भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 06:22 IST2025-09-26T06:22:16+5:302025-09-26T06:22:43+5:30
भैरप्पा हे विलक्षण प्रतिभेचे लोकप्रिय लेखक खरेच, मात्र गेल्या दशकातले त्यांचे रूप वेगळे होते. त्यांच्या कादंबऱ्या समारोपाला ज्याप्रमाणे अनपेक्षित वळण घेत, तसेच काहीसे त्यांचेही झाले

भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
काही वर्षांपूर्वीची गोष्ट. पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी एस. एल. भैरप्पा आले होते. एका प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, ‘मी मूळचा मराठी आहे. पण कन्नडमध्ये लेखन करतो, असाच माझ्याबद्दल कर्नाटकमध्ये समज आहे!’ भैरप्पा हे मराठीच वाटावेत, एवढे त्यांचे मराठी माणसाशी घट्ट नाते होते. कर्नाटकनंतर त्यांचे सर्वाधिक चाहते महाराष्ट्रामध्येच होते. भैरप्पा गेल्यानंतर एक मोठा लेखक गेला, ही तर भावना मराठी माणसांची आहेच; पण त्याचवेळी आपल्या जवळचा माणूस गेला, असे दुःख आहे! ज्यांना वाचनाची आवड आहे, अशा मराठी घरात भैरप्पांची पुस्तकं नाहीत, असे शक्यतो होत नाही. ‘वंशवृक्ष’, ‘पर्व’, ‘जा ओलांडुनी’, ‘धर्मश्री’, ‘तंडा’, ‘काठ’, ‘सार्थ’, ‘मंद्र’, ‘तंतू’, ‘आवरण’, ‘सत्य आणि सौंदर्य’ यासारख्या त्यांच्या अनेक कादंबऱ्या आणि वैचारिक ग्रंथही मराठीत अनुवादित झाले. अनुवादाचे श्रेय उमा कुलकर्णी यांचे !
भैरप्पा गेले तेव्हा ९४ वर्षांचे होते. काळाचा मोठा तुकडा त्यांच्या वाट्याला आला. साठच्या दशकात त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि २०१७मध्ये त्यांची शेवटची कादंबरी आली. काळ बदलत गेला, मात्र भैरप्पांची लोकप्रियता तशीच राहिली. लोक वाचत नाहीत, असे म्हटले जात असताना, त्यांची पुस्तके मात्र बाजारात येताक्षणी विकली जात. भैरप्पांचे आयुष्य हाच खरे म्हणजे कादंबरीचा विषय. न कळत्या वयात आईचे छत्र हरपले. प्लेगच्या साथीत आई-भावंडे असे सगळेच गेल्यानंतर हा अनाथ मुलगा दिसेल त्या वाटेने भटकत राहिला आणि उत्तुंग प्रतिभेचा लेखक झाला. विचारवंत प्राध्यापक झाला. हा प्रवास सोपा नव्हता. पोटासाठी मुंबई गाठली. रेल्वेत पडेल ती कामे केली. शिक्षणासाठी कर्नाटकात परतल्यानंतर हा मुलगा स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घेतो काय, पुढे तत्त्वचिंतनामध्ये रमतो काय, तत्त्वज्ञानामध्ये डॉक्टरेट मिळवतो काय, हा सगळाच प्रवास चित्तथरारक. भैरप्पांच्या आत्मचरित्रात हा सगळा प्रवास येतो.
मुक्काम करण्यावर त्यांचा विश्वास कधीच नव्हता. ते कायम स्वतःला प्रवासी आणि पर्यटक मानत आले. विघटन झाल्यानंतर रशियामध्ये गेले. पेरूमध्ये गेले. मानवी संस्कृतीचा शोध घेत राहिले. हस्तिदंती मनोऱ्यात भैरप्पा कधी रमले नाहीत. ते भटकत राहिले. ‘माणूस’ हा त्यांच्या विचारप्रक्रियेचा केंद्रबिंदू होता. कुतूहल ही त्यांच्या लेखनाची प्रेरणा होती. त्यामुळेच त्यांना रामायण-महाभारताइतकाच सोव्हिएत रशियाच्या विघटनामध्येसुद्धा रस होता. आपल्या गावातल्या शेतमजुराइतकाच व्हिएतनाममधील माणूस त्यांना जवळचा वाटत असे. त्यातून ते नवनव्या गोष्टींकडे कुतूहलाने पाहात राहिले. त्याविषयी लिहित राहिले. फार वेगळ्या प्रकारचे जगणेही त्यांच्या वाट्याला आले! त्यातून त्यांच्या लेखनाचा एक वेगळा पोत तयार झालेला दिसतो. जमिनीवरचे आयुष्य आणि तत्त्वज्ञानाची जोड यामुळे त्यांच्या लेखनाने विलक्षण उंची गाठली. त्यांच्यापूर्वी ‘महाभारता’वर अनेकांनी लिहिले. मात्र, भैरप्पांनी जे लिहिले, ते अविस्मरणीय ठरले. याचे कारणही हेच.
समाजशास्त्रीय आणि मानववंशशास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांनी महाभारताकडे पाहिले. त्यासाठी द्वारकेपासून ते कुरूक्षेत्रापर्यंत अनेक ठिकाणी ते स्वतः भटकले. त्या अभ्यासातून आणि तत्त्वचिंतनातून ‘पर्व’ साकारली. महाभारताला त्यामुळे मानवी चेहरा मिळाला. अशा नजरेने महाभारतातील व्यक्तिरेखांकडे तोवर कोणी पाहिले नव्हते. हे अनेक कादंबऱ्यांबद्दल सांगता येणे शक्य आहे. ‘दाटू’ ही त्यांची अशीच गाजलेली कादंबरी. चौदा भारतीय भाषांमध्ये तिचा अनुवाद झाला. जातीव्यवस्थेचे इतके पापुद्रे त्यांनी बारीकसारीक प्रसंगांतून उलगडून दाखवले आहेत की, थक्क व्हायला होते. भैरप्पा हे कन्नडमधील सर्वात लोकप्रिय लेखक. त्यांच्या पुस्तकांचे विविध भाषांमध्ये अनुवाद झाले. त्यांच्या ‘आवरण’ या कादंबरीच्या दहा आवृत्त्या अवघ्या पाच महिन्यांत आल्या. भारतीय साहित्यातील हा विक्रम मानला जातो. ‘उत्तरकांड’ ही त्यांची अखेरची कादंबरी. ती ‘रामायणा’वर आहे. हे पुस्तक आले आणि काही तासांमध्ये सगळ्या प्रती विकल्या गेल्या. भैरप्पांच्या अनेक कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले. त्या चित्रपटांनाही अनेक पुरस्कार मिळाले. भैरप्पा हे विलक्षण प्रतिभेचे लोकप्रिय लेखक खरेच, मात्र गेल्या दशकातले त्यांचे रूप वेगळे होते. त्यांच्या कादंबऱ्या समारोपाला ज्याप्रमाणे अनपेक्षित वळण घेत, तसेच काहीसे त्यांचेही झाले. मात्र, या लेखकाने, त्यांच्या प्रत्येक कादंबरीने वाचकांना श्रीमंत केले. भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही!