खेकड्याची नांगी ! ‘रिटर्न ऑफ  द सावंत’चा जस्ट पॉलिटिकल ट्रीझर..

By सचिन जवळकोटे | Published: May 16, 2021 09:47 AM2021-05-16T09:47:29+5:302021-05-16T09:48:36+5:30

लगाव बत्ती....

Crab sting! Just Political Treasure of 'Return of the Sawant'. | खेकड्याची नांगी ! ‘रिटर्न ऑफ  द सावंत’चा जस्ट पॉलिटिकल ट्रीझर..

खेकड्याची नांगी ! ‘रिटर्न ऑफ  द सावंत’चा जस्ट पॉलिटिकल ट्रीझर..

googlenewsNext

सचिन जवळकोटे

‘दादा बारामतीकर’ यांना ‘धरण’ आवडतं. ‘सावंतांच्या तानाजीं’ना ‘धरणातले खेकडे’ आवडतात. खेकडा तसा डेंजर प्राणी. दिसायला छोटा परंतु डंख मारला तर तोंडचं पाणी पळविणारा; मात्र याच खेकड्याची नांगी ठेचली की तो बनतो गलितगात्र. अशा उपद्रवी खेकड्याच्या नांग्या ठेचून त्याला आपल्या टोपल्यात ठेवण्यात मुंबईचे मासेमारी करणारे जेवढे हुशार, त्याहीपेक्षा आपल्याकडचे राजकारणी अधिक माहीर. आता विषय एवढाच की कोण कोणाला खेकडा बनवतोय. लगाव बत्ती..

गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्याच्या राजकारणापासून ‘सावंत’ अलिप्त. ‘ना खेद ना खंत..स्थितप्रज्ञ सावंत,’ अशीच त्यांच्या गटाची अवस्था झालेली. त्यांचा गट आता केवढा राहिला, हे पुणे नाक्यावरच्या ‘शिवशक्ती’वर ‘चौगुलें’चा चहा पिताना ‘ठोंगें’चे राजूच सांगू शकतील. एक ना एक दिवस वनवास संपणार. पुन्हा राज्याभिषेक होणार.. हे घोकून घोकून थकलेल्या त्यांच्या उरल्यासुरल्या कार्यकर्त्यांना गेल्या आठवड्यात ब्रेकिंग न्यूज मिळाली. संपत चाललेल्या सहनशीलतेला पुन्हा नवसंजीवनी मिळाली.

बार्शीत त्यांच्या कोविड सेंटरच्या उद्घाटनाला चक्क मुंबईतून ‘एकनाथभाई’ अन् ‘मिलिंद’ येऊन गेले. आजपावेतो या सेंटरमध्ये किती रुग्णांवर उपचार झाले, हा भाग वेगळा.. मात्र यातून  ‘सावंतां’चं ‘पॉलिटिकल क्वारंटाईन’ संपलं, हे मीडियानं तत्काळ ओळखलं. नंतर लगेच दोन दिवसांनी त्यांच्या जिल्हा दौऱ्याची अधिकृत सूचनाही खुद्द पक्षाच्याच कार्यालयातून निघाली. मग काय.. निष्ठावान ‘सैनिक’ (सावंतनिष्ठ !) उत्साहानं पंढरपुरात जमले. त्यांच्या नेत्यानं नेहमीच्या आक्रमक स्टाईलमध्ये प्रशासनाला फटकारलं. ‘उजनी’ प्रश्नी पक्षाचे प्रमुख स्थानिक नेते तोंडाची गुळणी करून चूप बसले असताना ‘सावंतां’चा आवाज जिल्हाभर घुमला.

आता महत्त्वाचा विषय जिल्हाप्रमुखांच्या दांडीचा. सेना कार्यालयातून आदेश निघूनही ‘बरडे’ अन् ‘डिकोळे’ या बैठकीला नव्हतेच. त्यांना कोणी बोलावलं नाही, हे म्हणे त्यांचं दुःख. नाही म्हणायला करमाळ्याच्या ‘नारायणआबां’ना एका कार्यकर्त्याकडून बैठकीचा निरोप गेलेला; मात्र त्यांनी उलट टपाली सांगितलेलं,‘सावंतांनी स्वतःहून निमंत्रण दिलं तरच विचार करेन.’ नेहमीप्रमाणे काही कॉल गेलाच नाही. शेवटपर्यंत ‘आबा’ काही बैठकीत पोहोचलेच नाही. खरंतर, ‘सावंतां’ना राजकारणातल्या एवढ्या बारीकसारीक खाचाखोचा लक्षात आल्या असत्या तर ते इतके दिवस ‘लाल दिव्या’वाचून थोडंच राहिले असते ?  लगाव बत्ती..

दीड वर्षापूर्वी ‘सावंतां’ना थेट  ‘जय महाराष्ट्र’ म्हणणाऱ्या संतप्त ‘मातोश्री’कारांनी पुन्हा त्यांना ‘फ्रंट’वर कसं घेतलं, हाही जिल्ह्यासाठी उत्सुकतेचा विषय. सत्तांतरानंतरच्या काळात ‘कमळ’वाल्यांबरोबर त्यांचं सख्य वाढल्याची चर्चा. गेल्यावर्षी राज्यातील काही ‘भगवं उपरणं’वाले आमदार घेऊन ‘देवेंद्र नागपूरकरां’सोबत जाण्याची मोहीमही सुरू झाल्याची कुजबुज कानावर पडलेली. ‘सांगोल्याच्या बापूं’सारखे आठ-दहा नवीन आमदार गळाला लावण्याच्या अचाट प्रयोगाचीही कुणकुण लागलेली. मात्र राजीनामा देऊन पुन्हा पोटनिवडणुकीला सामोरं जाण्यास कुणाचीच नव्हती हिम्मत. नवसानं मिळालेली आमदारकी सोडून द्यायला ‘बापू’सारखे चाणाक्ष नेते थोडेच होते ‘साताऱ्याचे थोरले राजे’. 

दरम्यान सरकार आता हलणार नाही याची खात्री पटल्यानंतर ‘सावंतां’नीच अखेर तहाचा खलिता पाठविलेला. महाबळेश्वरच्या खोऱ्यातील तापोळा-दरे फार्महाऊसवर गुपचूप जाऊन ‘एकनाथभाईं’समोर पांढरं रुमालही फडकवलेलं. नंतर मदतीला ‘मिलिंद’ही तयार होतेच म्हणा. आजकाल ‘थोरले काका बारामतीकरां’च्या सहवासात ‘उद्धों’नीही बेरजेचं राजकारण शिकलेलं. कधीही फुटू शकणारे असले ‘बॉम्ब’ स्वतःच्या खिशात ठेवायचे असतात, मात्र त्याचा रिमोटही आपल्याच हातात ठेवायचा असतो, हे अचूक ओळखलेल्या ‘मातोश्री’कारांनी त्यांना चुचकारत पुन्हा तंबूत घेतलं. मात्र ‘लाल बत्ती’चा विषय तूर्त तरी दूरच.

आता ‘रिटर्न ऑफ द सावंत’ पिक्चर फ्लॉप कसा होईल, या विवंचनेत त्यांचे जुने दुश्मन. आता तुम्ही म्हणाल, या स्टोरीत खेकडा कुठून आला ? हाेय. या राजकारण्यांचा इगो हाच खरा खेकडा. सत्ता आल्यानंतर प्रोफेशनल  ‘हात’ अन् ‘घड्याळ’वाले पद्धतशीरपणे आपलाच फायदा करून घेण्यात मग्न. मात्र ही ‘सैनिक’ मंडळी केवळ आपला इगो कुरवाळण्यातच गुंग. गटबाजीनं त्रस्त. म्हणूनच एकमेकांचा इगो ठेचून कामाला लावण्यासाठी ‘मातोश्री’कारांनी मस्त खेळी खेळली. राहता राहिला विषय एवढाच.. कोण कुणाचा वापर करतोय ? सावंत पक्षाचा की..  पक्ष त्यांचा ? लगाव बत्ती..

महाराजांचं आसन..

 जाता-जाता.. :  ‘कमळ’वाल्यांचं दीड तासाचं उपोषण राज्यभर गाजलं. मात्र जिल्ह्यात सर्वाधिक चर्चा झाली ती दोन खासदार अन् आठ आमदार प्रथमच एकत्र आल्याची. उपोषणस्थळी पाठीमागं बसलेल्या ‘गौडगाव महाराजां’ना पुढं बोलाविलं, तेव्हा ‘तानवडें’नी घाईघाइर्नं एक कापडी आसन समोर ठेवलं. बाकीचे आश्चर्यानं बघू लागले. ‘महाराजां’साठी अक्कलकोटमध्ये मोठ्या ‘आनंदा’नं ही प्रथा पाळावी लागते, हे खूप कमी लोकांना ठाऊक. मात्र कापडी तर सोडाच, खरंखुरं खासदारकीचं आसनही टिकवण्यासाठी तानवडें’सारखे अनेक भक्त सध्या धडपडताहेत, हे कुणालाच नसावं ठाऊक. लगाव बत्ती..

Web Title: Crab sting! Just Political Treasure of 'Return of the Sawant'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.