कोरोना संकटात चीननं शोधली संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 04:47 AM2020-04-21T04:47:19+5:302020-04-21T04:52:42+5:30

आपल्या मित्रांनाही वाचाळवृत्तीने तोडण्याचे ट्रम्प यांचे धोरण व नवनवे मित्र जोडण्याचे चिनी तंत्र यांच्यातल्या संघर्षातून नव्या जगाची मांडणी होते आहे. या जगात आपले पारडे अमेरिकेपेक्षा भारी राहील, यासाठी चीनने तयारी केल्याचे दिसते.

editorial on america and chinas verbal attack on each other over coronavirus | कोरोना संकटात चीननं शोधली संधी

कोरोना संकटात चीननं शोधली संधी

googlenewsNext

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि चीन या महासत्तांचे वाक्युद्ध पेटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शिवराळ शब्दांत चीनला इशारे देण्याचे सत्र आरंभले आहे. त्यांचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो एरवी तोलून-मापून बोलण्यासाठी प्रसिद्ध. पण, त्यांनीही चीनपासून अमेरिकेचे आरोग्य आणि जीवनशैलीला धोका असल्याचे जाहीरपणे सांगत रणशिंग फुंकले आहे. कोरोना विषाणूची निर्मिती चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेत मानवी प्रयत्नांतूनच झालेली असून, अमेरिका व पश्चिमेकडील देशांत त्याचा संसर्ग योजनापूर्वक फैलावला गेल्याचा आरोप ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे मातब्बर सिनेटर्स करू लागले आहेत. ट्रम्प यांचे खंदे समर्थक असलेले वकील रवी बात्रा यांच्या कंपनीने चीनच्या विरोधात तीन लाख कोटी डॉलर्सच्या नुकसानभरपाईचा दावा अमेरिकेच्या न्यायालयात गुदरला आहे.



उजव्या विचारसरणीच्या रिपब्लिकन नेत्यांकडून याहून कठोर पद्धतीने चीनच्या विरोधात आघाडी उघडली जाईल, असे संकेत मिळताहेत. दरम्यान, चीनवरून अमेरिकेतच रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्समध्येही तुंबळ शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. आज चीनच्या नावाने खडे फोडणारे ट्रम्प फेब्रुवारी-मार्चदरम्यान चीनच्या महामारी व्यवस्थापनाचे कसे गोडवे गात होते, हे दर्शविणाऱ्या चित्रफिती प्रसारित करून ट्रम्प यांच्या नेतृत्वाविषयी संशय निर्माण करण्याचे काम डेमोक्रॅट्सनी आरंभले आहे, तर त्या पक्षाचे अध्यक्षपदाच्या निवडणुकीतले संभाव्य उमेदवार ज्यो बिडेन यांच्या पुत्राचे चीनशी व्यावसायिक संबंध असल्याचा मुद्दा रिपब्लिकन्सनी लावून धरला आहे.

अमेरिकेत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अध्यक्षपदासाठीची निवडणूक होणार आहे. साहजिकच एकमेकांवर निर्णायक कुरघोडी करताना दोन्ही स्पर्धक पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतात. चीनच्या निमित्ताने आयतेच हत्यार या पक्षांना सापडले असून, आपला राष्ट्रवाद सिद्ध करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून अधिक प्रक्षोभक विधाने केली जातील. अर्थात, आंतरराष्ट्रीय राजकारणात माहीर असलेल्या चीनकडूनही अमेरिकेला जशास तसे प्रत्युत्तर दिले जात आहे. अगदी कोरोना विषाणू अमेरिकन सैनिकांनीच चीनमध्ये आणल्याचा आरोप तेथील वृत्तपत्रे करीत आहेत. दोन्ही महासत्तांदरम्यान हे वाक्युद्ध चालू असताना चीनमधून प्रतिजैविके, व्हेंटिलेटर्स, फेसमास्क व अन्य संरक्षक वैद्यकीय उपकरणांचा अव्याहत पुरवठा अमेरिकेला होतो आहे. तसा जगाच्या पाठीवरल्या बहुतेक कोरोनाग्रस्त देशांना चीनकडून अशा प्रकारचा पुरवठा होतो आहेच; पण ‘अमेरिका फर्स्ट’ अशी घोषणा देत सत्ताग्रहण करणाऱ्या ट्रम्प यांना चिनी पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागते आहे, यावर ट्रम्प यांच्या टीकाकारांनी बोट ठेवले आहे.



चिनी आक्रमणामुळे अमेरिकी औषधनिर्मिती उद्योगांची झालेली कुत्तरओढ ट्रम्प यांच्या संधिसाधू औद्योगिक धोरणाची फलनिष्पत्ती असल्याचा आरोप हे टीकाकार करतात. निवडणुकीच्या तोंडावर हा आरोप ट्रम्प यांना नीटपणे झिडकारता आलेला नाही. त्यामुळे चीनविरोधातले आपले आकांडतांडव विरोधकांपेक्षा अधिक कर्कश करीत प्रसारमाध्यमांचा रोख आपल्यावर ठेवण्याची नेहमीची चाल त्यांनी खेळली आहे. दुसरीकडे अडचणीत असलेल्या देशांना मदत करीत चीनने आपले प्रभावक्षेत्र विस्तारण्याचे धोरण कायम ठेवले असून, महामारीचा व्यवस्थित उपयोग तो देश करतो आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला घरघर लागलेली असताना चीनमधील आरोग्य उपकरणे आणि औषधांची निर्यात दसपटीने वाढली आहे.



आपल्या नव्या-जुन्या मित्रांना वाचाळवृत्तीने तोडण्याचे ट्रम्प यांचे धोरण आणि इटलीपासून केनियापर्यंत नवनवे मित्र जोडण्याचे चिनी तंत्र यांच्यातल्या संघर्षातून नव्या जगाची मांडणी होत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. या नव्या जगात आपले पारडे अमेरिकेपेक्षा भारी राहील, यासाठी चीनने जय्यत तयारी केल्याचे दिसते. ट्रम्प यांच्या थयथयाटामागचे तेही एक कारण आहे. नोव्हेंबरमधला अमेरिकी निवडणुकांचा मुहूर्त नक्की झाला, तर महासत्तांमधला हा संघर्ष टीपेला पोहोचलेला दिसेल.

Web Title: editorial on america and chinas verbal attack on each other over coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.