संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 06:40 IST2025-05-09T06:39:45+5:302025-05-09T06:40:15+5:30
जीवित वा वित्तहानीचे खरे तपशील जगासमोर येण्याची शक्यता कमी असली आणि या स्फोटांमागे भारत असल्याची कोल्हेकुई पाकिस्तान करीत असला तरी प्रत्यक्षात तिथे जे पेरले तेच उगवत आहे.

संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
पहलगाम अतिरेकी हल्ल्याला प्रत्त्युत्तर म्हणून राबविलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर जणू युद्धाला तोंड फुटले आहे. हे युद्ध काहीसे उघड आणि बऱ्यापैकी छुपे आहे. भारत व पाकिस्तान हे दोन्ही देश अण्वस्त्रधारी असल्यामुळे अवघ्या जगाला युद्धाच्या परिणामांची चिंता आहे. भारताच्या लष्करी मोहिमेनंतर दुसन्या दिवशीच्या घडामोडी गंभीर आहेत. गुरुवारी सकाळी पाकिस्तानातील लाहोर, कराची, गुजरानवाला, रावळपिंडी, चकवाल, अटक, बहावलपूर, छोर, मियांवाली अशा अनेक शहरांमध्ये स्फोट झाले. यातील जीवित वा वित्तहानीचे खरे तपशील जगासमोर येण्याची शक्यता कमी असली आणि या स्फोटांमागे भारत असल्याची कोल्हेकुई पाकिस्तान करीत असला तरी प्रत्यक्षात तिथे जे पेरले तेच उगवत आहे.
'बलुचिस्तान लिबरेशन आर्मी' प्रमाणेच सिंधुदेश व खैबर पख्तूनख्वा प्रांत स्वातंत्र्यासाठी लढत आहेत. तिथल्या फुटीर संघटना सशस्त्र संघर्ष करीत आहेत. 'बीएलए'ने गेल्याच महिन्यात संपूर्ण रेल्वेगाडी ताब्यात घेऊन पाक सरकारची भंबेरी उडवून दिली होती. पहलगाम नरसंहाराच्या मुद्यावर भारताने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर या संघटना नव्याने सक्रिय झाल्या नाहीत तरच नवल. अनेक आघाड्यांवर लढावे लागण्याची वेळ पाकिस्तानने स्वतःच्या कर्माने ओढवून घेतली आहे. बुधवारी पहाटे भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पाकिस्तानचा पंजाब प्रांत, तसेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये उडालेला हाहाकार, नागरिकांचे सुरक्षित स्थळी पलायन, कुख्यात दहशतवाद्यांना भरलेली धडकी, मसूद अझरच्या परिवारातील दहाजणांच्या मृत्यूची त्यानेच दिलेली कबुली, लष्कर-ए-तोयबा किंवा जैश-ए-महंमद या प्रतिबंधित संघटनांच्या मुख्यालयांची दुर्दशा अशा बातम्या जगभर पोहोचल्या आणि एक बाब स्पष्ट झाली की, भारताने टिपून टिपून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले असून, डझनावारी अतिरेक्यांना कंठस्नान घातले आहे. ही विनाशाची वस्तुस्थिती नाकारणेही पाकला शक्य नाही. कारण, आधुनिक शस्त्रास्त्रे वापरताना भारताने हल्ल्याचे चित्रणही केले आहे. आता पाकिस्तान प्रतिहल्ल्याचे धाडस करील का आणि तसा वेडेपणा केलाच तर भारताचा प्रतिसाद किती प्रलयंकारी असेल, यावर गंभीर मंथन सुरू आहे. काहींना वाटते की, भारताची एकूण ताकद पाहता असा वेडेपणा पाकिस्तान करणार नाही, तर अनेकांना पाक लष्कराच्या माथेफिरूपणावर विश्वास आहे. या दुसऱ्या गटाचा अंदाज थोडा खरा ठरला. बुधवारी पहाटेच नियंत्रण रेषेलगत जम्मू-काश्मीरमधील खेड्यांवर पाकिस्तानने हल्ला केला. त्यात काही निरपराध भारतीय नागरिकांचा मृत्य झाला. काही जखमी झाले.
युद्धाची परिस्थिती पाहता गावकऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला असता तर हे जीव वाचले असते. याशिवाय, गुरुवारी दुपारी भारतीय संरक्षण खात्याने स्पष्ट केले की, किमान १५ सीमावर्ती शहरांवर पाकिस्तानने क्षेपणास्त्रे व ड्रोनच्या साहाय्याने केलेले हल्ले क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेने हवेतच परतवून लावले, ड्रोन पाडले गेले. पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी जगासमोर सिद्ध करण्यासाठी आता त्या क्षेपणास्त्रांचा व ड्रोनचा मलबा जमा केला जात आहे. भारताचे संरक्षणकवच यशस्वी होत असताना पाकिस्तानची मात्र मोठी नाचक्की झाली आहे. भारतीय सीमेपासून जवळच्या लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टिम भारतीय ड्रोनने उद्ध्वस्त केली आहे. रावळपिंडीचे क्रिकेट स्टेडियम, तसेच आणखी काही शहरांमधील प्रमुख ठिकाणे भारतीय ड्रोनने लक्ष्य बनविली. एकंदरीत पाकिस्तानमध्ये हाहाकार उडाला आहे. पाक जनता भांबावली आहे, तर सरकार व लष्कर बिथरले आहे. आणखी एका आघाडीवर पाकिस्तान अडचणीत आहे. आता युद्धे केवळ रणांगणावर लढली जात नाहीत. किंबहुना रणांगणेच बदलली आहेत. युद्ध आता प्रोपगंडा व नरेटिव्हजचे असते. त्यासाठी सरकारी माध्यमांसोबतच सोशल मीडियाचा वापर केला जातो. प्रत्यक्ष युद्धातील हल्ले व प्रतिहल्ले, त्यातील जीवित व वित्तहानी, तिचे अर्थव्यवस्थेवरील परिणाम, नेते व अधिकाऱ्यांच्या भूमिका व प्रतिक्रिया अशा अनेक मुद्द्यावर ही माहितीची लढाई लढली जाते. दोन्ही देशांमध्ये सोशल मीडियावर ही माहितीची, नेमकेपणाने सांगायचे तर फेक न्यूज व फॅक्ट चेकची लढाई सुरू आहे आणि त्याच कारणाने प्रचंड प्रमाणात युद्धज्वरदेखील वाढला आहे. भारतात धार्मिक द्वेष वाढविणे हा सोशल मीडियावरील युद्धज्वराचा हेतू आपण समजून घेण्याची आणि तो हेतू साध्य होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे.