तूर्तास निष्ठा विकणे नाही

By Admin | Updated: August 6, 2014 11:44 IST2014-08-06T11:44:21+5:302014-08-06T11:44:34+5:30

नारायण राणेंनी आपल्या दोन बछड्यांसह प्रथम शिवसेना सोडली आणि ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. अलीकडे ते भाजपामध्ये जाणार, अशा वावड्या उठल्या.

Do not sell loyalty for a while | तूर्तास निष्ठा विकणे नाही

तूर्तास निष्ठा विकणे नाही

>नारायण राणेंनी आपल्या दोन बछड्यांसह प्रथम शिवसेना सोडली आणि ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. अलीकडे ते भाजपामध्ये जाणार, अशा वावड्या उठल्या. त्यांचा ते इन्कार करून आपण काँग्रेसमध्येच राहू, असे त्यांनी आता म्हटले आहे व ती काँग्रेससाठी स्वागतार्ह अशी बाब आहे. अनुयायांच्या मोठय़ा संख्येनिशी आपण एखादी वेगळी भूमिका घेऊ, हा त्यांचा आडाखा त्यांच्या कोकण दौर्‍यात मोडकळीत निघाला. मात्र, त्यांचे तळ्य़ात-मळ्य़ात असणे लोकमानसात अजून शिल्लक राहिले आहे. त्याआधी छगन भुजबळांनीही आपले बछडे घेऊन सेनेतून काँग्रेसमध्ये व पुढे काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणे पसंत केले. अजून ते राष्ट्रवादीत असले, तरी त्यांचे सहायक परत शिवसेनेत जाताना दिसत आहेत. विदर्भात दत्ता मेघे काँग्रेसच्या पराभवाची वाटच पाहत होते. वर्धा क्षेत्रातून त्यांचे थोरले चिरंजीव पराभूत झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांसह भाजपात प्रवेश केला. आपली आयुष्यभराची निष्ठा शरद पवारांच्या पायाशी दाखल केली, असे साभिमान सांगणारे मेघे पवारांना सोडून प्रथम देशमुखांकडे (काँग्रेस) गेले आणि आता त्यांनी देशमुखांचाही पार सोडला आहे. त्यांच्या दोन्ही मुलांना नितीन गडकरींकडून विधानसभा आणि विधान परिषदेची तिकिटे मिळणार असल्याचे त्यांचे आस्थेवाईक सांगत आहेत. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचा एक मुलगा भाजपात, तर एक काँग्रेसमध्ये आहे आणि त्या दोघांनाही त्यांच्या पक्षाची तिकिटे हवी आहेत. स्वत: देशमुख निम्मे काँग्रेसमध्ये आणि निम्मे भाजपात आहेत. एकेकाळी त्यांनी बसपाचा उंबरठाही झिजविला आहे. पण,ही सारी लहान माणसे झाली. सार्‍या देशातच सध्या पक्षांतराची लागण दिसत आहे. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि कै. कैलासनाथ काटजू या पं. नेहरूंच्या ज्येष्ठ सहकारी मंत्र्यांचे चिरंजीव असलेल्या न्या. मार्कंडेय काटजू यांनी देशातील न्यायालयांतील भ्रष्टाचारावर प्रथम टीका केली. पुढे ते प्रशासनावर घसरले. त्यांच्या टीकेचा एक रोख काँग्रेसवरही होता. स्वाभाविकच जाणकारांनी ताडले की, या काटजूंनाही नव्या सरकारसोबत जाण्याचे वेध लागले आहेत. काटजू स्वत: तसे काही म्हणत नसले, तरी त्यांनी टीकेसाठी जी माणसे व जे विषय निवडले आहेत ते पाहता त्यांच्या वाटचालीची दिशा समजू शकणारी आहे. काटजूंपाठोपाठ आता कुंवर नटवरसिंह. हे इंदिरा गांधींच्या सरकारात परराष्ट्रमंत्री म्हणून काम केलेले, चंद्रास्वामीला जगभर हिंडवून आणणारे आणि आपण राजकारणात नेहमीच फार काटेकोर भूमिका घेतल्या नाही, असे आपल्या ‘वन लाईन इज नॉट इनफ’ या ताज्या आत्मचरित्राच्या प्रस्तावनेत सांगणारे. या नटवरजींना डॉ. मनमोहनसिंग यांच्या दुसर्‍या राजवटीतील चुका आता एवढय़ा काळानंतर एकाएकी खुपू लागल्या आहेत. त्यांचा पाढा आपल्या आत्मचरित्रात वाचण्याचा हुच्चपणा त्यांनी केला आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मनमोहनसिंग अशा सार्‍यांनाच त्यांनी आपले लक्ष्य बनविले आहे. आपण कुठे जाणार, हे ते सांगत नसले तरी आपण स्वस्थ बसणारे नाही, हे त्यांनी उघड केले आहे. आपल्याकडील राजकारणी माणसांच्या निष्ठा फार पातळ असतात आणि त्यांना मूल्यांशी काही घेणेदेणे नसते. तरीही जी माणसे आपल्या पक्षाच्या व नेतृत्वाच्या पराभवातही त्यांची साथ सोडत नाहीत त्यांच्याविषयी जनतेला आदरच वाटत आला आहे. पण, काटजू काय आणि नटवर काय, ही माणसे सामान्यांमधून वर आलेलीच नाहीत. काटजू हे पुढारीपुत्र म्हणून पुढारी, तर नटवर हे भरतपूरच्या राजघराण्याशी संबंधित म्हणून राजकारणात. यांना जनतेशी घेणेदेणे नाही. जेथे सत्ता तेथे हे, अशीच त्यांची वागणूक व तशीच त्यांची वाटचाल. पक्षांतरकर्त्यांना जनतेचे भय नाही, माध्यमांची भीती नाही आणि राजकारणात सोबत आलेल्यांची पर्वा नाही. त्यांना फक्त सत्तेचे आकर्षण आहे आणि सत्ताधारी हे त्यांचे दैवत आहे. ही गोष्ट फक्त लोकशाहीतच शक्य आहे. त्यातही ती अप्रगत लोकशाहीत जास्तीची सोपी आहे. पूर्वीच्या राजेशाहीत असे करणार्‍यांचे हात वा डोकेच कलम झाले असते. लोकशाहीत मात्र यांना चाहते मिळतात, अनुयायी सापडतात. भारताची विस्मरणशील जनता त्यांचे पक्षांतर विसरते, निष्ठांतर मनात ठेवत नाही आणि ते करताना त्यांनी केल्या असलेल्या लांड्यालबाड्याही तिच्या कौतुकाचा विषय होतात. एकेकाळी पक्षांतर क्वचितच व्हायचे. त्यामुळे ते करणार्‍यांना आयाराम आणि गयाराम अशी प्रभुरामचंद्राची नावे दिली गेली. पण रामांची संख्या नंतरच्या काळात एवढी वाढली, की व्यक्तिगत नावांपेक्षा त्यांच्या कळपांना नावे देणे सोयीचे झाले. आता तर पक्षनिष्ठा ही घाऊक पद्धतीने खरेदी वा विक्रीची वस्तू झाली आहे. ती विकायला धाडसाहून बेशरमपणाच अधिक लागत असतो. 

Web Title: Do not sell loyalty for a while

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.