coronavirus: स्वहिताबरोबरच सामाजिक बांधीलकीचेही भान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 04:05 AM2020-05-12T04:05:58+5:302020-05-12T04:07:26+5:30

३० जानेवारीला जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना ही आरोग्याबाबतची जागतिक आणीबाणी आहे, असे जाहीर केले. इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्राने २५ जानेवारीलाच ही जागतिक साथ होणार व ती भारतात नक्की येणार, हे ओळखून जनजागृती सुरू केली.

coronavirus: A sense of social commitment along with self-awareness | coronavirus: स्वहिताबरोबरच सामाजिक बांधीलकीचेही भान

coronavirus: स्वहिताबरोबरच सामाजिक बांधीलकीचेही भान

Next

- डॉ. अविनाश भोंडवे
(अध्यक्ष, आयएमए, महाराष्ट्र)

कोणत्याही सार्वजनिक संस्थेला तिच्या कारकिर्दीत कसोटीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागणे, त्यातून तावून-सुलाखून निघणे हे होतच असते. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेला नेहमीच अशा प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे व संस्थेने यशस्वीपणे त्याचा सामना केला आहे. या असोसिएशनची स्थापना मे १९२८ मध्ये झाली. राज्य शाखा १९६५ मध्ये सुरू झाली. संस्थेचे आज राज्यात ४२,५०० एमबीबीएस डॉक्टर सदस्य असून, २१४ शाखा ठिकठिकाणी कार्यरत आहेत.

३१ डिसेंबर २०१९ रोजी कोरोनाबद्दल चीनने जागतिक आरोग्य संघटनेला कळविले. १० ते ३० जानेवारीपर्यंत थायलंड, जपान, कोरियात चीनमधून आलेल्यांना कोरोनाची बाधा होऊ लागली. ३० जानेवारीला जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना ही आरोग्याबाबतची जागतिक आणीबाणी आहे, असे जाहीर केले. इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्राने २५ जानेवारीलाच ही जागतिक साथ होणार व ती भारतात नक्की येणार, हे ओळखून जनजागृती सुरू केली. कोरोनाबाबत प्राथमिक माहिती, तो कसा पसरतो? त्याची लक्षणे, प्रतिबंधक उपाय याबाबत राज्यात चित्रमय पोस्टर्स, संदेश, व्हिडिओ क्लिप्स प्रसृत केले. त्याच्या प्रती गावोगावच्या सार्वजनिक संस्थांना व मंडळांना दिल्या. अनेक ठिकाणी ही पोस्टर्स स्वयंस्फूर्तीने लावली गेली. आयएमएने तयार केलेल्या क्लिप्स दोन वृत्तवाहिन्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसृत केल्या. कोरोनाबाबत जनजागृतीसाठी संस्थेचे अनेक सदस्य महाराष्ट्रातील सर्व वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रे, आॅनलाईन वृत्तमीडिया, फेसबुक लाइव्ह, व्हॉट्सअ‍ॅप संदेश, ब्लॉग्ज, लेख, मुलाखती व इतर सोशल मीडियाद्वारे कोरोनाबाबतचे सकारात्मक संदेश घरोघरी पोहोचवत होते. अध्यक्ष या नात्याने मी अनेक ठिकाणी लिहीत व बोलत होतो. आजही ते काम सुरू आहे.

इंडियन मेडिकल असो.च्या वतीने १४ मार्चपासून अखिल भारतीय स्तरावर आयएमएतर्फे तीन हेल्पलाईन सुरू केल्या. आजवर सुमारे दोन लाख लोकांनी त्याचा फायदा करून घेतला. राज्य शाखेचा त्यात मोठा सहभाग आहे. याच काळात मानसिक त्रास होणाऱ्या जनतेसाठी ‘समुपदेशन’ हेल्पलाईन सुरू केली. अनेकांना त्याचा उपयोग होत आहे.

फेब्रुवारी व मार्चमध्ये सोशल मीडियावर कोरोनाबाबत अफवांचे पीकच आले होते. १३ मार्च रोजी राज्य शाखेने ‘अफवांविरोधी मोहीम’ उघडली. नागपूर येथे माझ्याच उपस्थितीत त्याची सुरुवात झाली. या मोहिमेतून ७५ हजार अफवा व गैरसमजांना प्रत्यक्ष उत्तरे दिली. चिकन खाल्ल्याने कोरोना होतो अशा अफवा उठल्यामुळे राज्यातील पोल्ट्री उद्योगाचे मोठे नुकसान झाले. त्याचप्रमाणे वर्तमानपत्रातून कोरोनाचा विषाणू पसरतो या गैरसमजामुळे वृत्तपत्रांची छपाई व वितरण बंद झाले. हे गैरसमज दूर करण्यासाठी आयएमएने राज्यात प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आज लॉकडाऊन असूनही चिकनसाठी रांगा लागत आहेत. येत्या काही दिवसांत वृत्तपत्रेही पहिल्या स्वरूपात येतील.

कोरोनाच्या साथीत महाराष्ट्रातील आयएमएच्या सदस्यांचे दवाखाने, क्लिनिक्स व रुग्णालये चालूच राहावीत यासाठी संपूर्ण राज्यातील डॉक्टरांचे प्रबोधन केले. आज राज्यात डॉक्टरांकडे पीपीई किट नसतानाही, जे दवाखाने सुरू आहेत, ते सर्व आयएमएच्या सदस्यांचेच आहेत. कोरोनामध्ये ६५ वर्षे वयापुढील व्यक्तींना आणि हृदयविकार, मधुमेह असे आजार असणाऱ्यांना धोका असतो. ६५ वर्षे वयापुढील व आजार असणाºया डॉक्टरांना या साथीत काम न करण्याची सवलत संघटनेने आरोग्यमंत्र्यांकडून मिळविली.

कोरोना नियंत्रणाच्या मोहिमेत संस्था सरकारबरोबर राहिली. आज आयएमएचे ३० हजारांहून अधिक डॉक्टर महत्त्वाची कार्ये करीत आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, डोंबिवली, ठाणे, कल्याण, अमरावती, आदी शहरांतील कोविड रुग्णालयात रुग्ण तपासणी व उपचारांत आयएमएच्या डॉक्टरांचा विशेष सहभाग आहे. याचबरोबर सरकारी रुग्णालये कोविड रुग्णालये जाहीर झाल्यामुळे राज्यातील सुमारे १०० शहरांत व गावात कोविड नसलेल्या सरकारी रुग्णालयांत जाणाºया गरीब रुग्णांवर आयएमएचे सदस्य स्वत:च्या रुग्णालयात उपचार करीत आहेत. अनेक शहरांत कम्युनिटी क्लिनिक्स, फ्लू क्लिनिक्स, रक्षक क्लिनिक्स चालविली जात आहेत. सुमारे पाच लाखांवर रुग्णांना त्याचा फायदा झाला. राज्यात सुमारे ७० ठिकाणी आयएमएतर्फे मोबाईल क्लिनिक्स कार्यान्वित आहेत. अशा हॉटस्पॉटमध्ये जीव धोक्यात घालून आयएमएचे डॉक्टर सेवा देत आहेत. आयएमएच्या १०० हून अधिक शाखांनी डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचाºयांना स्वखर्चाने पीपीई किट्स, मास्क दिले आहेत. पोलिसांची वैद्यकीय तपासणी, जनतेला मास्क देणे, सॅनिटायझर देणे, जेवणाची सोय नसलेल्यांना जेवण पुरविणे, गरीब कष्टकरी कामगारांच्या कुटुंबांना शिधा देणे, अशी कामे अनेक शाखांमार्फत केली जात आहेत.

पुण्यातील रुग्णांना दवाखान्यात जाण्यासाठी ‘डायल अ रिक्षा’ उपक्रम रिक्षा पंचायत आणि अन्य संघटनांच्या सहकार्याने चालू केला. त्यासाठी पुण्यातील २२५ रिक्षाचालकांना या सेवेदरम्यान स्वसंरक्षण व रिक्षाचे निर्जंतुकीकरण कसे करावे, याचे प्रशिक्षण दिले. कोविड-१९ च्या जागतिक साथीचे आव्हान एवढ्या लवकर संपणार नाही. त्यामुळे भारत कोरोनामुक्तकरण्याचे ब्रीद घेऊन आयएमए महाराष्ट्राचे कोरोना योेद्धे आपले कार्य यापुढेही करीतच राहणार आहेत.

Web Title: coronavirus: A sense of social commitment along with self-awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.