व्यर्थ न हो बलिदान
By Admin | Updated: December 2, 2014 02:01 IST2014-12-02T02:01:16+5:302014-12-02T02:01:16+5:30
आॅस्ट्रेलियाचा आघाडीचा फलंदाज फिल ह्यूज याच्या मृत्यूनं क्रिकेटचं मर्यादित जगच नाही तर बृहद जगही हादरून गेलं आहे.

व्यर्थ न हो बलिदान
डॉ. बाळ फोंडके
(पत्रकार व विज्ञान लेखक) -
आॅस्ट्रेलियाचा आघाडीचा फलंदाज फिल ह्यूज याच्या मृत्यूनं क्रिकेटचं मर्यादित जगच नाही तर बृहद जगही हादरून गेलं आहे. एका उमद्या तरुण खेळाडूचा असा मैदानावरच अंत होणं हे दु:खदायक तर आहेच; पण ज्या प्रकारे त्याला असा कायमचा निरोप घ्यावा लागला, त्यामुळं वादाला तोंड फुटलं आहे.
१९७०च्या दशकात आपला आघाडीचा फलंदाज आणि कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टरलाही उसळत्या चेंडूच्या डोक्यावर झालेल्या आघातापायी गंभीर जखम झाली होती. त्याच्यावर तातडीनं वैद्यकीय उपचार झाल्यावरही तो काही दिवस मृत्यूशी झुंज देत होता. सुदैवानं तो वाचला. पण त्या घटनेनंतर जे विचारमंथन झालं, त्यातूनच क्रिकेटखेळाडूंना हेल्मेट वापरण्याची परवानगी देण्यात आली. त्याचा वापर करूनही ह्यूज ताशी जवळजवळ १५० किलोमीटरच्या वेगानं येणाऱ्या उसळत्या चेंडूपासून आपला बचाव करू शकला नाही. अर्थातच ही सुरक्षा व्यवस्था पर्याप्त आहे की काय, असा प्रश्न विचारला जाऊ
लागला आहे.
ह्यूजनं जे हेल्मेट वापरलं होतं ते जुनं होतं, असं जरी त्याचं उत्पादन करणाऱ्या मासुरी या कंपनीनं सांगितलं असलं, तरी ते गेल्याच वर्षी, म्हणजे २०१३ सालीच तयार करण्यात आलं होतं हेही खरं आहे. म्हणजे तसं ते फार जुनं होतं अशातला भाग नाही. आणि त्यानंतर यंदाच्या वर्षी त्या कंपनीनं जे नवीन हेल्मेट बाजारात आणलं आहे, ते वापरल्यानं ह्यूजचा जीव वाचला असता की काय, याविषयी तज्ज्ञांमध्ये दुमत आहे.
जे हेल्मेट ह्यूजनं वापरलं होतं, तेच बहुतांश खेळाडू वापरतात. त्या हेल्मेटमध्ये तोंडावर टायटॅनिमची जाळी असते. ती जवळजवळ हनुवटीपर्यंत लांबवलेली असते. त्यामुळं डोळे, हनुवटी, दात वगैरेंचं रक्षण होत असलं तरी त्या जाळीच्या फटीतून नाकावर चेंडू आदळू शकतो. डोक्याच्या बहुतांश भागावर या हेल्मेटचं संरक्षण असलं तरी मानेकडच्या भागाला कसलंच संरक्षण नसतं. आणि नेमक्या त्या त्रुटीनंच ह्यूजचा बळी घेतला. कारण त्या चेंडूला चुकवण्यासाठी त्यानं जेव्हा आपलं डोकं वळवलं तेव्हा तो चेंडू मानेवर आदळला. मानेच्या या भागातून मणक्याकडे एक मोठी रक्तवाहिनी जाते. चेंडूच्या आघातापायी ही फुटली आणि तिच्यातून मोठ्या प्रमाणावर तसंच वेगानं रक्तस्राव सुरू झाला. रक्ताचं जे थारोळं डोक्यामध्ये तयार झालं, त्याचा मेंदूवर दाब पडू लागला. मेंदूमध्येही रक्तस्राव सुरू झाला. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून मेंदूवरचा हा दाब कमी करण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा उपयोग झाला नाही.
मानेचा हा भाग अतिशय नाजूक असाच आहे. ती महत्त्वाची रक्तवाहिनी तर त्या भागातून जातेच; पण मणक्याचा काही भाग तिथं असतो. ज्या वेगानं चेंडू येतो, त्याच्या फटक्यानं मणक्यालाही इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच मानेच्या त्या भागाचंही संरक्षण करणाऱ्या नवीन हेल्मेटची निर्मिती केली जावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. सिडनी विद्यापीठातल्या बायोमेकॅनिक विभागातील प्राध्यापक एडुआर्ड फर्नांडिस यांनी तर हेल्मेटच्या आत कॉम्पोझिट पदार्थांची स्कल कॅप असावी, अशी शिफारस केली आहे. सुनील गावसकर हेल्मेट वापरत नसे; पण आपल्या टोपीच्या आत ते अशी पोलादाची स्कल कॅप वापरत असत.
इंग्लंडमधील लवबरो आणि कार्डिफ विद्यापीठातील वैज्ञानिकांनी गेल्या वर्षी क्रिकेट खेळाडूंना झालेल्या इजेच्या ३५ चित्रफितींचा अभ्यास केला होता. त्यात बहुतांश इजा चेहऱ्याच्या समोरच्या भागाला झाल्या होत्या. जाळीतून आत आलेल्या चेंडूच्या आघातामुळं हाडं मोडली होती. पण १७ टक्के इजा चेंडू हेल्मेटच्या मागच्या भागावर झालेल्या आघातामुळं झाल्या होत्या. सहा टक्के इजा मात्र ह्यूजसारख्याच मानेवर चेंडू आदळल्यापायी झालेल्या होत्या. त्यामुळं हेल्मेटच्या रचनेचा सर्वांगीण पुनर्विचार करून नवीन हेल्मेटची निर्मिती केली जावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
मासुरी या उत्पादक कंपनीची मात्र वेगळीच तक्रार आहे. अशा प्रकारे अधिक संरक्षण देणारी हेल्मेट बनवण्याचा प्रयत्न आपण केला होता; पण त्याला खेळाडूंची मान्यता मिळाली नाही, असा तिचा दावा आहे. अशा प्रकारच्या हेल्मेट वापरण्यानं आपल्या हालचालींवर बंधनं पडतात. १५५ ग्रॅम वजनाचा
चेंडू जेव्हा ताशी दीडशे किलोमीटरच्या वेगानं समोरून येत असतो, तेव्हा चपळ हालचाली करणं भाग असतं. त्यातच अडथळा निर्माण झाला तर उलट इजा होण्याचीच
शक्यता वाढीस लागेल, असं खेळाडूंचं म्हणणं आहे. त्यातही तथ्य जरूर आहे. ते ध्यानात घेऊन अधिक संरक्षण देणाऱ्या हेल्मेटचं एक नवीनच मॉडेल तयार करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं आवश्यक आहे. तसं झालं तर ह्यूजचं बलिदान सर्वस्वी व्यर्थ जाणार नाही.