coronavirus: कोरोना विषाणूबाबत होतेय रोज नवे आकलन, मिळतील अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 06:35 IST2020-07-08T06:34:19+5:302020-07-08T06:35:47+5:30
बोलण्या-गाण्यासारख्या क्रियेतूनही कोरोना विषाणूचा प्रसार होऊ शकतो, हे नव्या संशोधनाने दाखवून दिले आहे. त्यामुळे संसर्गाविषयीचे आकलन वाढून काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मानवजातीला मिळतील.

coronavirus: कोरोना विषाणूबाबत होतेय रोज नवे आकलन, मिळतील अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे
विषाणूंचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते परिवर्तनीय असतात. भोवतालच्या परिस्थितीनुसार आपल्या संरचनेत आणि संसर्गप्रसाराच्या पद्धतीत ते बदल करत असतात. कोरोनाचा विषाणू मानवजातीसमवेत नांदायला आल्यास आता किमान सात महिने होतील. मात्र, त्याची अनेक वैशिष्ट्ये अद्यापही अज्ञात आहेत. तज्ज्ञांच्या अनेक तर्कांना आजवर तो चकवा देत आला आहे. म्हणूनच जेव्हा २३९ वैज्ञानिकांनी त्याचा प्रसार हवेतूनही होऊ शकतो, असे ठाम विधान सप्रमाण केल्याचे वृत्त आले तेव्हा आश्चर्य वाटले नाही. नवनव्या शक्यता गृहित धरून चालण्याशिवाय शास्त्रांना गत्यंतर नसते. जागतिक आरोग्य संघटनेप्रमाणे आपलेच खरे असा दुराग्रह बाळगता येत नाही. केवळ शिंक आणि खोकल्याद्वारे नाका-तोंडातून उडणाऱ्या शिंतोड्यातून कोरोना पसरतो, या विधानावर या संघटनेचे तज्ज्ञ आजवर ठाम होते. नव्या पुराव्यांची दखल त्यांना आता घ्यावी लागेल. या पुराव्यांमुळे बरीच गणिते उलटीपालटी होणार आहेत. काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरेही सापडतील.
संसर्गाचा ज्ञात इतिहास नसतानाही काही व्यक्तींना बाधा कशी झाली, असा प्रश्न कोविडचा मागोवा घेणा-या तज्ज्ञांना हल्ली वारंवार पडायचा. हे कोडे आता सुटले आहे. कोरोना विषाणू हवेत सोडण्यासाठी बाधित व्यक्तीने खोकण्या-शिंकण्याची आवश्यकता नाही. जोरजोरात बोलताना, श्वास घेताना आणि गातानाही बाधित व्यक्ती या विषाणूच्या प्रसारास हातभार लावू शकते. अशी कृती करताना त्या व्यक्तीच्या नाका-तोंडातून अतिसूक्ष्म असे थेंब बाहेर पडत असतात. या थेंबाच्या व्यासापेक्षा मानवी केसाचा व्यास पन्नास पटींनी मोठा असतो. यावरून ते थेंब किती सूक्ष्म असतील, याचा अंदाज करता येईल. बंदिस्त, पुरेसे वायूविजन नसलेल्या खोलीत हे वजनाने हलके असलेले थेंब बराच काळ हवेत विहरू शकतात आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या निरोगी व्यक्तींपर्यंत संसर्ग पोहोचवू शकतात. म्हणजे घरात बसून राहाणे, हा सुरक्षेचा हमखास उपाय आहे, असे यापुढे म्हणता येणार नाही. अनोळखी व्यक्तींच्या सोबतीने राहाणे धोक्याचे आहे, असा नवा निष्कर्ष या संशोधनातून समोर आला आहे. कोविडचे विषाणू नेमके किती अंतर पार करू शकतात, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी सर्वसाधारण आकाराच्या बंदिस्त खोलीत त्यांचा संचार सर्वत्र असू शकतो, असेही तज्ज्ञ सांगतात. घरातली हवा खेळती ठेवणे हा यावरला उपाय. अर्थात वरील निष्कर्ष पाश्चिमात्य देशांतील हवामानास गृहित धरून काढलेला आहे.
भारतीय उपखंडातला मान्सून, आर्द्रता यामुळे हवेत विहरणाºया थेंबांचे आयुर्मान वाढेल की कमी होईल, यावर इथल्या वैज्ञानिकांना वेगळा अभ्यास करावा लागेल. मात्र, वैैयक्तिक सुरक्षेची अनिवार्यता या नव्या संशोधनानेही अधोरेखित केलेली आहे. दोन मीटरचे अंतर आपल्याला खोकल्या- शिंकांतल्या संसर्गापासून वाचवू शकेल; पण या सूक्ष्म थेंबांपासून तारू शकणार नाही, हे नवे आकलन नाका-तोंडावर मास्क घालण्याचे महत्त्व विषद करते. वरचेवर नाका-तोंडाला स्पर्श करण्याची सवय आता निर्धारपूर्वक सोडावी लागेल. २३९ वैज्ञानिकांच्या या नव्या संशोधनाने शाळा-विद्यालये सुरू करण्याच्या शक्यतेचाही पुनर्विचार करण्यास उद्युक्त केले आहे.
१२ वर्षे वयापर्यंतच्या मुलांवर कोरोनाचा परिणाम अत्यंत नगण्य असतो, असे दिसून आल्याने मध्यंतरी काही पाश्चात्य तज्ज्ञांनी सातवीपर्यंतच्या वर्गांना परवानगी देण्यास हरकत नसल्याचे म्हटले होते. मात्र, अनेक विद्यालयांतील बंदिस्त खोल्यांचा लहान आकार आणि एकेका वर्गातली पटसंख्या यांचा विचार करता धोक्याची व्याप्ती वाढलेली आहे. वातानुकूलित यंत्रणेला कार्यक्षम फिल्टर्स बसविणे, हवा स्वच्छ करणारी संयत्रे बसविणे किंवा विषाणूंचे पारिपत्य करणाºया अतिनील किरणांना उत्सर्जित करणारे दिवे बसविणे, अशी उपाययोजना करणे आता रुग्णालयांनाही क्रम:प्राप्त झालेले आहे. कोरोनाचा विषाणू अजूनही मानवी प्रज्ञेला भारी ठरलेला आहे. जगभरातले संशोधन अद्यापही बचावात्मक पवित्रा सोडू शकलेले नाही. नव्या संशोधनाने सावधगिरी आणि सतर्कतेचा स्तर उंचाविण्याशिवाय पर्याय नसल्याचेच सूचित केले आहे.