डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समतामूलक भारताचे स्वप्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 07:16 AM2021-12-06T07:16:45+5:302021-12-06T07:17:06+5:30

आपल्या प्रचंड ज्ञानाच्या आधारे बाबासाहेबांनी संविधान निर्मितीचे काम केले. या संविधानामुळे २ हजार वर्षांनंतर भारत देश प्रथमच एकजिनसी झाला.

Dr. Babasaheb Ambedkar's dream of an egalitarian India | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समतामूलक भारताचे स्वप्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समतामूलक भारताचे स्वप्न

googlenewsNext

डॉ. नितीन राऊत

ऊर्जामंत्री

महात्मा जोतिबा फुले, गोपाळ हरी देशमुख, महादेव गोविंद रानडे यांसारख्या समाजसुधारकांनी झापडबंद समाजाचे डोळे उघडण्याचे काम केले. बडोद्याचे सयाजीराव महाराज व कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी समाज सुधारणेची कास धरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाय ठेवून रयतेच्या राज्याची संकल्पना राबवून अनेक समाजोपयोगी कामे केली. लोकमान्य टिळकांनंतर महात्मा गांधीजी यांच्याकडे स्वातंत्र्य आंदोलनाची सूत्रे आली. सत्य, अहिंसा व सत्याग्रहाच्या अभिनव प्रयोगामुळे शेतकरी, कामगार, हिंदू व मुसलमान यांना त्यांच्या नेतृत्वाने भूरळ पाडली. पं. जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, राजेंद्र प्रसाद, आचार्य कृपलानी, मौलाना आझाद यासारखे धुरंधर काँग्रेस पक्षात असतानाही महात्मा गांधीजींची जनमानसावरील पकड अलौकिक अशीच होती.

याच काळात डाॅ. भीमराव आंबेडकर नावाच्या सिताऱ्याचं भारताच्या भूमीवर आगमन झालं. कोण होते हे युवा आंबेडकर? भारतीय समाजव्यवस्थेत शापित व शोषित ठरलेल्या जातीत ते जन्माला आले होते. चातुर्वर्ण्य व्यवस्थेत आणखी एक पाचवा वर्ण आहे आणि तो म्हणजे अस्पृश्य वर्ग. सुमारे एकपंचमांश लोकसंख्या असलेला हा वर्ग हिंदू धर्माचा एक भाग असला तरी त्यांचे जीवन निराश्रीत व गुलामापेक्षाही भयंकर होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदा, इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानव्यशास्त्र अशा अनेक उच्च पदव्या जगातील श्रेष्ठ अशा विद्यापीठातून संपादन केल्या. अस्पृश्यता निर्मूलनाच्या कामाला त्यांनी हात घातला. उच्चशिक्षित असूनही सामाजिक भेदाभेदाचे प्रत्यक्ष कटू अनुभव त्यांना स्वत: आले होते.

डॉ. आंबेडकर यांचे आगमन झाले तेव्हा हिंदू-मुसलमानांना ब्रिटिश सत्तेत अधिकार देण्याची चळवळ सुरू होती. डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांचा प्रश्न ऐरणीवर आणला. ‘बहिष्कृत हितकारिणी’सारख्या संस्था स्थापन करून व ‘मूकनायक’ हे वर्तमानपत्र सुरू करून त्यांनी समाजकारण सुरू केले. शेतकरी, कामगार व अस्पृश्यता निवारणाला प्राधान्य दिले. चवदार तळे व काळाराम मंदिर सत्याग्रहासारखे अनेक प्रयत्न करूनही हिंदू समाजाचे मन किंचितही द्रवले नाही. त्यांचा हा लढा जसा आत्मसन्मानाचा व स्वउन्नतीचा होता किंबहुना त्यापेक्षाही जास्त हिंदू धर्माच्या शुद्धीकरणाचा होता. परंतु बाबासाहेबांची व त्यांच्या चळवळीची सनातनी हिंदुंनी निर्भत्सनाच केली. शेवटी या प्रश्नावर बाबासाहेबांनी ब्रिटिशांसोबत दोन हात करून गोलमेज परिषदेत स्वतंत्र मतदारसंघ म्हणून मान्यता मिळविली. अस्पृश्यांचा प्रश्न हा हिंदू धर्माच्या सहानुभूती आणि दयेच्या पातळीवरचा नसून आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीर अधिकाराचा आहे असे ते म्हणत. त्यात ते यशस्वी झाले.

धर्माच्या पातळीवर हिंदू धर्म अस्पृश्यांना माणुसकीचे अधिकार देण्यास अपयशी झाल्याने तथागत बुद्धाच्या समताधिष्ठित अशा बौद्ध धर्माचा लाखो अनुयायांसह त्यांनी स्वीकार केला. बाबासाहेबांचा अखंड प्रवास हा अन्यायाविरुद्ध संघर्ष व न्याय हक्काची प्रतिष्ठापना यासाठी राहिलेला आहे. आपल्या प्रचंड ज्ञानाच्या आधारे बाबासाहेबांनी संविधान निर्मितीचे काम केले. सम्राट अशोकानंतर हा देश कधीही एकजिनसी झालेला नाही. भारतीय संविधानाने तो २ हजार वर्षांनंतर प्रथमच झालेला आहे. बुद्धाची शांती, अहिंसा, बंधुभाव, समता आणि विकासाची संधी संविधानाने दिली आहे. बुद्धाच्या क्रांतीने निर्माण केलेली मानवी मूल्ये उद्ध्वस्त करून प्रतिक्रांतीने निर्माण केलेल्या अनेक जाचक, अमानवी प्रथा, रूढी यांना तिलांजली देण्यात आलेली आहे. हा देश सर्वांचा असून गरीब आणि श्रीमंतासह सर्वांना समान अधिकार बहाल करण्यात आले आहेत.

टाटा, अंबानी आणि अदानीप्रमाणे श्रीमंत होण्याचा अधिकार व संधी राव आणि रंक यांना समान प्रमाणात देण्यात आल्या आहेत. विचार आणि आचारस्वातंत्र्य आहे. परस्पर विभिन्न उद्देश असलेल्या विविध जाती, पंथ व विचारप्रवाहांना बहरण्याची व प्रगती करण्याबरोबरच देशाला शांती आणि समृद्ध करण्याची शाश्वती आपल्या संविधानाने प्रत्येक भारतीयाला दिली आहे. ७१ वर्षांनंतरही भारतीय संविधान आणि लोकशाही अभेद्य असून ती दिवसेंदिवस तावून सुलाखून मजबूत होत आहे. भारत हा एकेकाळी लोकशाही देश होता. अनेकांच्या बलिदानाने तो पुन्हा लोकशाही देश बनला आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये सर्वहारा समाजाचे हित त व कल्याण आहे. ही बहुजन हिताय बहुजन सुखाय अशी व्यवस्था आहे. काही घटकांना ही व्यवस्था नको आहे. संविधानाला कमकुवत करण्याचे कारस्थान कायम सुरू आहे.

महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद व अनेक स्वातंत्र्यसेनानींनी स्वतंत्र, संपन्न व समृद्ध भारताचे स्वप्न पाहिले आहे. नामदेव आणि तुकारामादी थोर संतांनीही रंजल्या गांजल्याच्या मानवी कल्याणाचे स्वप्न पाहिले आहे. ती सर्व स्वप्ने आपल्या संविधानाने पूर्ण केली आहेत. संविधान हा डाॅ. बाबासाहेबांनी या देशाला  दिलेला अमूल्य ठेवा आहे. त्याचे आपण सर्वजण प्राणपणाने जतन करू या.

Web Title: Dr. Babasaheb Ambedkar's dream of an egalitarian India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.