कसोटीला आयसीसी मृतावस्थेत पाहू इच्छिते? लीग सामन्यांचे कॅलेंडर वेगळे करावे लागेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 01:14 PM2024-01-07T13:14:51+5:302024-01-07T13:15:41+5:30

मालिकेतील दिवसांचा विचार केल्यास कसोटी क्रिकेट कुठे जात आहे, याबद्दल काळजी वाटते. वनडे आणि टी-२० हे दोनच  प्रकार शिल्लक राहतील का, अशी शंका येते.

Does ICC want to see Test dead? The calendar of league matches has to be separated! | कसोटीला आयसीसी मृतावस्थेत पाहू इच्छिते? लीग सामन्यांचे कॅलेंडर वेगळे करावे लागेल!

कसोटीला आयसीसी मृतावस्थेत पाहू इच्छिते? लीग सामन्यांचे कॅलेंडर वेगळे करावे लागेल!

-अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर

दक्षिण आफ्रिका-भारत यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. दोन्ही सामने एकूण पाचच दिवस चालले. त्यानंतरही मालिका रोमांचक झाली. दोन्ही संघांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, भारताने पहिली कसोटी जिंकल्यानंतर मुसंडी मारताना मालिका बरोबरीत सोडविली; पण द. आफ्रिकेत पहिली मालिका जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. भारताच्या दृष्टीने मालिका अनिर्णीत राखणे ही मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. मालिकेतील दिवसांचा विचार केल्यास कसोटी क्रिकेट कुठे जात आहे, याबद्दल काळजी वाटते. आयसीसीने कसोटी क्रिकेटला मृतावस्थेत नेण्याचे ठरविले का, असा विचार मनात डोकावतो. वनडे आणि टी-२० हे दोनच  प्रकार शिल्लक राहतील का, अशी शंका येते.

नाण्याच्या दोन बाजू...

या शंकेला बळ यासाठी मिळते की न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या द. आफ्रिका संघात सात अनकॅप्ड (आंतरराष्ट्रीय अनुभव नसलेले) खेळाडू आहेत. कॅगिसो रबाडा, एडन मार्कराम, हेन्रिच क्लासेन हे स्थानिक टी-२० लीग खेळणार आहेत. ते कसोटी संघात नसल्यावरून वाद उद्भवला. द. आफ्रिका क्रिकेट बोर्डाची बाजू अशी की क्रिकेट चालविण्यासाठी आम्हाला पैसा लागतो. स्थानिक टी-२० लीगमध्ये दिग्गज नसतील, तर सामने पाहणार कोण? दुसरी बाजू अशी की कसोटीला तुम्ही सापत्न वागणूक देऊ शकत नाही, अशी भूृमिका अन्य बोर्डांनी घेतल्यास कसोटी क्रिकेट इतिहासजमा होईल.

आयसीसीने प्रोटोकॉल आखावा

दोन्ही बाजू योग्य असतील; पण वादात वेळ घालविण्याऐवजी आयसीसीने प्रोटोकॉल तयार करावा. याअंतर्गत खेळाडू अखेरच्या क्षणी माघार घेऊ शकणार नाहीत, ही अट टाकावी.  लीग आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचे कॅलेंडर एकाचवेळी येणार नाही, याची काळजी घ्यावी. कसोटी वाचवायला हे करावेच लागेल. अन्यथा हा प्रकार भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडपुरता मर्यादित होईल. अन्य बोर्ड आर्थिक संकटामुळे कसोटी क्रिकेटपासून दूर असतील.

विदेशात विजय नोंदविणे गरजेचे

भारत-द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया- पाकिस्तान मालिका एकाचवेळी झाल्या. दोन्ही मालिकांवर नजर टाकल्यास विदेशात विजय नोंदविणे किती अवघड असते हे पाहायला मिळाले. भारतीय संघ भक्कम होता, तरी मालिका जिंकू शकला नाही. पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियाने ०-३ ने सफाया केला. भारताकडून रोहित, विराट आणि राहुल यांनी फलंदाजीत प्रभावी कामगिरी केली. राहुलने शतकी खेळी केली; पण शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यर यांनी अपेक्षाभंग केला. हे युवा खेळाडू विदेशात यशस्वी होईपर्यंत महान बनू शकणार नाहीत.

पाकिस्तानचे हेच हाल झाले. बाबर आझम फ्लॉप ठरला. शाहीन शाह आफ्रिदी ऑस्ट्रेलियात भेदक ठरला; पण तो तिसरा सामना खेळला नव्हता. कार्यभार व्यवस्थापनामुळे त्याला तिसरी कसोटी खेळता आली नाही, अशी चर्चा आहे; पण अशा गोष्टी कसोटी क्रिकेटचे महत्त्व कमी करतात. शाहीन शानदार खेळाडू आहे; पण तो संघासाठी शंभर टक्के योगदान देत नाही.

Web Title: Does ICC want to see Test dead? The calendar of league matches has to be separated!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :ICCआयसीसी