हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली
बिहारमध्ये केवळ राज्य विधानसभेची निवडणूक होत नसून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात अटीतटीचा राजकीय सामना होणार आहे. ठासून दारुगोळा भरलेली ही लढाई देशाचा मूड ठरवू शकते. महाराष्ट्र, हरयाणा किंवा दिल्लीपेक्षाही बिहारमधील निवडणूक वेगळी ठरणार; याचे कारण मोदी आणि राहुल दोघांचीही व्यक्तिगत प्रतिष्ठा या निवडणुकीत गुंतलेली आहे.
यावर्षीच्या जानेवारी महिन्यापासून मोदी यांनी आतापर्यंत नऊ वेळा बिहारला भेट दिली, जाहीर सभा घेतल्या, प्रकल्पांची उद्घाटने केली, स्थानिक लोकसमूहाशी ते प्रत्यक्ष बोललेही. बिहार हा त्यांच्यासाठी केवळ मतांचा हिशोब नाही तर हिंदी पट्ट्याच्या हृदयस्थानाशी असलेला संबंध त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. यावेळच्या निवडणुकीत ते १२ जाहीर सभा घेणार आहेत.
दुसरीकडे राहुल गांधी वेगळ्याच प्रकारे उत्साहित झालेले दिसतात. अलीकडे ते राजकारणात पुन्हा सक्रिय झाले. या सक्रियतेची परीक्षाच बिहारच्या राजकीय प्रयोगशाळेत होणार आहे. त्यांनी आतापर्यंत सात वेळा राज्याचा दौरा केला; राज्यातल्या नेत्यांबरोबर धोरण आखणीबाबत दीर्घ बैठका घेतल्या. लोकांशी संवाद साधण्यासाठी ते रस्त्यावरही उतरले.
मतदार याद्यांच्या विशेष सुधारणेला विरोध करण्यासाठी त्यांनी दोन आठवड्यांची यात्रा काढली होती. पूर्णियातील त्यांची ‘मत हक्क यात्रा’ आणि नंतर झालेली काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक यातून राहुल यांचा इरादा स्पष्ट झाला. राजकारणात जोरदार पुनरागमन करण्यासाठी ते बिहारचा उपयोग करू इच्छितात. थोडक्यात मोदी आणि राहुल यांच्यासाठी बिहार म्हणजे केवळ एक निवडणूक नाही तर विचारविमर्श, सहनशक्ती आणि रस्त्यावरची ताकद यांची परीक्षा राज्यात होणार आहे.
कार्ती यांना दिलासा : चिदंबरम खुशीत
मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कार्ती हे सिवगण या तामिळनाडूतील मतदारसंघातून खासदारही आहेत. आयएनएक्स मीडिया घोटाळ्यासह अनेक घोटाळ्यांत कार्ती यांच्यावर आरोप झाले. त्यांनी काही काळ तुरुंगातही काढला. त्यांचे पारपत्र आधी जप्त करण्यात आले होते. त्यांना परदेशात जावयाचे असल्यास न्यायालयाकडून पूर्वपरवानगी घ्यावी लागते. आता दिल्ली उच्च न्यायालयाने विदेशात जाण्यासाठी पूर्वपरवानगी घेण्याची अट काढून टाकली आहे.
न्यायालयाच्या निकालावर कोणीच प्रश्न उपस्थित करणार नाही. तरी कार्ती यांना ज्यावेळी हा दिलासा मिळाला त्यावेळेकडे मात्र लक्ष वेधले जात आहे. तपास संस्थांच्या भूमिकेविषयी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. कार्ती यांना दिलासा दिला गेला, त्याला या तपास यंत्रणांनी विरोध केला नाही.
पी. चिदंबरम यांनी काँग्रेस पक्षाला अडचणीत आणणारी भूमिका घ्यायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या पुत्राला हा दिलासा मिळाला आहे, ही गोष्ट दिल्लीतील जाणकारांच्या नजरेतून सुटलेली नाही. २६-११ मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या नंतर भारत हा पाकिस्तानविरुद्ध कारवाई करूच इच्छित होता; परंतु अमेरिकेच्या दडपणाखाली ती केली गेली नाही, असे चिदंबरम यांनी अलीकडेच म्हटले आहे.
थोडक्यात त्यांनी 'काँग्रेस विदेशी दबावाला बळी पडली' असेच सूचित केले. हा आरोप भाजप खूप काळापासून करत आला, परंतु आता चिदंबरम यांनी स्वतःच त्यावर शिक्कामोर्तब केले. त्याचप्रमाणे १९८४ सालचे ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ हा चुकीचा निर्णय होता, असा शेरा चिदंबरम यांनी मारला आहे. चुकीची किंमत इंदिरा गांधी यांनी आपला जीव गमावून मोजली, असेही ते म्हणतात. काँग्रेस पक्षाची हानी होऊ शकेल, अशी आणखी काही वक्तव्ये ते करतील, असा निरीक्षकांचा होरा आहे. harish.gupta@lokmat.com
Web Summary : Bihar witnesses a key Modi-Rahul face-off, potentially shaping national sentiment before 2024. Rahul's renewed activity faces a crucial test. Meanwhile, Karti Chidambaram gets relief amid P. Chidambaram's critical remarks about Congress, raising eyebrows about timing and motives.
Web Summary : बिहार में मोदी-राहुल का अहम मुकाबला, जो 2024 से पहले राष्ट्रीय भावना को आकार दे सकता है। राहुल की नई सक्रियता की अहम परीक्षा। इस बीच, कार्ति चिदंबरम को राहत मिली, जबकि पी. चिदंबरम की कांग्रेस पर आलोचनात्मक टिप्पणियों ने समय और इरादों पर सवाल उठाए।