हतबल आई-बाबा आणि उपाशी सहा मुलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 08:03 IST2025-08-25T08:02:14+5:302025-08-25T08:03:06+5:30

Israel-Hamas war: युध्दग्रस्त गाझा पट्टीत भुकेचा आगडोंब उसळला आहे. इथल्या माणसांना ‘आपण इस्त्रायली लष्कराच्या बाॅम्बने मरू की गोळीने’ ही भीती नाही  तर त्यांना चिंता आहे ती फक्त आज काही खायला  मिळेल की नाही याचीच! 

Desperate parents and six hungry children! | हतबल आई-बाबा आणि उपाशी सहा मुलं!

हतबल आई-बाबा आणि उपाशी सहा मुलं!

युध्दग्रस्त गाझा पट्टीत भुकेचा आगडोंब उसळला आहे. इथल्या माणसांना ‘आपण इस्त्रायली लष्कराच्या बाॅम्बने मरू की गोळीने’ ही भीती नाही  तर त्यांना चिंता आहे ती फक्त आज काही खायला  मिळेल की नाही याचीच! 

अबीर आणि फदी सोबाह हे जोडपं गाझा शहराच्या पश्चिमेस असलेल्या  निर्वासित छावणीत एका तंबूमध्ये आपल्या सहा मुलांसोबत राहातं. रोज उठल्यानंतर त्यांच्यासमोर आज आपल्याला आणि मुलांना खायला काही मिळेल का, हाच प्रश्न असतो. घरात आदल्या दिवशीचं काही म्हणजे काही शिल्लक नसतं.  अबीर आणि फदीसमोर अन्न  मिळवण्याचे तीन पर्याय असतात. एकतर मोफत अन्न वाटप करणाऱ्या सूप किचनमध्ये जाऊन काही मिळतंय का ते पाहणं किंवा अन्नसामग्रीची मदत घेऊन येणाऱ्या ट्रकवर चढून, गर्दीत घुसून धक्काबुक्की करत खाण्याचं सामान मिळवणं. नाहीतर ज्यांच्याकडे अन्न आहे, त्यांच्याकडे जाऊन भीक मागणं. काहीच साधलं नाही तर संपूर्ण कुटुंब उपाशी झोपतं. दुसरा दिवस उजाडला की, अन्नाचा शोध पुन्हा सुरू होतो.

सकाळी उठल्यानंतर अबीर समुद्रातून भरून आणलेल्या पाण्याने मुलांना आंघोळ घालते. त्या खारट पाण्याने आंघोळ करताना डोळे चुरचुरल्याने  चिमुकली हला भोकाड पसरते. पण, इतर मुलं गुमान राहून आंघोळ आटोपतात. नंतर अबीर तंबूत झाडू मारते. घरात थोडी डाळ असेल तर ती वाटून त्यात पाणी घालून त्याची पेज हलाला पाजते. नाहीतर बाटलीतून नुसतं पाणी पाजून भुकेने रडणाऱ्या हलाला शांत करण्याचा प्रयत्न करते. निर्वासितांना मोफत  अन्न मिळण्यासाठी  सूप किचन चालवलं जातं. पण, तिथेही आठवड्यातून एकदाच पाण्यासारखी डाळ मिळते. एरवी ते बंदच असतं. फदी अन्न मिळवण्यासाठी उत्तर गाझाकडील परिसरात रोज चक्कर टाकतो. तिथे इस्त्रायलकडून अन्नसामग्रीच्या मदतीचे ट्रक येतात. भूक अनावर झालेले लोक त्या ट्रकवर अक्षरश: झडप घालतात. इस्त्रायली सैनिक तेथील गर्दी आवरण्यासाठी गोळीबार करतात. अशाच एका गोळीबारात फदीच्या पायाला गोळी लागून त्याचा पाय जखमी झाला आहे.  अबीर मुलांना घेऊन पिण्याचं पाणी घेऊन येणाऱ्या ट्रकवरून पाण्याचे  दोन-चार जार भरून आणते. नंतर तीही अन्न  शोधण्यासाठी बाहेर पडते. मोफत अन्न वाटणाऱ्या ट्रकवर पुरुषांच्या गर्दीत घुसून काही मिळवण्याचा  प्रयत्न करते.  मुलं ऊन उतरलं की, बाहेर जाऊन चूल पेटवायला म्हणून इंधन शोधून आणतात. अन्न, पाणी आणि इंधनासाठी अशी वणवण केल्यानंतर रात्री खाण्यासाठी अबीरला डाळीचं पातळ सूप करता येतं. 

२२ महिन्यांपासून भूक भागवण्याचा संघर्ष वाट्याला आलेली अबीर आता थकली आहे. हे युद्ध आणखी लांबलं, तर आपण स्वत:लाच संपवून टाकू, असं ती आता निराशेने म्हणू लागली आहे. आज गाझातील निर्वासितांच्या छावणीत ‘भूक भागवायची कशी, हा प्रश्न  सगळ्यांनाच पडला आहे. हमासने ओलीस ठेवलेले आपले नागरिक सोडावे म्हणून त्यांच्यावरील दबाव वाढवण्यासाठी इस्त्रायल गाझातील लोकांपर्यंत अन्नसामग्रीची मदत पोहोचू देत नसल्याने गाझा पट्टीत भूकबळींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. युद्धात शत्रूला नामोहरम करण्याच्या  या क्रूर  अमानवी पध्दतीमुळे जग हळहळतं आहे, पण ते तेवढंच!

Web Title: Desperate parents and six hungry children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.