Dwarkanath Sanzgiri: ओघवत्या शैलीचा समीक्षक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 06:01 IST2025-02-07T06:00:19+5:302025-02-07T06:01:31+5:30
Dwarkanath Sanzgiri cricket: द्वारकानाथऐवजी आम्ही त्याला पप्पूच म्हणायचो. तो शिवाजी पार्कपाशी म्हणजे क्रिकेटच्या पंढरीत राहायचा, तिथं रमायचा.

Dwarkanath Sanzgiri: ओघवत्या शैलीचा समीक्षक
-संजीव साबडे, मुक्त पत्रकार
लोकप्रिय क्रीडा लेखक आणि हिंदी चित्रपट व संगीताचे कार्यक्रम करणारा द्वारकानाथ संझगिरी पूर्वी महापालिकेत इंजिनिअर होता; पण क्रिकेट आणि संगीताची आवड त्याला तरुणपणी गप्प बसू देत नव्हती. त्यातून त्याने १९७९ मध्ये क्रिकेटवरील पहिला लेख लिहिला दिनांक साप्ताहिकात. त्याची ओघवती शैली, अफाट माहिती, जुन्या आठवणी व किस्से असा सर्व मसाला असलेल्या त्या लेखाने संझगिरी लगेच लोकप्रिय झाला आणि नियमित लिहू लागला. त्याच्या तलत महमूदवरील ‘है सबसे मधुर वो गीत’ या लेखाचीही खूप चर्चा झाली आणि याच लिखाणाने संझगिरीचा पत्रकार व लेखक असा प्रवास सुरू झाला.
द्वारकानाथऐवजी आम्ही त्याला पप्पूच म्हणायचो. तो शिवाजी पार्कपाशी म्हणजे क्रिकेटच्या पंढरीत राहायचा, तिथं रमायचा. वेळ मिळेल तेव्हा चित्रपट पाहणं हा त्याचा छंद. त्याच्या आवडी आणि छंदांद्वारे लिखाण करून त्यानं लाखो वाचकांना मुग्ध केलं.
त्याने जवळपास १०-१२ विश्वचषक मालिकांना हजेरी लावली. क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक देशात तो गेला. सुनील गावस्कर, अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, संदीप पाटील आणि अनेक देशांचे खेळाडू त्याचे मित्र बनले होते. एकदा त्याने श्रीलंकेच्या खेळाडूंना पार्टीही दिली होती.
असंख्य सामने पाहिल्याने व खेळाडूच मित्र झाल्याने त्याच्याकडे माहिती, आठवणी आणि किस्से यांचा खजिनाच होता. त्या पेटाऱ्यातून कधी काय काढायचे हे त्याला माहीत असे. त्यामुळे त्याने क्रिकेट आणि खेळाडू यांच्याविषयी अनेक कार्यक्रमही केले.
सचिनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या कार्यक्रमाला ३००० खुर्च्या असलेला ‘षणमुखानंद हॉल’ फुल होता. ती गर्दी सचिन आणि पप्पू या दोघांसाठी होती.
पप्पूने क्रिकेट व संगीत यावर ५०० हून अधिक कार्यक्रम केले. संगीतकार रोशन, एस. डी. बर्मन, सी. रामचंद्र, तसंच मुकेश, रफी, तलत हे गायक आणि देव आनंद, शम्मी कपूर, मधुबाला ते माधुरी अशा त्याच्या संगीताच्या कार्यक्रमांनाही अफाट गर्दी व्हायची. त्याचे परदेशांतही कार्यक्रम होत. ‘लोकमत’पासून मराठीतील सर्व दैनिकांच्या पानांवर त्याचा वावर असे.
इतकी लोकप्रियता मिळूनही पप्पू वागण्यात साधाच होता. मित्रांमध्ये राहणं त्याला आवडायचं. काही वर्षांपूर्वी त्याची ओपन हार्ट सर्जरी झाली. त्याने थोडी धावपळ कमी केली; पण कार्यक्रम व पुस्तक लेखन सुरूच ठेवलं. त्याची ४२ पुस्तके प्रकाशित होऊन संपली आहेत.
त्याला दोन-सव्वादोन वर्षांपूर्वी कर्करोग झाला. उपचार सुरू होते आणि लिखाण व कार्यक्रमही. त्रास वाढत गेल्याने तो कार्यक्रमात कमी बोलायचा वा स्वतः निवेदन करायचा नाही. त्याच्या घरीही जाणं व्हायचं. आजारपणात मात्र जाऊ शकलो नाही, ही खंत मनात कायम राहील.