जोकोविच म्हणतो, लसीविषयी विचारणारे तुम्ही कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 08:18 AM2022-01-07T08:18:05+5:302022-01-07T08:18:25+5:30

सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविच कोरोना लसीला विरोध करणाऱ्या ‘स्वातंत्र्यवादी लोकां’च्या बाजूचा असल्याने ऑस्ट्रेलियात अडकून पडला आहे.

Djokovic says, who are you to ask about vaccines? | जोकोविच म्हणतो, लसीविषयी विचारणारे तुम्ही कोण?

जोकोविच म्हणतो, लसीविषयी विचारणारे तुम्ही कोण?

googlenewsNext

- विनय उपासनी, मुख्य उपसंपादक, 
लोकमत, मुंबई
टेनिस कोर्टावर खेळताना एक नियम असतो. आखून दिलेल्या सीमारेषेवरून किंवा त्याच्या बाहेर जाऊन चेंडू तटवला तर तो फाऊल ठरतो. याचाच दुसरा अर्थ टेनिस कोर्टाच्या सीमा न ओलांडता खेळाडूला नियमांच्या रेषेत खेळावे लागते.  सलग ३५४ आठवडे जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला सर्बियाचा खेळाडू नोवाक जोकोविच टेनिस कोर्टावर या नियमांचे काटेकोर पालन  करतो. मात्र,  हाच जोकोविच कोर्टाबाहेर पडला की, रॅकेट मोडून फेकावी त्याप्रमाणे नियम भिरकावून वागायला लागतो तेव्हा खरा जोकोविच कोण, हा प्रश्न निर्माण होतो. त्याच्या याच स्वभावामुळे ऑस्ट्रेलियातून हकालपट्टीची नामुष्की ओढवलेल्या जोकोविचला सध्या एका सरकारी हॉटेलमध्ये सोमवारी कोर्ट काय निर्णय देते, याची वाट पाहावी लागणार आहे.

वर्षारंभीची ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा टेनिसपटूंसाठी पंढरीच्या वारीसारखी असते. ही मानाची स्पर्धा  जोकोविचने तब्बल नऊ वेळा खिशात घातली आहे. त्यामुळे त्याला या स्पर्धेत मानाचे पान असते. तोही जगज्जेत्याच्या थाटात या स्पर्धेत उपस्थित राहात असतो. मात्र, यंदा जोकोविचला कदाचित न खेळताच ऑस्ट्रेलियातून घरी परतावे लागणार आहे. 

ओमायक्रॉन या नव्या कोरोना व्हेरिएंटमुळे  जगभरातच एकूण घबराट पसरलेली आहे. अशा वातावरणात सर्व महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला बायो बबल, कोरोना नियम, कोरोना चाचण्या, कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाचे प्रमाणपत्र वगैरे नियमांच्या मांडवाखालून जावे लागत आहे. त्यात अनुभवी, अननुभवी, दिग्गज, पोरसवदा अशा कोणत्याही खेळाडूला सूट - सवलत नाही. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतही खेळाडूंना लसीकरणाचे प्रमाणपत्र सादर करण्यास सांगण्यात आले. मात्र, जोकोविचकडे नेमके तेच नव्हते. त्याला स्पर्धेत प्रवेश मिळाला. पण, देशातल्या प्रवेश - नियमांच्या पालनासाठी आवश्यक लसीकरणाचा पुरावा नसल्याने ऑस्ट्रेलियात पोचताच त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला आणि  मेलबर्न विमानतळावर आठ तास रखडून ठेवण्यात आले.  अंतिमत: त्याला ऑस्ट्रेलियात प्रवेशच नाकारण्यात आला. झाल्या प्रकाराने अहं दुखावलेल्या जोकोविचने थयथयाट करत कोर्टाची दारे ठोठावल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे. आता ऑस्ट्रेलियन कोर्ट सोमवारी त्याच्या प्रत्यार्पण प्रकरणाची सुनावणी करील.

जोकोविचने फेसबुकवर लसीविषयी शंका व्यक्त केली होती. ‘व्यक्तिश: मी लसीकरणाविरोधात आहे आणि लसीची सक्ती मला कोणीही करू नये. तशी वेळ आलीच तर मला विचार करावा लागेल’, ही त्याच्या तोंडची वाक्ये आहेत.  एप्रिल, २०२०मध्ये जोकोविचने ही मुक्ताफळे उधळली.  दोन महिन्यांनंतर जोकोविचला कोरोनाची बाधा झाली. या अनुभवानंतरही लसीबद्दल त्याची भूमिका बदलली नाही. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या यूएस ओपन स्पर्धेत जोकोविचला पराभवाची चव चाखावी लागली. ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांना लसीकरण प्रमाणपत्राची सक्ती होती,  स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना मात्र अशी कोणतीही सक्ती  नव्हती. या दरम्यानही जोकोविचने आपण लस घेतली किंवा कसे, याचा थांगपत्ता लागू दिला नव्हता. आताही ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तेथील सरकारने लसीकरण प्रमाणपत्राची सक्ती केलीच होती. तरीही जोकोविचला स्पर्धेत प्रवेश कसा मिळाला, याबद्दल आता रान उठले आहे. तेथील नागरिकांनी  सरकारला जाब विचारायला सुरुवातही केली. या दबावापुढे नमते घेत ऑस्ट्रेलियन सरकारने  जोकोविचला मेलबर्न विमानतळावरच रोखले.

आता ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेले सर्बियन नागरिक आणि जोकोविचचे चाहते विरुध्द लसीकरणाच्या सक्तिला अपवाद असताच कामा नये, असा आग्रह धरून बसलेले ऑस्ट्रेलियन नागरिक यांच्यात घमासान सुरू झाले आहे. 
जोकोविच स्वत:ला खेळापेक्षा मोठा समजतो का? कोरोना लस थोतांड आहे, असे त्याला वाटते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जोपर्यंत जोकोविचकडून मिळत नाहीत, तोपर्यंत त्याच्याकडे टेनिस कोर्टावरच्या जाळीप्रमाणे संशयाच्या जाळीतूनच पाहिले जाईल, हे नक्की.

Web Title: Djokovic says, who are you to ask about vaccines?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.