बांगलादेशच्या अतिरेकाला आवर घालण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 06:21 IST2024-12-03T06:21:34+5:302024-12-03T06:21:55+5:30
बांगलादेशमधील अतिरेकी युनूस सरकारला एकटे पाडण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी त्यांची जागतिक पत वापरून अमेरिकेला आपल्या बाजूला केले पाहिजे!

बांगलादेशच्या अतिरेकाला आवर घालण्याची वेळ
प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार
जगाची धार्मिक घडी बिघडते आहे काय? अँमस्टरडॅमपासून पॅरिसपर्यंत आणि लंडन ते न्यूयॉर्कपर्यंत स्थलांतरितांचे हिंसक जमाव सध्या सभ्यतेवर हल्ले चढवत आहेत. बांगलादेशात अशा हिंसेने थैमान घातले आहे. बांगलादेशातील हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार नोबेल विजेते मोहम्मद युनूस ढाक्यात आल्यापासून त्या देशात फाळणीनंतरचा मोठा हिंसाचार उफाळला आहे.
युनूस यांना देण्यात आलेल्या नोबेल पुरस्काराच्या मानपत्रात म्हटले आहे, ‘या पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्ती सक्षम असून, चांगले आयुष्य जगण्याचा हक्क तिला आहे. संस्कृती आणि सभ्यतांच्या पलीकडे जाऊन युनूस आणि ग्रामीण बँकेने हे दाखवून दिले की अगदी गरिबातला गरीबसुद्धा त्याच्या विकासासाठी काम करू शकतो.’
- याच युनूस यांनी त्यांचा देश पाकिस्तानपासून मुक्त व्हावा यासाठी अमेरिकेत बांगलादेश माहिती केंद्र सुरू केले होते. आता त्यांनीच पाकिस्तानला समुद्रमार्ग खुला करून देऊन इस्लामाबादचे बाहुले व्हावे आणि वॉशिंग्टनच्या मांडीवर जाऊन बसावे? जगातील कठीण प्रश्न सोडवण्यासाठी शहाण्यासुरत्या स्वतंत्र, निष्ठावंत नेत्यांचा एक गट नेल्सन मंडेला यांनी ‘द एल्डर्स’ या नावाने स्थापन केला गेला. युनूस त्या गटाचे संस्थापक सदस्य होते. आता तेच बांगलादेशातील जातीय भेदभावाचे सारथ्य करत आहेत.
गेल्या चार महिन्यांत हिंदू आणि इतर अल्पसंख्य समुदायांच्या प्रमुख नेत्यांना हास्यास्पद कारणांसाठी गजाआड करण्यात आले. युनूस यांनी त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा सोडून दिलेली नाही. २००७ मध्ये त्यांनी नागरिक शक्ती पक्ष काढला. तो जन्मत:च मरण पावला इतकेच. सध्या चौऱ्यांशी वर्षांचे युनूस बांगलादेशातील मूलतत्त्ववादी उन्मादावर स्वार झाले आहेत. बांगलादेशाला पितृस्थानी असलेल्या आणि गेली कित्येक दशके मित्र असलेल्या भारताला त्यांनी टोकाचा तिरस्कार वाटणारा शत्रू केले आहे. त्या देशाच्या विकासासाठी भारताने उदारहस्ते १० अब्ज डॉलर्सची मदत केली हे ते विसरले. आपल्याला भारतातून २५ टक्के वीज मिळते हेही त्यांच्या लक्षात येत नाही.
पाकिस्तानच्या चिथावणीतून बांगलादेशात उसळलेला राग हसीना यांच्यापेक्षा भारताविरुद्ध जास्त आहे. युनूस यांनी तुरुंगातल्या भारतविरोधी नेत्यांना लगोलग मुक्त केले. त्यात माजी पंतप्रधान खलिदा झिया यांचाही समावेश होता. राजवटी बदलल्यानंतर धर्मनिरपेक्ष राजकारणाची जागा हिंदूंच्या नेतृत्वाखालील अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्याने घेतली गेली. हिंदूंनी प्रतिकार सुरू केल्यावर तो चिरडण्यात आला. बांगलादेशमधील ‘हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी काउंसिल’ने दिलेल्या माहितीनुसार पाच ऑगस्टपासून हिंदूंवर २ हजार हल्ले झाले. आता आपल्या शेजारी राष्ट्रात चाललेल्या वंशसंहाराचा सामना करण्याचे काम मोदी सरकारला करावे लागणार आहे.
देशातला दहशतवाद आटोक्यात आणण्यासाठी पाकिस्तान आणि बांगलादेशमधून येणाऱ्या घुसखोरांच्या मुसक्या आवळण्याची वेळ आली आहे, असे संघालाही वाटते. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी घुसखोरांविरुद्ध मोहीम सुरू केली होती. २०१४ साली एका प्रचारसभेत त्यांनी मनमोहन सिंग यांच्यावर बेकायदा घुसखोरांना संरक्षण देत असल्याचा आरोप केला होता. ‘बांगलादेशी घुसखोरांबद्दल आपण काय विचार करता? बांगलादेशींना भारतात महत्त्व आहे का?’
- असे प्रश्न त्यांनी त्यावेळच्या पंतप्रधानांना केले होते. स्वतः पंतप्रधान झाल्यानंतर आसाममधील पहिल्या सार्वजनिक सभेत त्यांनी म्हटले होते, ‘आसामी लोकांच्या भावना मी समजू शकतो. आसाममध्ये घुसखोरी करून त्रास देणाऱ्या बांगलादेशींना बाहेर काढण्याची व्यवस्था केली जाईल. मातृभूमीची सेवा करण्यासाठी मी घराबाहेर पडलो आहे आणि आसाम हीसुद्धा माझी मातृभूमीच आहे.’ बेकायदा घुसखोरी भाजपच्या निवडणूक प्रचारातलाही प्रमुख मुद्दा होता. ‘भाजपची सत्ता आली तर झारखंडमधील रोहिंग्या आणि बेकायदा बांगलादेशी बाहेर काढले जातील’ असे आश्वासन अमित शाह यांनी दिले होते. वेगवेगळ्या शहरांतील असे घुसखोर शोधण्याचे काम गृह मंत्रालयाने सुरू केले आहे.
‘घुसखोरांना हुसकावणे’ हेच मोदी यांच्याकडचे एकमेव शस्त्र नाही. आर्थिक नाकेबंदी केल्यास युनूस यांना हिंसाचाराला लगाम घालावा लागेल. शेख हसीना यांच्या १५ वर्षांच्या राजवटीत बांगलादेश भारताचा सर्वाधिक जवळचा मित्र झाला होता. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आठ अब्ज डॉलर्सचे कर्ज भारताने दिले होते. कामासाठी आणि सहलींसाठी बांगलादेशी मोठ्या संख्येने भारतात येत असतात. अनेकांसाठी कोलकाता हे दुसरे घर आहे. हिंदूंवर हल्ले सुरू झाल्याबरोबर भारत आणि ढाक्यातील व्हिसा केंद्र बंद करण्यात आले. त्याचा तिथल्या नागरिकांवर मोठा परिणाम झाला आहे.
बांगलादेशला एकटे पाडण्यासाठी मोदी यांनी त्यांची जागतिक पत वापरली पाहिजे. मोदी यांनी आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेल्या मैत्रीचा वापर करून लवकरात लवकर युनूस सरकारला असलेला अमेरिकेचा पाठिंबा काढून घेतला जाईल, याची तजवीज केली पाहिजे.
निवडणुकीच्या काळात ट्रम्प यांनी ‘एक्स’वर टाकलेल्या एका पोस्टमध्ये ‘बांगलादेशमधील हिंदू, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याकांवर होत असलेले हल्ले, जमावाकडून त्यांची होत असलेली लूटमार, रानटी हिंसा याचा मी कठोर शब्दांत निषेध करतो.’- असे लिहिले होते. त्याची त्यांना आठवण करून देण्याची वेळ आली आहे!