...आता ‘वर्क फ्रॉम व्हिलेज’ हवे !
By डॉ. अनिल काकोडकर | Updated: January 10, 2026 04:48 IST2026-01-10T04:46:41+5:302026-01-10T04:48:32+5:30
गावं रिकामी करून लोकांना शहराकडे वळवण्याचा घोषा हा औद्योगिक युगातील मानसिकतेचा परिपाक असून, आजच्या ज्ञानयुगात तो गैरलागू आहे.

...आता ‘वर्क फ्रॉम व्हिलेज’ हवे !
डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष
भाषा ही परस्पर संपर्कासाठी आवश्यक तर आहेच; पण त्याचबरोबर आपल्या आसपासच्या परिस्थितीचे आकलन व त्या अनुषंगाने व्यक्त होण्यासाठीही भाषेची खूप मदत होते. लहान मुलांची वाढ होताना ज्ञानेंद्रिये सभोवताली असणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टींची सतत नोंद करत असतात. या गोष्टींना परिभाषित करायला पण आसपास बोलणाऱ्या व्यक्तींकडूनच मुलं शिकत असतात.
या अवस्थेत अनेक भाषांचा वापर अर्थातच मुलांच्या मनात गोंधळ निर्माण करू शकतो. म्हणूनच बालशिक्षण व प्राथमिक शिक्षण हे खेळत खेळत मातृभाषेतून होणे सर्वात श्रेयस्कर. यामध्ये घरातील, शाळेतील आणि परिसरातील मंडळींचा सहभाग असायला हवा. मूल थोडं मोठं झाल्यानंतर त्याचं संपर्कक्षेत्र विस्तारण्यासाठी अधिक भाषा पण शिकायला हव्यात. त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी अशी टप्प्याटप्प्याने व्हावी, असे मला वाटते.
लिहिता वाचता येणं ही जशी आपण मूलभूत गोष्ट मानतो तसंच डिजिटल साक्षरता ही पण आज तितकीच मूलभूत गोष्ट झालेली आहे. तंत्रज्ञानाने अनेक सुविधा निर्माण केल्या असल्या तरी त्याचबरोबर अनेक नवीन प्रश्नही निर्माण केले आहेत. या प्रश्नांची सोडवणूक आपण व्यक्तिगत तथा सामाजिक पातळीवर ही नवीन तंत्रज्ञाने कशी राबवतो, यावर अवलंबून आहे. विशेषतः लहान मुलांबद्दल तर हे अधिकच महत्त्वाचे आहे.
मला माझ्या एका जर्मन मित्राने सांगितलेली गोष्ट आठवते. जेव्हा टेलिव्हिजन नवीनच उपलब्ध झाला होता, तेव्हा जर्मनीच्या काही शहरांमध्ये घरी टेलिव्हिजन असला तर लहान मुलांना शाळेत ॲडमिशन नाकारण्याची प्रथा सुरू झाली होती. अर्थात हे काही फार काळ टिकलं नाही. पण नवीन तंत्रज्ञान अंगीकारताना त्याला एक महत्त्वाचं सामाजिक अंग आहे हे अधोरेखित करण्यास हे उदाहरण पुरेसं असावं. नवीन प्रचलित होणाऱ्या तंत्रज्ञानाकडे केवळ पाठ फिरवून हे प्रश्न सुटणारे नाहीत. त्यासाठी सतत सामाजिक प्रबोधनाची गरज आहे. तंत्रज्ञान चांगलं की वााईट असं बऱ्याच वेळी विचारण्यात येतं. माझ्या मते तंत्रज्ञान हे तंत्रज्ञान असतं, ते चांगलं की वाईट हे आपण वापरकर्त्यांच्या मानसिक जडणघडणीवर अवलंबून असतं.
डीपटेक क्षेत्रात विद्यापीठात संशोधनाबरोबर उद्योजकता आणि उद्योगात उद्योजकतेबरोबर संशोधन आता अपरिहार्य झाले आहे. मराठी माणसं डीपटेकच्या क्षेत्रात पुढे येत आहेत ही खूप आनंदाची गोष्ट आहे. गौरव सोमवंशीसारखा तरुण उद्योजक तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी राबवत आहे.
आर्थिक प्रगतीबरोबर आर्थिक विषमतेला आळा घालण्याकडे लक्ष देणेही आवश्यक आहे. माझ्या मते यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे ग्रामीण भागातील आर्थिक विकासाकडे लक्ष देणे. आज ज्ञान युगातील डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ग्रामीण भागात शेती व शेतीला पूरक असे व्यवसाय यांच्या पलीकडे जाऊन उद्योग आणि सेवा क्षेत्रातही बऱ्यापैकी अर्थार्जन करणे शक्य आहे. ग्रामीण भागात युवक मंडळींची संख्या शहरी भागासारखी किंवा त्याहून अधिक असल्याने डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अर्थकारणात बऱ्यापैकी भर पडू शकते. त्याहून महत्त्वाचं म्हणजे हे ग्रामीण भागात घडल्याने शहरी-ग्रामीण अंतर बऱ्यापैकी कमी होऊन विषमतेला चांगला आळा बसू शकेल.
हे साध्य होण्यासाठी आवश्यक गोष्ट म्हणजे ग्रामीण भागातसुद्धा शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या चांगल्या सोयी निर्माण करणे. एमकेसीएलसारख्या संस्थांनी हे करून दाखवले आहे. ‘वर्क फ्रॉम होम’च्या धर्तीवर वर्क फ्रॉम व्हिलेज अंगीकारून सेवा क्षेत्रात खूप काम होऊ शकतं. तसेच गोठ्याच्या बाजूच्या एअर कंडिशनर खोलीत थ्रीडी प्रिंटिंगच्या माध्यमातून औद्योगिक उत्पादनाचं काम होऊ शकतं. मला वाटतं सतत ऐकू येणारा, गावं रिकामी करून लोकांना शहराकडे वळवण्याचा घोषा हा औद्योगिक युगातील मानसिकतेचा परिपाक असून, आजच्या ज्ञानयुगात तो गैरलागू आहे. ‘सिलेज’ या संकल्पनेवर म्हणूनच आजकाल मी सतत भर देत असतो.
जगात आज जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत जिंकण्याच्या हव्यासापोटी माणसं स्वत:तला माणूस विसरत आहेत की काय अशी शंका येते. मराठीने आपल्याला समृद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा दिला असून, या वारशाचे जतन स्पर्धेत पुढे राहूनसुद्धा आपलं माणूसपण जागृत ठेवण्यात मदत करते असे मी मानतो. धावपळीच्या तंत्रज्ञान युगात आपल्याला माणसाचा रोबो न होऊ देता त्यांच्यातली संवेदना व संस्कृतता टिकवायची आहे, किंबहुना ती अधिक समृद्ध करायची आहे. जागतिक मराठी अकॅडमीचाही तोच उद्देश आहे असं मी मानतो.
जागतिक मराठी अकादमीतर्फे आयोजित २१व्या ‘शोध मराठी मनाचा’ या गोव्यात सुरू असलेल्या जागतिक मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणाचा सारांश.