अग्रलेख: प्रश्न ‘फातिमा’चा नाहीच पण, या खोडसाळपणाची दखल घेतली नाही तर काळ सोकावेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 08:37 IST2025-01-11T08:37:29+5:302025-01-11T08:37:59+5:30
फातिमा शेख अशी कोणी व्यक्ती होऊनच गेली नाही, अशी मुक्ताफळे मंत्रालयाच्या कुण्या सल्लागाराने उधळली आहेत

अग्रलेख: प्रश्न ‘फातिमा’चा नाहीच पण, या खोडसाळपणाची दखल घेतली नाही तर काळ सोकावेल!
महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या समकालीन फातिमा शेख हे एक काल्पनिक पात्र आहे. प्रत्यक्षात अशी कोणी व्यक्ती होऊनच गेली नाही, अशी मुक्ताफळे दिलीप मंडल नावाच्या केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या कुण्या सल्लागाराने उधळली आहेत. वीसेक वर्षांपूर्वी हे नाव कोणाला माहिती नव्हते आणि हे काल्पनिक पात्र आपणच समोर आणले होते, असा हास्यास्पद दावादेखील या महाशयांनी केला आहे. हास्यास्पद यासाठी की, म. फुले यांनी काढलेल्या शाळेत फातिमा शिक्षिका होत्या.
मुंबईत त्यांनी दोन शाळा काढल्यामुळे त्यांना पहिली मुस्लीम शिक्षिका म्हणून गाैरविले जाते. सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून त्या बहुजन व अंत्यजांच्या शिक्षणासाठी झटत होत्या. फुले दाम्पत्याला घर सोडावे लागल्यानंतर फातिमांचे बंधू उस्मान शेख यांच्याकडे ते राहत होते. ज्योतीरावांना नायगाव येथून लिहिलेल्या पत्रांमध्ये सावित्रीबाईंनी फातिमाचा उल्लेख केलेला आहे. थोडक्यात सावित्रीबाईंप्रमाणेच फातिमा यादेखील तमाम स्त्रीवर्गासाठी प्रेरणास्रोत आहेत. एरव्ही अशा वक्तव्याची फार दखल घ्यायची नसते. परंतु, या मंडलांच्या नावाला केंद्रीय नभोवाणी मंत्रालयाची प्रतिष्ठा व विश्वासार्हता जोडली गेली असल्याने या खोडसाळपणाची दखल घेतली नाही तर काळ सोकावेल.
आज फातिमा शेख आहेत; उद्या मुक्ता साळवे असतील, ताराबाई शिंदे असतील किंवा सावित्रीबाईंच्या कार्यावरही पुन्हा शेणमातीची राळ उडविण्याचा प्रयत्न होईल. पाशवी प्रचारतंत्राच्या माध्यमातून खोट्याचे खरे केले जाईल. टोकाच्या धार्मिक विद्वेषाचे सध्याचे वातावरण पाहता फातिमा शेख यांचे ऐतिहासिक योगदान नाकारणे वरकरणी सहज वाटत असले तरी तसे होणार नाही. कारण, फुले-शेख यांच्या कर्तृत्वाच्या एकोणिसाव्या शतकात स्त्रियांना शिक्षणाचा हक्क, बालविवाहांना प्रतिबंध ते विधवा विवाहाला मान्यता अशा सुधारणांची मालिका गुंफली गेली. त्या सुधारणा ब्रिटिशांनी केल्या असल्या तरी पश्चिमेकडील फुले दाम्पत्य, पंडिता रमाबाईंपासून ते पूर्वेकडील राजा राममोहन राॅय, पं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्यापर्यंत सुधारकांनी पुढाकार घेतला, हा इतिहास आहे. असा इतिहास खोडून काढता येत नसला की त्याबद्दल बुद्धिभेद करता येतो. संशय पेरता येतो. खडा टाकून अदमास घेता येतो. मंडल यांनी तेच केले आहे.
मुळात हा प्रश्न केवळ फातिमा शेख किंवा अन्य व्यक्तींचा नाहीच. स्त्रियांचे समाजातील स्थान, त्यांची प्रगती, त्यांचे स्वावलंबन आणि समाजाचे अर्धे आकाश असे सक्षम झाल्याने एकूणच समाज अधिकाधिक उन्नत होण्याशी या विषयाचा संबंध आहे. माणूस म्हणूनही स्त्रीला दुय्यम वागणूक देण्याच्या मनोवृत्तीशी याचा अधिक संबंध आहे. स्त्री विश्वासपात्र नाही, चंचल आहे. ती शिकली तर विचार करू लागेल, बंडखोर बनेल. रूढी-परंपरा व पुरुषी वर्चस्व झुगारून देईल, म्हणून तिला शिकू द्यायचे नाही, अशा खुळचट व प्रतिगामी विचारांचे लोक आजही स्त्रियांच्या वाटेत काटे पेरतात. सतीप्रथेचे समर्थन करतात. विधवांच्या वेदनांचा गैरफायदा घेतात. स्त्रियांच्या पुरुषांशी बरोबरीला या मंडळींचा विरोध असतो. ज्यांना ज्यांना असे वाटते त्यांना या काल्पनिक पात्र नावाच्या खोडसाळपणामुळे आनंद झाला असेल.
या निमित्ताने अतिशूद्र स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया घालणाऱ्या फुले दाम्पत्याला अपशकुन करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. ज्योतीराव व सावित्रीबाईंच्या अलाैकिक कर्तृत्वाची फातिमा शेख नावाची शाखा छाटून टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ते मंडल तिकडे दिल्लीत बसून काहीही बरळत असले तरी महाराष्ट्रातील सुजाण अभ्यासक, विचारवंत व विद्वानांनी या प्रयत्नांमागील षडयंत्र ओळखायला हवे आणि वेळीच असे प्रयत्न उधळून लावायला हवेत. महाराष्ट्रात ३ ते १२ जानेवारी या अनुक्रमे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ते राष्ट्रमाता जिजाऊ मांसाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रागतिक विचारांच्या व्यक्ती, संस्था-संघटना स्त्रीस्वातंत्र्याच्या, महिलांच्या सर्वांगीण प्रगतीचा, त्यांच्या सशक्तीकरणाचा जागर करतात. नव्या युगातील आव्हानांवर मंथन होते. लाखो, कोट्यवधी मुली-महिला यातून प्रेरणा घेतात.
आता या जोडीला ९ जानेवारी हा फातिमा शेख यांचा जन्मदिन आल्याने हा संगम त्रिवेणी बनला आहे. दोन महिन्यांनंतर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पुन्हा स्त्रियांना देव्हाऱ्यात स्थान दिले जाईल. स्त्रीत्वाच्या उदात्तीकरणाचे ढोल वाजवले जातील. तथापि, महिलांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांभोवती संशयाचे त्यांच्या शिक्षणाच्या, आरोग्याच्या, उपजीविकेच्या मुद्द्यांवर मूलभूत चिंतन होणार नसेल तर तो केवळ देखावा असेल.