CoronaVirus: लॉकडाऊनमुळे वसुंधरा संवर्धन झालं; पुढे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 05:27 AM2020-04-22T05:27:40+5:302020-04-22T06:55:28+5:30

मानवाने चुका सुधारुन नवी वाट चोखाळावी. वसुंधरेचे संवर्धन होईल आणि निसर्गाचेच चक्र अव्याहतपणे त्याच्या कलेने फिरेल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याचा विचार केला तरी पुष्कळ झाले.

editorial on earth day and impact of coronavirus lockdown on nature | CoronaVirus: लॉकडाऊनमुळे वसुंधरा संवर्धन झालं; पुढे काय?

CoronaVirus: लॉकडाऊनमुळे वसुंधरा संवर्धन झालं; पुढे काय?

googlenewsNext

वसुंधरा दिनाचा आज सुवर्णमहोत्सव आहे. (२२ एप्रिल) अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याच्या दक्षिण किनाऱ्यावरील सांता बार्बरा येथे २८ जानेवारी १९६९ रोजी युनियन ऑईल प्लॅटफॉर्म कंपनीच्या डेपोतून तीस लाख गॅलन्स क्रुड ऑईल समुद्रात मिसळले, त्या दिवशी जगभर संतापाची लाट उसळली. जग सुन्न झाले. त्या तेलाच्या तवंगाने सुमारे दहा हजार पक्षी मृत्युमुखी पडले, डॉल्फिन, सीगल, समुद्रातील असंख्य जिवाणूंचा गळा घोटला गेला. त्या घटनेला १९७० मध्ये एक वर्ष पूर्ण झाले, तेव्हा त्याच्या निषेधार्थ निदर्शने करायला २२ एप्रिल हा दिवस निवडण्यात आला. अमेरिकेतील दोन कोटी जनता रस्त्यावर उतरली आणि वसुंधरेच्या संरक्षणासाठी मानवाने आता जागे होण्याची वेळ आल्याचे ओरडून सांगितले. त्याच वर्षापासून ‘अर्थ डे नेटवर्क’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. त्या घटनेला आज पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. दुर्दैवी योगायोग असा की, वसुंधरा दिनाचे महत्त्व जाणून सुमारे १९३ देशांत हा दिन साजरा होत असताना कोरोना विषाणूच्या संसर्गाने वसुंधराच ठप्प झाली आहे. ज्या मानवी प्रवृत्तीने वसुंधरेचे अतोनात नुकसान केले, त्या मानवालाच आज लॉकडाऊन व्हायची वेळ आली आहे.



संयुक्त राष्ट्रसंघाने वसुंधरा दिनाचे महत्त्व जाणून अर्थ डे नेटवर्क या संस्थेच्या पाच कलमी कार्यक्रमास मान्यता दिली. संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्य राष्ट्रांनी त्यास मान्यता दिली. जगभरातील बहुतांश सर्वच राष्ट्रांत वसुंधरा दिन पाळून तिच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी एकत्र येण्याचा संकल्प केला आहे. २२ एप्रिल रोजी अनेक कार्यक्रम जगभर होतात. त्यामध्ये तीस कोटींहून अधिक लोक भाग घेतात. परिसंवाद झडतात, नवे कार्यक्रम आखले जातात. जगाच्या कानाकोपऱ्यातून वसुंधरेच्या पर्यावरणास धोका निर्माण होईल अशी कृती करणाऱ्याविरुद्ध जागृती केली जाते. असंख्य लेख, विश्लेषणे, निबंध लिहिले जातात. व्याख्याने होतात. वसुंधरा दिनाचा सुवर्णमहोत्सव असताना यापैकी काही होणार नाही. कारण जेवढ्या राष्ट्रांत हा दिन साजरा होतो. त्यापेक्षा अधिक राष्ट्रे आज कोरोनाने त्रस्त झाली आहेत. अमेरिकेत चळवळीचा प्रारंभ झाला, ती अमेरिका सर्वाधिक बाधित झाली आहे. सुमारे साडेसात लाख लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे आणि चाळीस हजारांहून अधिक लोक मृत्युच्या खाईत लोटले गेले आहेत.



संपूर्ण जग थांबले आहे. दीड महिना झाला. आंतरराष्ट्रीय वाहतूक थांबली आहे. शंभराहून अधिक राष्ट्रांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. काही राष्ट्रांनी अंशत:, तर काहींनी प्रभावी भागात लॉकडाऊन जाहीर केला आहे. याचा परिणाम सुदैवाने वसुंधरा दिन ज्या कारणासाठी साजरा केला जातो त्यावर सकारात्मक परिणाम जाणवू लागला आहे. हवेचे प्रदूषण रोखले गेले आहे. पाण्याचे प्रदूषण थांबले आहे. ओझोनच्या स्तराचे काय होणार, वसुंधरेच्या पटलावर तयार होणाऱ्या कार्बनचा दुष्परिणाम अधिकच जाणवत राहणार, अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यावर कोरोनाच्या भीतीपोटी मात करण्यात एका असाध्य संसर्गाने यश आले आहे, पण ही कृती सकारात्मक किंवा शाश्वत नाही. कोरोना विषाणूवर एकदा का मात केली की, वसुंधरेवरील माणूस पुन्हा त्याच वेगाने प्रदूषण करण्यासाठी बाहेर पडेल. पुन्हापुन्हा त्याच चुका करण्यात येतील.



आज वसुंधरा दिन साजरा करण्यात येत नसला तरी त्या दिनानिमित्त जे अपेक्षित परिणाम होते ते मात्र जाणवू लागले आहेत. ते कायम राहणार नाहीत. मानवाला धडा मात्र शिकवून गेला आहे. आजवर एकोणपन्नास वेळा हा दिन साजरा करून जो परिणाम दृष्टिक्षेपात आला नव्हता तो आता आला आहे. यातून मानवाने चुका सुधारुन नवी वाट चोखाळावी. वसुंधरेचे संवर्धन होईल आणि निसर्गाचेच चक्र अव्याहतपणे त्याच्या कलेने फिरेल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. अमेरिकेने या कोरोना संसर्गाच्यावेळी अर्थव्यवस्थेला महत्त्व देऊन माणसांच्या जगण्याकडे दुर्लक्ष केले आहे. हेदेखील तितकेच भयावह आहे त्यामुळे वसुंधरा दिनानिमित्त संपूर्ण मानवी जीवनाच्या आणि निसर्गाच्या व्यवहाराकडे पाहताना फेरविचार केला पाहिजे, पण तसे करतील असे वाटत नाही. त्यामुळे आजच्यादिनी तरी वसुंधरा तू माफ कर !

Web Title: editorial on earth day and impact of coronavirus lockdown on nature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.