सार्वभौमत्वाशी कुठलीही तडजोड होणार नाही, याची काळजी घेण्याचे भान देशाच्या नेतृत्वाला राखावेच लागेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 07:17 AM2021-02-15T07:17:28+5:302021-02-15T07:17:58+5:30

india-china row : चिनी सैन्याच्या माघारीच्या वेगामुळे तर भारतीय सैन्यही आश्चर्यचकित झाले, एवढ्या वेगाने तब्बल २०० चिनी रणगाडे माघारी गेले.

The country's leadership must be aware that there will be no compromise with sovereignty! | सार्वभौमत्वाशी कुठलीही तडजोड होणार नाही, याची काळजी घेण्याचे भान देशाच्या नेतृत्वाला राखावेच लागेल!

सार्वभौमत्वाशी कुठलीही तडजोड होणार नाही, याची काळजी घेण्याचे भान देशाच्या नेतृत्वाला राखावेच लागेल!

Next

एखाद्या घडामोडीची प्रदीर्घ काळ प्रतीक्षा केल्यानंतर, एवढ्यात काही ‘ते' घडणार नाही, असे वाटते आणि मग अगदी अवचित ती गोष्ट प्रत्यक्षात घडते! भारत-चीन सीमेवर नुकतीच त्याची पुन्हा प्रचिती आली. पूर्व लडाखमध्ये पॅंगॉन्ग सरोवर भागात भारत आणि चीनचे सैन्य तब्बल नऊ महिने एकमेकांच्या डोळ्याला डोळा भिडवून उभे होते. वाटाघाटीच्या अनेक फेऱ्या झडल्या; परंतु तोडगा निघत नव्हता ! चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतासोबतच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्याच्या तुकड्या आणि चिलखती दलाची जमवाजमव केल्यामुळे उभा ठाकलेला पेचप्रसंग नजीकच्या भविष्यात सुटणार नाही, असे वाटू लागले होते; मात्र गत आठवड्यात अचानक माघारीबाबत उभय सैन्यादरम्यान एकमत झाल्याचे वृत्त झळकले. पाठोपाठ प्रत्यक्षात माघार सुरूही झाली.

चिनी सैन्याच्या माघारीच्या वेगामुळे तर भारतीय सैन्यही आश्चर्यचकित झाले, एवढ्या वेगाने तब्बल २०० चिनी रणगाडे माघारी गेले. नऊ महिन्यांच्या कालावधीत नाना तऱ्हेने भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केलेल्या चीनच्या भूमिकेत अचानक झालेला बदल बुचकळ्यात टाकणारा आहे. त्यामुळेच भारत व चीनच्या सैन्यादरम्यान झालेल्या समझोत्यात काही काळेबेरे तर नाही ना, अशी शंका काही घटकांकडून उपस्थित केली जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तर नरेंद्र मोदी सरकारवर भारतीय भूमी चीनच्या स्वाधीन केल्याचाच थेट आरोप केला. त्यामुळेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना राज्यसभेत, भारताची एक इंचही भूमी कुणी बळकावलेली नाही आणि सरकार बळकावूही देणार नाही, अशी ग्वाही द्यावी लागली.

एवढेच नव्हे तर संरक्षण मंत्रालयानेदेखील एक निवेदन प्रसृत करून, राहुल गांधी यांनी केलेले आरोप खोडून काढले.  पॅंगॉन्ग सरोवराच्या उत्तरेस असलेल्या फिंगर चारपर्यंत भारतीय भूभाग असताना, भारतीय सैन्य फिंगर तीनच्या पुढे जाणार नाही असे मान्य करणे म्हणजे, भारतीय भूभाग चीनला दान करणेच होय, अशा आशयाचे टीकास्र राहुल गांधी यांनी डागले होते. त्यावर भारतीय भूभाग फिंगर आठपर्यंत आहे आणि भारत त्या भूमिकेवर ठाम आहे, असे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. पॅंगॉन्ग सरोवर भागात भारत आणि चीनदरम्यानच्या वादाचा खरा मुद्दा हाच आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेखा फिंगर आठपर्यंत आहे, असे भारताचे म्हणणे आहे, तर ती फिंगर तीनपर्यंत असल्याचे चीन म्हणतो.

ताज्या समझोत्यानुसार भारतीय सैन्य फिंगर तीनच्या पुढे जाणार नाही, तर चिनी सैन्य फिंगर आठच्या पूर्वेकडे थांबेल. याचा अर्थ राहुल गांधी यांच्या वक्तव्यात तपशिलाची चूक असली तरी, भारतीय भूभाग फिंगर आठपर्यंत असूनही भारतीय सैन्याला फिंगर तीनच्या पुढे गस्त घालता येणार नाही, ही वस्तुस्थिती शिल्लक उरतेच! समझोता करायचाच होता, तर भारतीय सैन्य आपल्या दावारेषेच्या जेवढ्या मागे थांबेल, तेवढेच चिनी सैन्य त्यांच्या दावारेषेच्या मागे थांबेल, असा करायला हवा होता! तसा तो झालेला नाही. चिनी सैन्य वाटाघाटींच्या मेजावर कुठे तरी वरचढ ठरले, असा त्याचा अर्थ कुणी काढल्यास, त्यास चूक कसे ठरवता येईल? इथे आणखी एक बाब लक्षात घेतली पाहिजे. पॅंगॉन्ग सरोवराच्या उत्तरेस शिरजोरी करीत असलेला चीन, सरोवराच्या दक्षिणेस असलेल्या कैलास पर्वतरांगेतील काही शिखरांवर भारतीय सैन्याने पाय रोवल्यानंतरच वरमला होता; कारण त्यामुळे चिनी सैन्याचे तळ भारतीय सैन्याच्या माऱ्याच्या टप्प्यात आले होते. ताज्या समझोत्यानंतर भारतीय सैन्याला त्या शिखरांवरून माघार घ्यावी लागणार आहे.

वस्तुतः ती शिखरे भारताच्या हद्दीतच आहेत. त्यामुळे भारताने तेथून माघार घेण्याची खरे तर काही गरज नव्हती; मात्र चिनी सैन्य सरोवराच्या उत्तरेकडून माघारी फिरायला हवे असेल, तर भारतीय सैन्यालाही कैलास पर्वतरांगेतील शिखरे सोडून द्यावी लागतील, असा आग्रह चिनी सैन्याने धरला असला पाहिजे. वाटाघाटींच्या मेजावर दुराग्रही असून चालत नाही, हे खरे असले तरी, चीन हा विश्वासपात्र शेजारी नाही. हे त्या देशाने अनेकदा सिद्ध केले आहे. चीनच्या बाबतीत हा अनुभव केवळ भारतालाच नव्हे, तर त्या देशाच्या इतर शेजारी देशांनाही वारंवार आला आहे. दोन पावले पुढे यायचे आणि मग समझोत्याच्या नावाखाली एक पाऊल मागे जात, भूभाग बळकवायचा, ही चीनची जुनीच खोड आहे. त्यामुळे चीन सीमेवरील तणाव निवळू लागल्याचा आनंद मानताना, देशाच्या सार्वभौमत्वाशी कुठलीही तडजोड होणार नाही, याची काळजी घेण्याचे भान देशाच्या नेतृत्वाला राखावेच लागेल!
 

Web Title: The country's leadership must be aware that there will be no compromise with sovereignty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.