जनावरे सांभाळणे अवघड बनल्याने शेतकऱ्यांचे गोरक्षणाकडे दुर्लक्ष झाले. त्याचा दुष्परिणाम म्हणजे शेतीत बैलांची संख्या घटत चालली आहे. त्यांची जागा ट्रॅक्टर व इतर यंत्रांनी घेतली आहे. अशा उद्देशाने गोरक्षण होत असेल, तर त्यावर कोणाला आक्षेप असण्याचे कारण नाही. सरकारच्या निर्णयाचा रोख मात्र गोरक्षण संस्थांकडे अधिक आहे. असो. यानिमित्ताने गोमातादेखील सरकारसाठी लाडकी झाली हे अधिक महत्त्वाचे. आता सरकारच्या पुन्हा सत्तेवर येण्याच्या अपेक्षांचे बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर असेल. सत्ताधारी महायुतीची अपेक्षा असेल की, गोमाता पुन्हा सत्तेवर येण्याचा आशीर्वाद देईल. घोडामैदान जवळ आहे. गोमातेचा आशीर्वाद मिळतो का, हे पाहण्यासाठी फार प्रतीक्षा करावी लागणार नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४