मरणासन्न रामनदी पुन्हा जिवंत व्हावी, म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2021 01:41 AM2021-01-06T01:41:55+5:302021-01-06T01:42:46+5:30

आता आपल्या नदीचे आरोग्य आपल्या हाती घ्यायची वेळ आली आहे. पुण्यातल्या नागरिकांनी पहिले पाऊल  उचलले आहे, त्याबद्दल...

The dying Ramnadi should be revived, so ... | मरणासन्न रामनदी पुन्हा जिवंत व्हावी, म्हणून...

मरणासन्न रामनदी पुन्हा जिवंत व्हावी, म्हणून...

Next

- अनिल गायकवाड, संस्थापक सदस्य, ‘रामनदी पुनरुज्जीवन अभियान’ 

सर्वांना शुद्ध पाणी हवे असेल तर ते नदीच आपल्याला आजवर देत आली आहे. परंतु ४५० कोटी वर्षाच्या पृथ्वीच्या आयुष्यात गेल्या पन्नास ते साठ वर्षांत फक्त मानवी कृतीने प्रगतीच्या नावाखाली प्रचंड प्रदूषण केले आणि या जीवनदायिनी नद्या मरणासन्न केल्या. आपले अस्तित्व या पृथ्वीवर टिकवायचे असेल, तर या नद्यांना त्यांच्या पूर्वीच्या, नैसर्गिक अवस्थेमध्ये पुन्हा आणावे आणि ठेवावे लागेल.


किर्लोस्कर वसुंधराच्या पुढाकारातून पुणे शहरात रामनदी पुनरुज्जीवन अभियानाचा जन्म झाला आहे. नागरिकांच्या प्रयत्नातूनच नदीचे अस्तित्व टिकू शकते आणि नदीचे प्रदूषण करणारे सर्व स्रोत थांबविले, तरच नदी शुद्ध होऊ शकते. त्यासाठी व्यापक जनजागृती, तसेच प्रत्यक्ष प्रयत्नातून नदी स्वच्छतेचे परिपूर्ण प्रारूप तयार करावे या उद्देशाने सर्व कार्यकर्ते काम करीत आहेत. पर्यावरण संवर्धन या कामामध्ये अनेक वर्षे काम करणाऱ्या पुणे येथील बारा संस्था, तज्ज्ञ, सुमारे पस्तीस महाविद्यालयांमधील हजारो  ‘इको रेंजर्स’, पुण्यातील तीन किर्लोस्कर कंपन्यांचे कर्मचारी-त्यांचे कुटुंबीय, तसेच स्थानिक नागरिक यांच्या सहयोगाने पहिल्या वर्षात मोठ्या प्रमाणात कृती कार्यक्रम राबविण्यात आले. 


पुण्यातून वाहणारी राम नदी १९ किमी लांब असून, या नदीच्या खोऱ्यामधे तीन ते साडेतीन लाख नागरिक राहतात. खाटपेवाडी परिसरात पडणारे पावसाचे पाणी घेऊन प्रत्यक्ष रामेश्वर मंदिर भुकूम या ठिकाणी रामनदी उगम पावते व तेथून गांव, बावधन, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी असा प्रवास करत, बाणेर येथे मुळा नदीमध्ये समाविष्ट होते. 
 जनजागृती अभियानाच्या दरम्यान नदी प्रदूषित करणाऱ्या गोष्टींची यादी करण्यात आली. अनेक संस्थांच्या प्रतिनिधींनी प्रदीर्घ विचारमंथन करून काम सुरू झाले. रामनदीच्या उगमापासून ते संगमापर्यंत नऊ भाग पाडून संस्थापक सदस्य संस्थांनी एकेका भागाच्या कृती कार्यक्रम अंमलबजावणीसाठी जबाबदारी घेतली. घरांघरांतून, संस्थांमधून, सार्वजनिक मंडळ, बचतगट, शाळा-कॉलेज, वेगवेगळ्या संस्था व उद्योग यांसाठी कृती कार्यक्रम तयार करण्यात आला. यामध्ये नदीची ओळख, परिक्रमा, पर्यावरणपूरक घरगुती वस्तू प्लॅस्टिक प्रदूषण, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी शुद्धिकरण, भूजल व्यवस्थापन, नैसर्गिक शेती, परसबाग, छत शेती, मधमाशी पालन, सुती कपडे, विषमुक्त अन्न अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. 


याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून पहिला  ‘रामनदी’ महोत्सव (ऑनलाइन)  दिनांक ८  ते १० जानेवारी, २०२१ दरम्यान संपन्न होणार आहे. पुण्यातील नदीचा शास्रीय अभ्यास करून, सादर होणारा हा पहिलाच ऑनलाइन महोत्सव असेल. सुमारे १९ कि.मी. लांबीची ही नदी सध्या अत्यंत वाईट अवस्थेत आहे.  ‘या नदीचा इतिहास, भूगोल, जैवविविधता इत्यादी बरोबरच वेगवेगळ्या समस्यांविषयी नदीप्रेमींना जागृत करावे, तसेच सक्रिय सहभागासाठी प्रेरित करावे,’  हा या महोत्सवाचा उद्देश आहे.


पाच भागांच्या या महोत्सवात, अनेक मान्यवरांची दृक-श्राव्य व्याख्याने, गेल्या दीड वर्षांत झालेल्या प्रत्यक्ष कामांवर आधारित लघुपट, नागरिकांच्या आठवणी, सागर कुलकर्णी निर्मित रामनदीचे भारुड, रामनदी संगमाचा आभासी  ‘इको टेल’ इत्यादींचा समावेश आहे.
सध्या सर्वच नद्यांची अवस्था रामनदीपेक्षा वेगळी नाही. ज्या त्या शहरातल्या-गावातल्या लोकांनीच आता आपल्या नदीचे आरोग्य आपल्या हाती घ्यायची वेळ आली आहे. त्याचा प्रारंभ रामनदीच्या उदाहरणाने व्हावा, अशी आमची अपेक्षा आहे. म्हणून हे जाहीर निमंत्रण. या, आपल्या नद्या आपणच वाचवू या!
- सहभागी होण्यासाठी :  ‘किर्लोस्कर वसुंधरा’चे फेसबुक पेज- Kirloskar vasundhara interanational film festival
 

Web Title: The dying Ramnadi should be revived, so ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.