रुग्णवाहिका किंवा शववाहिका उपलब्ध नसल्याने पित्याने कोवळ्या मुलाचा, पतीने पत्नीचा मृतदेह खांद्यावर टाकून कित्येक मैल पायपीट केल्याच्या, कसल्याशा वाहनात, काही वेळा एसटी बसने मृतदेह गावी नेल्याच्या काही घटना याआधी घडल्या आहेत. तेवढ्यापुरते आपण संताप व्यक्त करतो. आपली व्यवस्था सामान्य गरिबांच्या मुलाबाळांचा, एखाद्या बिचाऱ्या बाईचा मृत्यूनंतरही छळ, हेळसांड करते, म्हणून त्रागा करतो. एव्हाना त्या घटनांचेही काही वाटेनासे झाले आहे. तसे काही घडले तर आता काळजात धस्स होत नाही. आपण कमालीचे बधिर, संवेदनाहीन झालो आहोत. जन्म ही सर्वाधिक आनंदाची, तर मृत्यू ही दुःखाची बाब असूनही अशा घटनेच्या शिळा मनावर खोल रुतत नाहीत. पण, अशा सामूहिक अवस्थेतही पोटात खड्डा पडावा, डोळ्यांसमोर अंधार दाटून यावा, दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द सुचू नयेत, भावना गोठून जाव्यात, मन थिजून जावे, अशी घटना रविवारी राज्याची उपराजधानी नागपूरजवळ घडली.
साधारणपणे पस्तिशीचा माणूस दुचाकीवर महिलेचा मृतदेह टाकून महामार्गाने सुसाट निघाल्याचे महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या पथकाला दिसते. ते पाठलाग करतात. तो थांबत नाही. तेव्हा, गाडीच्या क्रमांकावरून शोध घेतला जातो आणि उघडकीस येते प्रचंड हादरवून टाकणारी घटना, दुचाकीवर मृतदेह नेणारी ती व्यक्ती होती अमित यादव. मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील करणपूर हे त्याचे मूळ गाव. पत्नी ग्यारसीसह तो दहा वर्षांपासून कामाधंद्याच्या निमित्ताने कोराडीजवळच्या लोणारा येथे राहतो. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने अमित व ग्यारसी हे दोघे दुचाकीने करणपूरला निघाले होते. देवलापारच्या पुढे मोरफाट्याजवळ एका अज्ञात ट्रकने त्यांच्या गाडीला कट मारला. त्यामुळे दोघे खाली पडले. ट्रकच्या मागच्या चाकाखाली ग्यारसी चिरडली गेली. हा पेंच अभयारण्याचा जंगल प्रदेश. अपघात घडला तेव्हाच जोराचा पाऊस सुरू झाला. डोळ्यासमोर पत्नी चिरडली गेल्याने आक्रोश करीतच अमितने मदतीसाठी वाहने थांबविण्याचा प्रयत्न केला. कोणीही थांबले नाही. वैतागून त्याने पत्नीचा मृतदेह मोटारसायकलवर बांधला. वेगाने परत नागपूरकडे निघाला. महामार्ग पोलिसांच्या पथकाने महिलेचा मृतदेह गाडीवर टाकून जाणारी व्यक्ती पाहून थांबविण्याचा प्रयत्न केला. व्हायरल व्हिडीओमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांना खुनाचा संशय आल्याचे जाणवते. त्यासाठी ते अमितला थांबविण्याचा प्रयत्न करताहेत असे दिसते. तो घाबरला असल्याने थांबला नाही, असे कारण पोलिस देतात खरे; पण तसे नसावे. भीतीपेक्षा तो संतापाने धगधगत असण्याची शक्यता अधिक आहे.
प्रिय पत्नी अपघातात डोळ्यादेखत जीव गमावते आणि कोणीही मदतीसाठी थांबत नाही. अपघात घडल्यानंतर मदतीसाठी पोलिस आले नाहीतच. उलट, आता आपण नशीब गाडीवर टाकून परत निघालो तर पाठलाग करतात, यामुळे तो संतापला असावा. एनएच ४४ हा देशाची उत्तर-दक्षिण टोके जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आणि त्यातील नागपूर-जबलपूर हा अत्यंत रहदारीचा टापू, अशा हमरस्त्यावर एका अभागी पतीला मदत मिळत नसेल, पत्नीचा मृतदेह गाडीवर बांधून संतापाने त्याला परत फिरावे लागत असेल, तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून तो त्या स्थितीत परत येतानाही कुणाला त्याची फिकीर नसेल, सगळ्यांच्या दृष्टीने तो बेदखल असेल, महामार्ग पोलिसही खुनाच्या संशयानेच त्याचा पाठलाग करीत असतील, तर महामार्गावर, हमरस्त्यांवर मदतीच्या व्यवस्थेचे याहून मोठे धिंडवडे तरी कोणते? मंत्री, अधिकाऱ्यांनी स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यासाठी सभा-समारंभातून टाळ्या घेण्यासाठी अशा व्यवस्थेचे गोडवे गायचे का? रस्त्याकडेच्या अशा दुर्दैवी अपघातांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणार आहे की नाही? मदतीसाठी थांबलो तर विनाकारण पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल म्हणून जर लोक असे असंवेदनशील, मुर्दाड बनत असतील तर यंत्रणा कधी या सामूहिक मनःस्थितीचा विचार करणार आहे की नाही? अमितच्या वाट्याला आलेले दुर्दैव अन्य कोणाच्या नशिबी येऊ नये म्हणून समाज, राष्ट्र, व्यवस्था म्हणून आपण काही करणार आहोत की नाही? एरव्ही जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेतरी घडणाऱ्या घटना, हिंसाचार पाहून, ऐकून खोटे उसासे सोडणारे, आक्रंदनारे आपण आपल्या अवतीभोवतीच्या घटनांबद्दल असेच बेफिकीर राहणार आहोत का?