महाराष्ट्राची ‘एकसष्टी’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 05:35 AM2021-05-01T05:35:09+5:302021-05-01T05:40:02+5:30

“जनतेच्या हृदयामध्ये अन्यायाची कळ आहे, जनतेच्या बाहूमध्ये सागराचे बळ आहे.

Due to Corona Lockdown, the Diamond Jubilee of Maharashtra was not celebrated last year. | महाराष्ट्राची ‘एकसष्टी’

महाराष्ट्राची ‘एकसष्टी’

Next

‘कोरोना लाॅकडाऊन’मुळे गतवर्षी महाराष्ट्राच्या स्थापनेचा हीरकमहोत्सव साजरा करता आला नाही. सर्वत्र कोरोना दबा धरून बसला होता. आता दुसरी लाट आल्याने महाराष्ट्राची ‘एकसष्टी’देखील वाजतगाजत साजरी करता येणार नाही. आम्ही पक्के हिंदुत्ववादी आहोत, असे जरी विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगत असले, तरी त्यांना मिळालेल्या वारशामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांचा वास्तववाद आणि बाळ ठाकरे यांच्या स्पष्टवक्तेपणाचा मिलाफ आहे. परिणामी, त्यांना कोणताही गाजावाजा करण्याचा मोह झाला नाही.

पंढरीच्या वारकऱ्यांना थांबायला सांगितले, गणरायाला साध्या पद्धतीने निरोप दिला, दिवाळी-दसरा घरूनच साजरा करायची साद घातली; आणि हे सर्व करता येईल, आधी माणसाला वाचवू या, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्राच्या स्थापनेचा इतिहास हा मोठा रोमांचकारी आहे. त्या लढ्याची प्रेरणा शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांतून मराठी माणसांच्या मनामनांत भिनली होती. त्याच परंपरेचे नेतृत्व पहिल्या (१ मे १९६०)पासून महाराष्ट्राला मिळाले. यशवंतराव ते विलासराव अशी परंपरा सांगितली जात होती. ती आता प्रबोधनकारांच्या नातवापर्यंत पोहोचली आहे. कविवर्य विंदा करंदीकर ‘जनता अमर आहे’ या कवितेत म्हणतात, “जनतेच्या हृदयामध्ये अन्यायाची कळ आहे, जनतेच्या बाहूमध्ये सागराचे बळ आहे.

जनतेच्या इच्छेमध्ये नियतीचा नेट आहे, जनतेच्या हातामध्ये भविष्याची भेट आहे.” कोरोनाचे संकट गेल्यावर भविष्याची भेट घेण्याचे नियोजन करावे लागणार आहे. रेटा-नेटाने मराठी माणसांनी महाराष्ट्र घडविला आहे. आजही ताे लढताे आहे. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले, ते मराठी माणसांच्या भविष्यासाठी काही तरी देऊन गेले. यशवंतराव चव्हाण म्हणायचे, “राजकारण्यांनी नाही म्हणायला आणि प्रशासनाने हाेय म्हणायला शिकले पाहिजे.” सलग ११ वर्षे राज्याचे नेतृत्व केलेले वसंतराव नाईक म्हणाले हाेते, “महाराष्ट्राला दुष्काळातून बाहेर काढून अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण केले नाही, तर पुण्यातील शनिवारवाड्यासमाेर मला जाहीर फाशी द्या.”

आज उद्धव ठाकरे म्हणताहेत, “आधी माणसांचा जीव वाचवू या, अर्थव्यवस्था पुन्हा उभी करता येईल. माणूसच संपला, तर राज्य काेणासाठी करायचे?” जनतेच्या भविष्याप्रति आत्मिक बळ देणारे असे नेतृत्व महाराष्ट्राने पाहिले आहे. तेव्हा जी फलनिष्पत्ती झाली आहे आणि त्यापासून जे उपेक्षित राहिले आहेत, त्यांच्याकडे आता लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्र म्हणजे मुंबई-ठाणे-नाशिक-पुणे पट्टा नव्हे, हे आता ठासून सांगणे आणि राज्यकर्त्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्राची प्रगती एकत्रित केली तर ती हिमालयासारखी दिसते; पण गावाकडे गेले की ती टेकडी वाटू लागते. यात बदल घडविण्यासाठी परंपरागत विकासाचे नियाेजन बाजूला ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र हा वादही आता मागे पडला पाहिजे. नद्यांचे खोरे आणि भौगोलिक रचना यांचा विचार करून महाराष्ट्राच्या विकासाचे नवे माॅडेल मांडण्याची गरज या एकसष्टीनिमित्त पुढे यायला हवी. कोरोनाच्या संकटाने सर्व काही बंद झाले तेव्हा महाराष्ट्रातून देशभर लाखो मजूर परत गेले. महाराष्ट्रात बाहेरून फारसे कोणी आले नाही. महाराष्ट्राच्या पोटातच ग्रामीण आणि गरीब महाराष्ट्र दडला आहे. तिकडे शहरांतून माणूस परतला. महाराष्ट्र केवळ मराठीच नव्हे, तर देशातून येणाऱ्या प्रत्येकास रोजगार देणारा प्रांत आहे. प्रगतीचे विविध निकष लावताना हादेखील एक निकष काेरोनामुळे समोर आला. आता सूक्ष्म नियोजन करून छोट्या छोट्या नद्यांची खोरी, भौगोलिक रचना आणि रोजगाराच्या संधी याचा विचार करावा लागेल. काही भागात सौरऊर्जेचीच शेती करता येऊ शकेल. शेती ही इतर व्यवसायांना पूरक झाली पाहिजे. शहरे, महानगरे ही रोजगार निर्मितीची केंद्रे आहेत. त्यांचा सुनियोजित विकास करावा लागेल.

मराठवाडा मागास राहिला म्हणतो; पण औरंगाबादला नवा चेहरा देणारे डॉ. रफिक झकेरिया हे ठाम उभे राहिले. तशी दिशा पश्चिम विदर्भाला, अतिपूर्व विदर्भाला, मराठवाडा आणि आदिवासी पट्टे असणाऱ्या पालघर ते नंदुरबार ते अमरावतीच्या मेळघाटापर्यंत देणारे नेतृत्व पुढे आले पाहिजे. ते केवळ राजकारणी नाही, तर शैक्षणिक, औद्योगिक, संशोधनात्मक नेतृत्व असायला हवे. महाराष्ट्राचा समतोल विकास हे एक  अवघड  आव्हान एकसष्टीच्या निमित्त स्वीकारण्यास आपण तयार झाले पाहिजे. विंदा म्हणतात तसे जनतेच्या बाहूंमध्ये सागराचे बळ आहे, त्या बळाचा वापर करण्यासाठी नेटाने काम करण्याचा निर्धार आपण करू या. महाराष्ट्राची पताका उंच उंच फडफडत राहो, हीच यानिमित्त सर्वांना सदिच्छा!

Web Title: Due to Corona Lockdown, the Diamond Jubilee of Maharashtra was not celebrated last year.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.