संकटमोचक संकटात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 12:34 AM2021-03-16T00:34:40+5:302021-03-16T00:35:00+5:30

मिलिंद कुलकर्णी तत्कालीन भाजप - शिवसेना युती सरकार व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर उभ्या टाकणाऱ्या संकटाला सामोरे जाणारे ...

Crisis in Crisis! | संकटमोचक संकटात !

संकटमोचक संकटात !

Next

मिलिंद कुलकर्णी
तत्कालीन भाजप - शिवसेना युती सरकार व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर उभ्या टाकणाऱ्या संकटाला सामोरे जाणारे आणि त्यातून प्रयत्नपूर्वक मार्ग काढणारे जामनेर (जळगाव)चे माजी मंत्री गिरीश महाजन यांची ओळख उभ्या महाराष्ट्राला ‘संकटमोचक’ अशी आहे. मराठा समाजाचे आरक्षणप्रश्नी आंदोलन, शेतकऱ्यांचा मुंबईत धडकलेला पायी मोर्चा, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा उपोषणाचा इशारा अशा एक ना अनेक कठीण प्रसंगांत महाजन यांची शिष्टाई यशस्वी ठरली. हेच महाजन भाजपची सत्ता आणण्यात किमयागार म्हणून ओळखले जाऊ लागले. नगर, नाशिक, धुळे व जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपची सत्ता आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. सत्ता आणण्यात यशस्वी ठरणारे महाजन सत्ता राखण्यात मात्र जळगावात अपयशी ठरतील की, काय अशी शंका भाजपच्या २७ नगरसेवकांनी केलेल्या कथित बंडावरून येत आहे.
जळगावातील महापौरपदाच्या उर्वरित अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी १८ मार्च रोजी निवडणूक होत आहे. ७५ सदस्यीय महापालिकेत भाजपचे ५७ सदस्य असून मजबूत बहुमत आहे. शिवसेनेचे १५ तर एमआयएमचे ३ नगरसेवक आहेत. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार सहजगत्या निवडून आला. मात्र, सांगली महापालिकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ‘करेक्ट कार्यक्रम करीत बहुमतातील भाजपचा महापौर व उपमहापौर निवडणुकीत पराभव केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने आलेली ही सत्ता राष्ट्रवादीने चातुर्याने खेचून घेतली. नाशिक महापालिकेत स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत शिवसेनेचा चमत्कार करण्याचा प्रयत्न असफल ठरला. मात्र, जळगावात हा प्रयत्न यशस्वी ठरत असल्याचे आताच्या घडामोडींवरून दिसून येत आहे. कायमस्वरूपी सतर्क व सजग राहणाऱ्या महाजन यांना एवढ्या मोठ्या बंडाची कल्पना येऊ नये, याचे आश्चर्य वाटते.
बंडखोर नगरसेवकांची जी विधाने समोर येत आहेत, त्यावरून त्यांचा थेट रोख महाजन यांच्यावर नाही. परंतु, भाजपचे जिल्हाध्यक्ष व शहराचे आ. सुरेश भोळे यांच्यावर उघड नाराजी दिसून येत आहे. ही नाराजी अनेकदा उपोषण, जाहीर पत्रके, बैठकांमधील रुसवेफुगवे अशा माध्यमांतून उघड झाली होती. परंतु, पक्षाचे पदाधिकारी व नेतृत्वाने ती गांभीर्याने घेतली नाही.
उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याचा प्रघात
डॉ.के.डी.पाटील यांच्या रूपाने लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून भाजपचा २००१ मध्ये तत्कालीन पालिकेत प्रवेश झाला होता. सभागृहात सुरेशदादा जैन यांच्या आघाडीचे बहुमत मात्र, नगराध्यक्ष भाजपचा असे त्रांगडे त्यावेळी झाले होते. माजी नगराध्यक्ष बंडू काळे यांच्या नेतृत्वाखालील १७ नगरसेवकांनी तेव्हा आघाडीतून फुटून भाजपमध्ये प्रवेश केला होता. हे बंड तेव्हा खूप गाजले होते. त्या बंडाच्या नियोजनात महाजन यांचा सहभाग होता. पक्षाने त्यांच्याकडे पालक म्हणून जबाबदारी दिलेली होती. २०१८ मध्ये सार्वत्रिक निवडणूक आली असताना, महाजन यांनी जैन यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचे तत्कालीन महापौर ललित कोल्हे, उपमहापौर भारती सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येतील नगरसेवकांना भाजपमध्ये घेऊन तिकीट दिले होते. केंद्रात भाजप, राज्यात भाजप, आमदार भाजपचा, आता महापालिका भाजपच्या ताब्यात द्या, वर्षभरात विकास करून दाखवतो. विकास झाला नाही, तर २०१९च्या विधानसभा निवडणुकीत मते मागायला येणार नाही, अशी राणा भीमदेवी थाटाची घोषणा महाजन यांनी केली होती. जळगावच्या विकासासाठी नागरिकांनी भाजपला भरभरून प्रतिसाद दिला. हुडकोच्या कर्जाचा विषय महाजन यांनी मार्गी लावला. १०० कोटींचा विशेष निधी आणला. ही दोन मोठी कामे केली, परंतु वर्षभरात शहराचा चेहरामोहरा बदलण्यात त्यांना यश आले नाही, तरीही जळगावकरांनी एक संधी देत, भाजपचे आमदार सुरेश भोळे यांना दुसऱ्यांदा विधानसभेत पाठविले. भोळे यांच्या पत्नी महापौर होत्या, भोळे हे स्वत: आमदार असताना, जळगाव शहराचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न झाले नाही. राज्यात सत्ताबदल झाला. भाजपची कोंडी झाली. युती सरकारच्या काळात मुख्यमंत्र्यांनी दिलेला २५ कोटींचा विशेष निधी, १०० कोटींचे पॅकेज याच्या खर्चावरून भाजपच्या नगरसेवकांमध्ये ठिणगी पडली. भाजपमध्ये तब्बल पाच गट कार्यरत झाले. भोळे, महाजन, आयाराम, निष्ठावंत आणि संधीसाधू अशा गटात भाजप विभागली गेली आणि आपापसातील भांडणांमध्ये विकास दूर राहिला. प्रशासनावर पकड राहिली नाही. राष्ट्रवादी, शिवसेना या दोन पक्षांनी नागरी प्रश्नांवरून भाजपला कोंडीत पकडले आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिमा पाकीट घेणारे, ठेक्यांमध्ये हात ओले करणारे, निष्क्रिय अशी करण्यात यशस्वी झाले. नेते म्हणून गिरीश महाजन यांनी ५७ नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना एकत्र बसवून मार्ग काढला नाही. राज्यात लौकिक होत असताना, जिल्ह्यात मात्र त्यांना धक्का देण्यात शिवसेनेला यश आले. हे यश सेनेपेक्षा भाजप आणि महाजन-भोळे यांच्या दुर्लक्षाचे अधिक आहे, असेच म्हणावे लागेल.

(लेखक ‘लोकमत’च्या जळगाव आवृत्तीचे निवासी संपादक आहेत. ) 

Web Title: Crisis in Crisis!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव