शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

आता आव्हान चंद्रावर उतरण्याचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 4:18 AM

भारताच्या अवकाश मोहिमेच्या दृष्टीनेही ही मोहीम खूप महत्त्वाची आहे. सोमवारी ‘जीएसएलव्ही’ या रॉकेटच्या मदतीने यान अवकाशात सोडण्यात आले.

डॉ. प्रकाश तुपे

चांद्रयान २ मोहिमेने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आतापर्यंत केवळ रशिया, अमेरिका व चीन या तीन राष्ट्रांनीच चंद्रावर यान उतरविली आहेत. या रांगेत आता भारत चौथे राष्ट्र असेल. या मोहिमेमुळे भारताने तांत्रिकदृष्ट्या मोठी झेप घेतली आहे. अवकाश मोहिमांबाबतीत आपण आता इतर राष्ट्रांच्या बरोबरीला आलो आहोत, हे या मोहिमेने दाखवून दिले आहे. आपणही करू शकतो, हा आत्मविश्वास मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आता भारताचा मानसन्मान आणखी वाढणार आहे.

ही मोहीम भारताच्या दृष्टीने खूपच महत्त्वपूर्ण आहे. मोहिमेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. यातील पहिले वैशिष्ट्य म्हणजे, चंद्रावरील दक्षिण ध्रुवाकडील भागात पहिल्यांदाच एखादे यान उतरणार आहे. यापूर्वीच्या मोहिमांमधील यान विषुववृत्तीय भागात उतरविली आहेत. दक्षिण धु्रवाकडील भागात विषुववृत्तीय भागाच्या तुलनेत सूर्यप्रकाश खूप कमी प्रमाणात येतो; तसेच ही मोहीम इतर राष्ट्रांच्या तुलनेत खूप कमी खर्चामध्ये होत आहे. भारताच्या दृष्टीने हा मुद्दा महत्त्वाचा आहे. चांद्रयान एक मोहिमेमध्ये भारताने चंद्रावर पाणी असल्याचा शोध लावला. त्याला अन्य राष्ट्रांनीही दुजोरा दिला. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर, भारताने चांद्रयान २ ची सुरुवात केली.

या मोहिमेमध्ये आता पुढचा टप्पा पार करायचा आहे. चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे थेट तेथील दगड-मातीचा अभ्यास करून, जगासमोर आणले जाणार आहेत. चंद्राबाबत सर्वांनाच खूप कुतूहल आहे. त्याचा जन्म कसा झाला असेल, याबाबत उत्सुकता आहे. दक्षिण ध्रुवावर सूर्यप्रकाश कमी असल्याने तेथील दगड-मातीच्या अभ्यासातून आपल्याला त्याचे पुरावे मिळू शकतील. या भागात खूप मोठी विवरे आहेत. तिथे सूर्यप्रकाश पोहोचतही नाही. तिथे पाणी असण्याची शक्यता आहे. या भागाचा अभ्यास अद्याप कुणीही केलेला नाही. तिथपर्यंत कोणतेही राष्ट्र पोहोचलेले नाही. आतापर्यंत जो अभ्यास झाला आहे, तो विषुववृत्तीय भागाचाच झाला आहे. त्यामुळे दक्षिण ध्रुवाचा अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे. त्यावरून सौरमाला कशी निर्माण झाली, याचे कोडेही उलगडू शकते. या भागात हेलियम थ्री हा वायूही आहे. हा वायू इंधन म्हणून वापरला जातो. त्याचा जर शोध लावण्यात आपण यशस्वी झालो, तर हे खूप मोठे यश असेल. चंद्रावर वस्ती करण्यासाठी मानवाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने पाणी आणि इंधनाची उपलब्धता असल्याचे सिद्ध झाल्यास ते अनन्यसाधारण ठरेल. चंद्रावर मानवी वस्ती करण्यासाठी या मोहिमेकडे मार्गदर्शक म्हणून पाहिले जाईल.

भारताच्या अवकाश मोहिमेच्या दृष्टीनेही ही मोहीम खूप महत्त्वाची आहे. सोमवारी ‘जीएसएलव्ही’ या रॉकेटच्या मदतीने यान अवकाशात सोडण्यात आले. या रॉकेटची क्षमता तब्बल ४ हजार किलो वजन वाहून नेण्याची आहे. यापूर्वी या रॉकेटने केवळ तीन वेळा उड्डाण केले आहे; पण त्या वेळी एवढे वजन कधी वाहून नेले नाही. जीएसएलव्हीपूर्वी ‘पीएसएलव्ही’ रॉकेटच्या साहाय्याने अनेक मोहिमा झाल्या आहेत. त्याला यशही मिळाले आहे. आपल्याला आता चंद्रावर माणूस उतरवायचा आहे. त्यासाठी ४ हजार किलो वजनाहून अधिक वजन वाहून नेणारे रॉकेट हवे होते. त्यादृष्टीने ‘जीएसएलव्ही’चे हे यश महत्त्वपूर्ण आहे; तसेच शुक्र, सूर्य मोहिमांसाठीही या रॉकेटचा वापर होणार आहे. या मोहिमांसाठी चांद्रयान २ ही चाचणी म्हणता येईल. या चाचणीत ‘जीएसएलव्ही’ यशस्वी ठरले आहे. शास्त्रज्ञांच्या मनातील भीती दूर होऊन, आत्मविश्वास दुणावला आहे.

चांद्रयान २ मोहिमेने आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताला सिद्ध केले आहे. या मोहिमेसाठी वापरण्यात आलेले क्रायोजेनिक इंजीन भारतातच बनविण्यात आले आहे. ते अत्यंत सुरक्षित असल्याचे आजच्या यशस्वी उड्डाणावरून स्पष्ट झाले आहे. सप्टेंबर महिन्यात यान चंद्रावर उतरणार आहे. यापूर्वी रशिया, चीन, अमेरिका या राष्ट्रांना कधीही पहिल्या प्रयत्नात चंद्रावर सुरक्षितपणे उतरता आले नाही. नंतरच्या प्रयत्नांनंतर त्यांना यश मिळाले आहे. चंद्रावर हळुवार उतरण्यामध्ये ५० टक्केच यश मिळते, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यादृष्टीने हा टप्पा भारतासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आपल्यासमोरही चंद्रावर सुरक्षितपणे, हळुवार उतरण्याचे आव्हान असेल. हे जर आपण पहिल्याच प्रयत्नात करू शकलो, तर भारतासाठी हा खूप मोठा सन्मान असेल. कारण, हे पहिल्यांदाच घडलेले असेल.

चांद्रयान २ मोहिमेच्या माध्यमातून भारताने तांत्रिकदृष्ट्या मोठी झेप घेतली आहे. इतर देशांच्या तुलनेत आपल्या अवकाश मोहिमा उशिरा सुरू झाल्या. पण त्यानंतर अत्यंत कमी कालावधीत भारताने मिळविलेले हे यश उल्लेखनीय आहे. आता आपल्याला चंद्रावर माणूस उतरवायचा असून त्यातही नक्की यश मिळेल, याची खात्री पटली आहे. त्यामध्ये जीएसएलव्हीच्या यशाचा वाटा मोठा असेल. आपल्या बहुतेक मोहिमा यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळे इतर राष्ट्रेही भारताकडे विश्वासाने पाहू लागली आहेत.

(लेखक ज्येष्ठ खगोलतज्ज्ञ आहेत)

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रो