दिवाळी, पोलीस आणि आर. आर. आबा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2020 05:42 IST2020-11-16T05:40:32+5:302020-11-16T05:42:09+5:30
पोलिसांना घरच्या मंडळींबरोबर एकही सण साजरा करता येत नाही, याचे आबांना मोठे दु:ख होते! ते म्हणत, सणावारातसुद्धा तणाव; पोलीस काय करतील?

दिवाळी, पोलीस आणि आर. आर. आबा!
- वसंत भोसले
संपादक, लोकमत, कोल्हापूर
दिवाळी पाडव्याला वृत्तपत्रांना सुट्टी असते. दुसऱ्या दिवशीचा अंक प्रसिद्ध होत नाही. वर्षातून मिळणाऱ्या पाच सुट्ट्यांपैकी एक साजरी करीत त्या दिवशी सांगलीत घरी थांबावे वाटे. मात्र, आम्हा पत्रकारांचे मित्र आर. आर. आबा पाटील यांनी एक ओढ लावून ठेवली होती. दिवाळी पाडव्याला सांगली जिल्ह्यातील त्यांच्या अंजनी या छोट्या गावात तीन दिवस मुक्कामास आलेल्या आबांना भेटायला जायचे आणि गप्पागोष्टी करायच्या.
उपमुख्यमंत्री असताना ते गृहमंत्रिपदही सांभाळत होते. प्रोटोकॉल असल्याने नेहमी प्रचंड पोलीस बंदोबस्त असायचा; पण दिवाळीचे ते तीन दिवस अपवाद असत. वसूबारसेच्या सायंकाळी गावी पोहोचताच गाडीतून उतरल्यावर आबा पोलिसांना प्रेमाने निरोप द्यायचे, ‘तीन दिवस गावी जा. दिवाळी पाडवा संपल्यावर या! मी कोठेही जाणार नाही. २००५च्या दिवाळीला आबा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर एक वर्षाने आम्ही पत्रकार गेलो. वातावरणच तसे होते. एकच लालदिव्याची गाडी झाडाखाली उभी होती. त्यांचे गावाकडील स्वीय सहायक पी. एल. कांबळे आणि बाळू गुरव यांना भेटून चौकशी केल्यावर कळले, आबा आहेत की! पलीकडच्या गल्लीत श्यामरावतात्यांची तब्येत बरी नव्हती. त्यांना भेटायला गेलेत अन् पाच-दहा मिनिटांत पांढऱ्या पॅंटच्या दोन्ही खिशात हात घालून स्लिपर ओढत आलेच ते! गावभर चालतच फिरायचे. पोलिसांचा ताफा आणि ‘सरा बाजूला मंत्रिमहोदय येत आहेत’, हा सर्व रुबाब गायब असायचा. विचारल्यावर म्हणायचे, ‘दिवाळीच्या सणाला पोलिसांना सुट्टी दिली आहे. हा एकमेव असा सण आहे की, ज्यावेळी पोलीस बंदोबस्त लागत नाही, अन्यथा सणवार आनंद साजरा करणारे असतात; पण सणवारातही समाजात कधी तणाव निर्माण होईल, हे सांगता येत नाही. याची फार खंत वाटते. आपला समाज कधी प्रगल्भ होणार? गणेशोत्सवात अकरा दिवस पोलिसांना एक दिवस सुट्टी मिळत नाही हो!!’- असे ते अत्यंत कळवळून सांगत राहायचे. वारंवार पोलिसांचा आणि बंदोबस्ताच्या यंत्रणेचा संपर्क येत असूनही हे कधी लक्षात आले नव्हते. सर्वत्र पोलीस उभे आहेत, म्हणजे किती चोख कारभार आहे, असे वाटायचे. आबा सांगायचे , गणेशोत्सवात मुंबईत पोलीस तीन-तीन दिवसांनी घरी जातो. थोडी झोप काढून परत येतो. त्याला घरच्या मंडळींबरोबर सणही साजरा करता येत नाही. गणेशोत्सवाच्या सजावटीचे साहित्य खरेदीला मुलांबरोबर न गेलेल्या असंख्य पोलिसांशी माझे नेहमी बोलणे होते, त्यांचे दु:ख कोणाला कळणार?’
आबा तसे बातम्यांचा झराच होते. दिवाळी पाडव्यादिवशी मात्र एकही बातमी करायची नाही. उद्या तुमचे पेपरच निघणार नाहीत, बरे झाले, असे म्हणत मनमोकळ्या गप्पा मारत बसायचे. सार्वजनिक जीवनातील व्यक्तींना खासगी आयुष्यातील आनंदाचे क्षण फारच दुर्मीळ असतात. काहीवेळा मुलगा रोहितची भेटदेखील व्हायची नाही. दौरे करून येईपर्यंत तो झोपलेला असायचा. सकाळी लोकांच्या भेटीगाठीत आबा असायचे तेव्हा रोहित शेजारच्या सावळज गावातील इंग्रजी शाळेत पोहोचलेला असायचा. एकदा मी त्यांच्या गाडीतून तासगावला येत होतो. रोहितला मोटारसायकलवरून घेऊन येताना दिसताच आबांनी गाडी थांबवायला सांगितली आणि गाडीतूनच भेट घेतली. तेव्हा रोहित विचारत होता, आबा, सर्व पोलीस गेले का? कारण रोहितचे लाड पोलीस करीत असत.
दिवाळी पाडव्याची ही भेटीची परंपरा सलग दहा वर्षे चालू होती. २०१५ च्या १६ फेब्रुवारीला आबा गेले आणि अंजनीची वारी खंडित झाली. आजच्या पाडव्यानिमित्त ते दिवस आठवले की, सद्गदित व्हायला होते. एक जिंदादिल कार्यकर्ता, सामान्य माणसांच्या मनात डोकावणारा आणि त्याचवेळी सतत बातम्यांचा झरा त्यांच्या मुखातून वाहत असायचा. त्यामुळे पत्रकार मंडळी जाम खुश असत! राज्याचे नेतृत्व करायच्या गणिताची कोष्टके त्यांच्या मनात सोडविण्याचा नेहमी प्रयत्न असायचा हे फारच कमी जणांना माहीत होते. असे आबा, पोलीस आणि आजचा दीपावली पाडवा!