अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 10:24 IST2026-04-08T10:24:09+5:302026-04-08T10:24:39+5:30

काँग्रेसने शरद पवार पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षापासून अंतर राखण्यास सुरुवात केल्याचे चित्र

editorial article Mahavikas Aghadi on the verge of ending which came together to keep BJP out of power | अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?

अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?

राज्यात २०१९ साली भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी (मविआ) स्थापन केली.  तेव्हा भाजपला दूर ठेवण्यासाठी एकदिलाने एकत्र आलेल्या मविआतील तीनही पक्षांचा आज एकमेकांवरच विश्वास राहिलेला नाही. हे अविश्वासाचे वातावरण तयार करण्यास भाजपच कारणीभूत आहे. आधी शिवसेनेत  आणि नंतर राष्ट्रवादीत फूट पाडून हे दोन्ही पक्ष भाजपने कमजोर केले. दुसरीकडे काँग्रेसच्याही अनेक बड्या नेत्यांना भाजपने आपल्या पक्षात घेतले. त्यामुळे भाजपशी लढण्यासाठी मविआकडे पुरेशी ताकद राहिली नाही. त्या-त्या वेळच्या राजकीय परिस्थितीनुसार सोयीस्करपणे भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादीने फूट पडल्यानंतर उरलेल्या शरद पवार पक्षाने वेळोवेळी भाजपला अनुकूल भूमिका घेतली. यातूनच मविआत अविश्वासाचे वातावरण तयार झाले. भाजपविरोधात देशपातळीवर लढणाऱ्या काँग्रेसने त्यामुळे शरद पवार पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षापासून अंतर राखण्यास सुरुवात केली.

लोकसभा निवडणुकीपर्यंत मविआत असलेला एकोपा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला मिळालेल्या निर्विवाद सत्तेमुळे हळूहळू कमी होऊ लागला. कमजोर असलो तरी राज्यात भाजपविरोधातील लढाई आपल्याला एकट्याला लढायची आहे, याची जाणीव काँग्रेस नेत्यांना झाली आणि काँग्रेसने आपले राजकीय पाऊल त्या दिशेने टाकण्यास सुरुवात केली. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने मविआतील दोन्ही पक्षांशी फारकत घेऊन मुंबई महानगरपालिकेसह अनेक ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. एक तर काँग्रेसला आपली ताकद आजमावायची होती आणि दुसरीकडे  राष्ट्रवादी (शरद पवार) आणि उद्धवसेना या दोन्ही पक्षांवर काँग्रेसचा विश्वास राहिला नव्हता.

भाजपधार्जिणे राजकारण करणाऱ्यांची सोबत कशाला, असा एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये रुजू लागला. त्यातूनच राज्यसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या उमेदवारीला राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध केला. शरद पवार हे भाजपला फायदेशीर होईल, अशी भूमिका वेळोवेळी घेतात. त्यामुळे महाविकास आघाडीतर्फे त्यांना ही जागा सोडू नये, अशी भूमिका राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांची होती. निवडून गेल्यानंतर राज्यसभेत जर विरोधी पक्षनेतेपदासाठी गरज लागली तर शरद पवार काँग्रेसच्या बाजूने मतदान करणार नाहीत, असा संशयही राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी बोलून दाखविला. मात्र, शरद पवारांनी दिल्लीतील नेत्यांशी संधान बांधून राज्यसभेची जागा पदरात पाडून घेतली.

उद्धवसेनेतही शरद पवारांना राज्यसभेची जागा सोडण्यास विरोध होता. आदित्य ठाकरेंनी ही जागा उद्धवसेनेला हवी अशी भूमिकाही घेतली होती. मात्र, शरद पवारांच्या प्रेमात असलेल्या संजय राऊत यांनी किल्ला लढवून शरद पवारांना पाठिंबा देण्यास उद्धव ठाकरेंना भाग पाडले. यावरून मविआ नावालाच शिल्लक असल्याचे दिसते. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीवरूनही या तीन पक्षांची तोंडे तीन दिशेला झालेली दिसतात. अजित पवारांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामतीत सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार देऊ नये अशी विनंती स्वतः सुनेत्रा पवार आणि भाजपनेही केली होती. यात नातेसंबंधांमुळे शरद पवार पक्षाने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला, तर उद्धव ठाकरेंनी शेवटपर्यंत आपली भूमिकाच स्पष्ट केली नाही. मात्र, काँग्रेसने इथे उमेदवार उभा केला.

‘सुनेत्रा पवार या भाजप महायुतीच्या उमेदवार आहेत. त्यामुळे आपण इथे निवडणूक लढवणार,’ अशी भूमिका काँग्रेसने घेतली.  राहुरीतही शरद पवार पक्ष शेवटच्या क्षणी दगाफटका करू शकतो, अशी भीती काँग्रेसला होती. त्यामुळे तिथेही निवडणूक लढविण्याची तयारी काँग्रेसने ठेवली होती. शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे इथून शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढविणार होते. मात्र, अर्ज भरण्याच्या दिवशी भाजपचे वरिष्ठ नेते त्यांना भेटले आणि त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवार पक्षाने इथे आयत्या वेळी दुसरा उमेदवार दिला. इथेही भाजपने खेळी करत शरद पवार पक्षाच्या तगड्या उमेदवाराला निवडणुकीतून काढता पाय घ्यायला लावला. यावरून भाजपच्या खेळीने जर्जर झालेली महाविकास आघाडी नावापुरती शिल्लक असल्याचे दिसते. काँग्रेसने तर केव्हाच मन काढून घेऊन शरद पवार पक्ष आणि उद्धवसेनेची साथ सोडली आहे. महाविकास आघाडी संपुष्टात आली ही अधिकृत घोषणा झाली नसली तरी परिस्थिती तशीच आहे.

Web Title : क्या भाजपा को सत्ता से दूर रखने वाला 'महा विकास अघाड़ी' गठबंधन खत्म?

Web Summary : भाजपा को सत्ता से दूर रखने के लिए बना महा विकास अघाड़ी गठबंधन आंतरिक अविश्वास का सामना कर रहा है। भाजपा ने शिवसेना और एनसीपी को कमजोर किया, जिससे कांग्रेस ने दूरी बना ली। राज्यसभा सीटों और चुनावी रणनीतियों पर विवाद गठबंधन के अंत का संकेत देते हैं।

Web Title : Is the 'Maha Vikas Aghadi' alliance collapsing to keep BJP out?

Web Summary : The Maha Vikas Aghadi alliance, formed to counter BJP, faces internal distrust. BJP weakened Shiv Sena and NCP, prompting Congress to distance itself. Conflicts over Rajya Sabha seats and election strategies expose deep divisions, suggesting the alliance's end.