डिअर इंडिया, मी नेहमी तुला हृदयात जपून ठेवीन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 08:42 IST2025-01-15T08:42:04+5:302025-01-15T08:42:22+5:30

अमेरिकेचा राजदूत म्हणून या देशातल्या माझ्या कार्यकाळाचा समारोप होताना मी भारावून गेलो आहे. भारताने मला जे काही शिकवलं, त्याबद्दल अखंड कृतज्ञ राहीन!

Dear India, I will always keep you in my heart! | डिअर इंडिया, मी नेहमी तुला हृदयात जपून ठेवीन!

डिअर इंडिया, मी नेहमी तुला हृदयात जपून ठेवीन!

- एरिक गार्सेट्टी
(अमेरिकेचे भारतातील राजदूत)

पहिल्यांदा जेव्हा मी भारतात आलो, तेव्हा तरुण होतो. हा देश माझ्या हृदयावर इतकं गारुड करेल याची तेव्हा मला कल्पनाही नव्हती. आज, अमेरिकेचा राजदूत म्हणून या देशातल्या माझ्या कार्यकाळाच्या समारोपाच्या वेळेस, मी कृतज्ञतेने भारावून गेलो आहे. भारताने मला जे काही शिकवलं, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे आणि आपल्या दोन्ही देशांच्या परस्परसंबंधांविषयी आशावादीही! भारत आणि अमेरिकेचे परस्पर नाते संपूर्ण जगाला शांती आणि समृद्धीकडे घेऊन जाईल, याविषयी मला तिळमात्र शंका नाही.

भारताच्या या अद्भुत प्रवासात मी खूप भ्रमंती केली आहे. मुंबईच्या झगमगाटी रस्त्यांपासून कोलकात्याच्या सांस्कृतिक केंद्रापर्यंत, हिमालयाच्या पायथ्यापासून अरुणाचल प्रदेशातल्या हिरव्यागार डोंगररांगांपासून ते भारताच्या दक्षिण टोकाला असलेल्या कन्याकुमारीपर्यंत. या प्रवासात मी बऱ्याच गोष्टी शिकलो. त्यातली सर्वात महत्त्वाची ही की अमेरिका आणि भारत  एकत्र असले की जास्त मजबूत असतात!

जवळपास २०० अब्ज डॉलर्सच्या द्विपक्षीय व्यापारामुळे अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. ३ लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेतात. दुसऱ्या वर्षी सलग १० लाख नॉन-इमिग्रंट व्हिसा; हवामानासाठी ९.२५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, आणि ९० पेक्षा जास्त आरोग्य नवकल्पना या सगळ्या प्रयत्नांचे फळ फळ आज ४.५ कोटींहून अधिक भारतीयांपर्यंत पोहोचते आहे. 

अमेरिकेचा राजदूत म्हणून मी भारतात पोहोचलो, तेव्हा परस्पर सहकार्याच्या अपार शक्यता मला थक्क करून गेल्या. तंत्रज्ञान, व्यापार, महिला सक्षमीकरण, आरोग्यसेवा, सुरक्षित आणि स्थिर इंडो-पॅसिफिक, समुद्राच्या तळापासून अंतराळापर्यंत – अमेरिकन आणि भारतीय इतक्या विविध क्षेत्रांत एकत्र काम करत आहेत, ही भावना आश्चर्यचकित करणारीच होती. peace, prosperity, planet आणि  people हे  “चार पी” दोन्ही देशांच्या परस्परसंबंधात फार महत्त्वाची भूमिका बजावतात.

माझ्या पहिल्या अधिकृत दौऱ्यात  अहमदाबादमध्ये  ‘सेवा’ संस्थेच्या प्रमुखांची भेट झाली. हवामान बदलाचं आव्हान किती गंभीर आणि तातडीचं आहे, हे ‘सेवा’च्या कार्यकर्त्यांशी बोलताना मला कळकळीने जाणवलं. पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटमध्ये मलेरियाच्या लसीची पहिली तुकडी तयार होतानाचं दृश्य मी कधीही विसरणार नाही. भारतीय उत्पादक कंपनी, अमेरिकन जैवतंत्रज्ञान कंपनी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सामूहिक प्रयत्नांचा हा परिणाम होता. ती लस मध्य आफ्रिकी प्रजासत्ताकात पाठवली जात होती.

भारतीय उद्योजकांच्या प्रतिनिधींना शिखर परिषदांमध्ये भेटणं हा एक रोमांचक अनुभव होता. ‘सिलेक्टयुएसए” या परिषदेत भारतीय उद्योजकांच्या शिष्टमंडळाने इतिहासातली सर्वात मोठी  गुंतवणूक (३.४ अब्ज डॉलर्स) अमेरिकेत केली, तीही माझ्या उपस्थितीत!  यूएस-इंडिया विमान वाहतूक शिखर परिषदेत अमेरिकन विमानांच्या १५० अब्ज डॉलर्सच्या ऑर्डर्स दिल्या गेल्या. हरियाणामध्ये हवाई केंद्र तयार करण्याच्या योजनांचा आराखडा ऐकताना उद्योग क्षेत्रातील लोकांशी संवाद साधण्याचा सन्मान मला मिळाला.

मला नेहमीच भारतामधल्या कला आणि संस्कृतीचं कौतुक वाटत आलं आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाचं रक्षण करण्यासाठी यूएस-इंडिया सांस्कृतिक संपत्ती करारावर स्वाक्षरी करताना माझ्या मनात कृतज्ञतेची भावना होती. याचदरम्यान अमेरिकेत क्रिकेटचा प्रभाव वाढला.  २०२३ मध्ये मेजर लीग क्रिकेटच्या सुरुवातीपासून ते २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाच्या योजनेपर्यंतचे आराखडे माझ्यादेखत तयार झाले.

अमेरिका आणि भारत हे दोन देश जेव्हा मन आणि बुद्धीने एकत्र येऊन काम करतात, तेव्हा उघडत नाही असं कोणतंही दार नसतं आणि हे दोन देश मिळून तिसऱ्या कुणालाही मित्र बनवू शकतात, हे नक्की! आपण सर्वांसाठी उत्तम भविष्य घडवू शकतो, याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही.

लहानपणी भारतात पहिल्यांदा आलो होतो, आणि आता माझी कारकीर्द संपवून मी इथून निरोप घेतो आहे. आज मी जिथे आहे, तिथे असेन; असं त्या लहान वयात स्वप्नातसुद्धा वाटणं शक्य नव्हतं, हे खरंच! कधीकधी आपण छोट्या छोट्या मतभेदांची दरी उराशी बाळगून बसतो आणि खऱ्या संधींचा शोध घेण्याची दृष्टी हरवून बसतो. पण हेही खरं की मतभेदांपेक्षा भारत आणि अमेरिका या दोन देशांमधल्या अभिन्नत्वाच्या खुणा कितीतरी जास्त आहेत. हवामान बदल, तंत्रज्ञानाचा योग्य वापर, जागतिक लष्करी आव्हानं; हे सगळे प्रश्न आपण मिळून अधिक चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो. 

प्रिय भारता, तू केलेलं प्रेमळ स्वागत, मला दिलीस ती शिकवण आणि अढळ मैत्रीसाठी खूप खूप धन्यवाद. अमेरिकेचा राजदूत म्हणून या अद्भुत देशात काम करणं ही माझ्या आयुष्यातली सर्वोच्च सन्मानाची गोष्ट होती...मी नेहमी तुला माझ्या हृदयात जपून ठेवीन! बहोत बहोत धन्यवाद... चलो! 

Web Title: Dear India, I will always keep you in my heart!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.