बंगलुरू दंगलीचं गांभीर्य ओळखायला हवं...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 04:52 AM2020-08-14T04:52:43+5:302020-08-14T04:55:00+5:30

बंगलुरूच्या दंगलीवरून भाजप आणि काँग्रेस यांच्यात जुंपली आहे. दोन्ही बाजूने आरोप सुरू झाले आहेत. राजकीय तवा तापू लागला आहे; पण आपण वातावरण अधिक कलुषित करीत आहोत, याचे भानही या नेत्यांना दिसत नाही. हे निंदनीय आहे.

editorial on banglore riots which took place after derogatory social media post | बंगलुरू दंगलीचं गांभीर्य ओळखायला हवं...

बंगलुरू दंगलीचं गांभीर्य ओळखायला हवं...

Next

एकेकाळी उद्यानांचे शहर म्हणून आणि गेल्या काही वर्षांत माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणजेच ‘आयटी हब’ बनलेले बंगलुरू शहर दंगली, हिंसाचार यांसाठी कधी ओळखले गेले नाही. शांत लोक, उत्तम हवा आणि फिरण्यास आसपास अनेक ठिकाणे, यामुळे ते आजही पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे; पण काही वर्षांत तिथे प्रचंड वस्ती झाली. चाळी आणि झोपडपट्ट्या पसरू लागल्या. अन्य महानगरांप्रमाणे या शहराचाही बराच भाग बकाल होत गेला. बेकारी, गुन्हेगारीदेखील वाढत गेली. बंगलुरूमध्ये मंगळवारी झालेल्या दंगलीची अनेक कारणे असली तरी वरील परिस्थितीही त्यास कारणीभूत आहे.



काँग्रेसच्या एका आमदाराच्या नातेवाइकाने अन्य धर्माच्या लोकांच्या भावना दुखावतील अशी पोस्ट फेसबुकवर पोस्ट केली आणि त्यातून शहराच्या अनेक भागांत दंगलीचा भडकाच उडाला. सोशल मीडियावरील पोस्टचा इतका भयंकर परिणामही होऊ शकतो, हे बंगलुरूमध्ये दिसले. त्या फेसबुक पोस्टची माहिती मिळताच हजारो लोक रस्त्यांवर उतरले आणि त्यांनी जाळपोळ, दगडफेक आणि मोडतोड सुरू केली. पोलिसांना गोळीबार करावा लागला; पण त्याआधी जमावाने केलेल्या दगडफेकीमध्ये ६० पोलीस जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी ११० दंगलखोरांना अटक केली, ती पोस्ट लिहिणाऱ्या तरुणालाही अटक केली आणि गुन्हेसुद्धा दाखल झाले; पण ही नंतरची कारवाई.



आता दंगलखोर आणि पोस्ट लिहिणाऱ्या तरुणावर खटले दाखल होतील. ते कोर्टात चालतील. कदाचित संबंधितांना शिक्षाही होईल; पण फेसबुक पोस्टची दखल घेऊन पोलिसांनी आधीच प्रतिबंधात्मक कारवाई केली असती, तर हा हिंसाचार आटोक्यात आला असता. शहर रात्रभर जळत राहिले नसते.
दीड तासात हजारो लोक रस्त्यांवर उतरून जाळपोळ, दगडफेक करीत असतील आणि त्याचा अंदाज पोलिसांना आधी येत नसेल, तर ते पोलीस यंत्रणेचेही अपयश म्हणायला हवे. ज्या भागातून दंगल सुरू झाली, तिथे रोजंदारीवरील कामगार, रिक्षावाले, घरगडी, असंघटित कामगार मोठ्या प्रमाणात राहतात. रोज सोशल मीडियावरील लिखाण वाचत बसणारा हा वर्ग नाही. त्या भागामध्ये कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. त्यामुळे लोक प्रचंड घाबरलेले आहेत. स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी, सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आणि संताप हे दोन्हीही आहे. त्यात फेसबुक पोस्ट आली. त्याचा फायदा उठवून त्यांना कोणीतरी भडकावले असणार, हे स्पष्ट दिसते.



या प्रकरणात सोशालिस्ट डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्षाचे आता नाव घेतले जात आहे. कट्टरतावादी म्हणून हा पक्ष ओळखला जातो. केरळपासून राजस्थान, हरयाणा, दिल्लीपर्यंत तो आता सक्रिय होत आहे. या पक्षाच्या बंगलुरूमधील नगरसेवकालाही अटक झाली असून, तोच दंगलीचा सूत्रधार आहे, असे पोलीस सांगत आहेत. त्या संघटनेवर बंदी घालण्याची भाषा तेथील गृहमंत्री करीत आहेत; पण अशा कृत्यांसाठी कुप्रसिद्ध असलेली संघटना, तिचे पदाधिकारी किंवा नगरसेवक यांच्यावर पोलीस यंत्रणेचे लक्षच नसते का? एरवी लहानसहान कार्यकर्त्यांमागे चौकशीचा ससेमिरा लावणारे पोलीस आणि सरकार या संघटनेकडे आतापर्यंत डोळेझाक करीत होते की काय? त्याहून गंभीर बाब म्हणजे एका काँग्रेस कार्यकर्त्याने फेसबुक पोस्ट आणि काही भागात निर्माण झालेला तणाव याची माहिती दंगल सुरू होण्याआधी पोलिसांना दिली होती. हे ज्या पोलिसांनी गांभीर्याने घेतले नाही, त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी.



या दंगलीतून दोन धार्मिक गटांमध्ये जो विद्वेष निर्माण झाला, ही खरी समाजासाठी अधिक चिंतेची बाब आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मजकूर टाकताना सर्वांनीच अधिक काळजी घ्यायला हवी आणि त्यातही मुख्य म्हणजे त्यावर पोलीस यंत्रणेचेही बारकाईने लक्ष हवे. सोशल मीडियावर काहीही मजकूर लिहिणे हाही गुन्हाच आहे आणि या मीडियामुळे पोलिसांपुढील आव्हाने वाढली आहेत. बंगळुरूची दंगल हे त्याचे उदाहरण आहे. ते गांभीर्यानेच घ्यायला पाहिजे.

Web Title: editorial on banglore riots which took place after derogatory social media post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.