सुधारकांचा मुकुटमणी

By Admin | Updated: April 14, 2016 03:15 IST2016-04-14T03:15:27+5:302016-04-14T03:15:27+5:30

राजकीय स्वातंत्र्याला सामाजिक समतेची जोड देऊन खऱ्या मानवमुक्तीचा ध्यास घेणाऱ्या भारतीय नेत्यांच्या थोर परंपरेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मुकुटमणी आहेत. राजा राममोहन रॉय यांच्यापासून

Critics of the reformers | सुधारकांचा मुकुटमणी

सुधारकांचा मुकुटमणी

- विजय दर्डा

राजकीय स्वातंत्र्याला सामाजिक समतेची जोड देऊन खऱ्या मानवमुक्तीचा ध्यास घेणाऱ्या भारतीय नेत्यांच्या थोर परंपरेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मुकुटमणी आहेत. राजा राममोहन रॉय यांच्यापासून म. ज्योतिबा फुल्यांपर्यंत आणि सुधारकाग्रणी आगरकरांपासून अलीकडच्या संत गाडगेबाबांपर्यंतच्या सुधारणावाद्यांचा मालिकेत, मुक्तीच्या सर्वांगाना स्पर्श करून एका सर्वांगीण क्रांतीचा मार्ग सुलभ व प्रशस्त करणाऱ्या महामानवांत त्यांचा समावेश होतो.
थोर व्याकरणकार पाणिनी म्हणतो, ‘जी माणसे समाजाच्या उत्थानासाठी आयुष्य वेचतात, त्यांच्यातच समाज पुढल्या काळात आपली दैवते पाहत असतो. राम, कृष्ण, बुद्ध, महावीर, येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर, गुरुनानक देवजी आणि गांधी ही माणसेच होती. मात्र, पाणिनीच्या वचनानुसार ती पुढे देवत्वाच्या पातळीवर पोहोचली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अशा पातळीवर पोहोचणारे आताचे नाव आहे.
भारत ही पाच हजार वर्षांची विकसित होत असलेली परंपरा आहे, असे पं. नेहरूंनी म्हटले असले, तरी या परंपरेत सनातनी मानसिकतेचा एक जुनाट वर्ग तसाच कायम राहिला आहे. या वर्गाने समाजात जातीय विषमता पेरली आणि माणसा-माणसात दुराव्याचे व तेढीचे बीज पेरले. परंपरेचा थोर प्रवाह शक्तिशाली असला, तरी त्याला या मानसिकतेचे किटाळ वाहून नेता आले नाही. परिणामी, समाजात उच्चनीच भाव, अस्पृश्यता आणि एकाच धर्मबांधवांच्या वेगवेगळ्या वस्त्यांचे प्राबल्य कायम झाले आहे. सुधारणेच्या व परिवर्तनाच्या परंपरा आल्या, पण त्यातल्या एकेका प्रश्नाशीच त्या संघर्ष करीत राहिल्या. त्यांना कधी विजय मिळाला, तर कधी त्या पराभूत झाल्या. या एकूणच दुष्टचक्राविरुद्ध सर्वंकष संघर्ष करण्याची व त्याला लागणारे वैचारिक, बौद्धिक व मानसिक क्रांतीचे हत्यार वंचितांच्या हाती देण्याची किमया ज्या एका महापुरुषाला साधली, त्याचे नाव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. सव्वाशे वर्षांपूर्वी याच दिवशी या भूमीत जन्म घेतलेल्या बाबासाहेबांनी त्यांचे सारे आयुष्य माणसांच्या मुक्तीसाठी पणाला लावले. ते तसे लावण्यासाठी आवश्यक असलेली अपार ज्ञानसाधना त्यांनी आयुष्यभर केली. मुक्तीचा लढा केवळ मानसिकच नव्हे, तर बौद्धिक व वैचारिक पातळीवरही लढावा लागतो याचे भान असल्याने, धर्मशास्त्र ते अर्थशास्त्र, इतिहास ते विधीशास्त्र आणि समाजशास्त्र ते राज्यशास्त्र असे सारे विषय त्यांच्या वास्तव प्रयोगानिशी त्यांनी आत्मसात केले. त्यांनी दिलेल्या लढ्यात त्यांना प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या असल्या, तरी एक दिवस या देशानेच त्यांना आपल्या संविधानाचे शिल्पकार बनविले. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता व धर्मनिरपेक्षता या मानवी मूल्यांची प्रेरणा तर या संविधानातून त्यांनी दिलीच, शिवाय या मूल्यांविरुद्ध जाणारी माणसे आणि प्रवाह हे समाजाचे शत्रू असल्याचा संस्कारही त्यातून त्यांनी घडविला. प्रगतीच्या प्रवासात आणि अस्मितांच्या उन्मादात माणूस हरवू नये, त्याचे माणूसपण कायम राहून त्याला विकास आणि प्रगतीसह उन्नत होण्याच्या सर्व संधी प्राप्त व्हाव्या, ही त्यांची मनीषा होती. त्यासाठी त्यांनी शिक्षण हे महत्त्वाचे साधन मानून, ते मिळविण्याची जिद्द समाजात उभी केली. माणसाला माणसांपासून वेगळे होऊ न देण्यासाठी बंधुता या मूल्याची त्यांनी पाठराखण केली. शिवाय, आपल्या वाट्याला आलेल्या विषमतेच्या व जातीयतेचा यातना दुसऱ्या कोणाच्या वाट्याला येऊ नयेत, यासाठी सारे आयुष्य त्यांची वेचले.
देशाला स्वातंत्र्य मिळून आता ६९ वर्षे होत आली. मात्र, ज्या मूल्यांसाठी बाबासाहेब लढले, त्यांचा प्रवास अजूनही खडतरच राहिला आहे. देशात धर्मांधतेएवढीच जात्यंधता आहे. विषमता कायम राहून समताच दिसेनाशी झाली आहे. माणसा-माणसातले दुरावे अधिक तीव्र होताना आणि त्यावर आपले राजकारण बेतणारे पक्ष बलवान होताना पाहावे लागत आहेत. मात्र, ही प्रकाशापूर्वीची अंधारी अवस्था आहे. या साऱ्या अनिष्टांवर मात करण्याची प्रेरणा व बळ देणारी शक्ती डॉ. आंबेडकर आणि त्यांची शिकवण ही आहे. त्यांच्या या सामर्थ्याची कल्पना अलीकडे आलेले पक्ष व संघटना त्यांच्यावर आपला हक्क सांगण्याचे ढोंग करताना त्याचमुळे दिसत आहेत. मात्र, सूर्य झाकता येत नाही आणि अंधाराचा अंतही झाल्याखेरीज राहात नाही. बाबासाहेबांना ज्ञानसूर्य म्हटले जाते. आताची देशाची अंधारी वाटचाल या ज्ञानसूर्याच्या प्रकाशाने उजळून निघणार आहे आणि उद्याचा दिवस खऱ्या स्वातंत्र्य आणि समतेचा, न्यायाचा आणि बंधुतेचा व धर्मनिरपेक्षतेचा आणि विश्वाच्या ऐक्याचा राहणार आहे.
समाज जेव्हा भ्रमाने ग्रासला जातो, तेव्हा त्याला त्याची खरी वाट दाखवायला महापुरुष जन्माला येतात, अशी भारतीयांची श्रद्धा आहे. आंबेडकरांनी ही वाट त्यांच्या हयातीत देशाला दाखविली आणि आता त्यांची सव्वाशेवी जयंती साजरी होत असताना, त्यांची प्रेरक शिकवण तीच वाट या समाजाला दाखविणार आहे.
भारताच्या या भाग्यविधात्याला, दलितांच्या मुक्तीदात्याला आणि राष्ट्राच्या संविधानकर्त्याला माझे व ‘लोकमत’ परिवाराचे कोटी कोटी प्रणाम.

Web Title: Critics of the reformers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.