फाटाफूट करणाऱ्यांना दलित समाजानेच दूर लोटाव
By Admin | Updated: April 14, 2016 03:14 IST2016-04-14T03:14:13+5:302016-04-14T03:14:13+5:30
बाबासाहेबांच्या आशीर्वादाने दलित समाजाने शिक्षणात चांगली प्रगती केली आहे. जिथे अन्याय होत असेल, तिथे दलित तरुण संघर्षासाठी पेटूनही उठत आहेत, परंतु ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’

फाटाफूट करणाऱ्यांना दलित समाजानेच दूर लोटाव
- रामदास आठवले
बाबासाहेबांच्या आशीर्वादाने दलित समाजाने शिक्षणात चांगली प्रगती केली आहे. जिथे अन्याय होत असेल, तिथे दलित तरुण संघर्षासाठी पेटूनही उठत आहेत, परंतु ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ या बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार आमच्यातील सर्व गटांना संघटित होणे मात्र, अनेक प्रयत्न करूनही जमलेले नाही. आता रिपब्लिकन ऐक्यासाठी केवळ नेत्यांवर अवलंबून न राहाता, कार्यकर्त्यांनी आणि दलित समाजानेच पुढाकार घ्यावा. ऐक्यापासून दूर जाऊन फाटाफूट करणाऱ्या नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, अशी भूमिका घेऊन समाजापासून दूर लोटावे. मग रामदास आठवलेंनी जरी ऐक्यविरोधी भूमिका घेतली, तरी त्यालाही वेगळा न्याय नको.
मी अनेकदा ऐक्यासाठी पुढाकार घेतला आहे. सन १९७४, १९८९, १९९५, २००३ असे तब्बल चार वेळा रिपाइं ऐक्य झालेही, परंतु प्रत्येक वेळी ते अल्पजिवी ठरले. ऐक्य न होण्याची किंवा न टिकण्याची अनेक कारणे आहेत. त्यातही युती कुणाशी करायची, प्रमुख नेता कोण होणार, हीच फाटाफुटीची मुख्य कारणे होती. फाटाफूट टाळून, टिकावू ऐक्य साधण्याची शक्ती केवळ जनरेट्यातच आहे. प्रकाश आंबेडकर सक्षम नेते आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एकदा ऐक्याची मशाल पेटणार असेल, तर मी दुय्यम भूमिका घ्यायला तयार आहे.एवढेच नव्हे, तर मी भाजपाशी सध्या असलेली युती तोडूनही बाहेर पडेन.
उत्तर प्रदेशात मायावती सत्तेची शिडी चढू शकल्या, कारण तेथे दलितांचा टक्का अधिक आहे, तसेच त्यांनी ओबीसी आणि ११ टक्के असलेल्या ब्राह्मणांनाही सोबत घेतले. त्यामुळे बहुजन समाज पक्षात अनेक गटतट असूनही सर्वांची मोट बांधून मायावती यशस्वी झाल्या. मात्र, रिपाइंचे सर्व गट एकत्र आले, तरीही महाराष्ट्रातील मतांची गणिते पाहाता, केवळ दलित मतांच्या आधारे सत्तेपर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही. त्यामुळे बहुजन आणि अन्य सर्व जातींनाही सोबत घेणे आवश्यक आहे. बाबासाहेबांचा विरोध ब्राह्मणांना नव्हे, तर ब्राह्मणत्वाला होता. त्यामुळे कोणत्याही जातीला विरोध करण्यापेक्षा आम्ही जातीपाती संपविण्याचे काम करत आहोत. त्यासाठीच ‘जाती तोडो, समाज जोडो’ अभियानसुद्धा राबविण्यात येत आहेत. गेल्या निवडणुकीपासून आमच्या पक्षाने ५० टक्के तिकिटे दलितेतरांना देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
भाजपाने इंदुमिलचा विषय मार्गी लावला, लंडनमधील बाबासाहेबांचे घर विकत घेतले, आरक्षणावर गदा येऊ देणार नाही, असे पंतप्रधान मोदी ठासून सांगत आहेत. आता ‘झोपडपट्टी संरक्षण विधेयक’ आणून २०१४ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्यात यावे, गावातील जमिनीचे सर्वेक्षण करून, अल्पभूधारक शेतकऱ्यांना ५-५ एकर जमिनीचे वाटप करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.
दलितांची परिस्थिती सुधारत आहे. दलित तरुणांनी आता केवळ नोकऱ्यांवर अवलंबून न राहाता, उद्योगांमध्येही आघाडी घ्यावी. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त आम्ही दलितांचे १२५ नवे उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करीत आहोत. े