अखिल विश्वाला कोरोनाने दिलेला धडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 01:42 AM2020-04-03T01:42:56+5:302020-04-03T01:43:14+5:30

भारतावरही मोठे संकट कोसळले असून, त्याचा नि:पात करण्याबरोबरच काही धडेही या संकटाच्या निमित्ताने घेतले पाहिजेत, असे वाटते.

Coronavirus lesson to the entire universe! | अखिल विश्वाला कोरोनाने दिलेला धडा!

अखिल विश्वाला कोरोनाने दिलेला धडा!

googlenewsNext

कोरोना नामक नव्या आजाराला कारणीभूत ‘कोविड-१९’ विषाणूची जगभरातील आठ ते दहा लाख लोकांना लागण झाल्याची व त्यात पंचेचाळीस हजारांच्या आसपास लोकांचा मृत्यू झाल्याची अधिकृत आकडेवारी जाहीर झाली आहे. नीट काळजी न घेतल्यास एकट्या अमेरिकेत अडीच लाखांपर्यंत लोक यातून मृत्युमुखी पडतील, असा अंदाज अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. भारतावरही मोठे संकट कोसळले असून, त्याचा नि:पात करण्याबरोबरच काही धडेही या संकटाच्या निमित्ताने घेतले पाहिजेत, असे वाटते.

कोरोनाने जे धडे आपल्याला दिले, त्यातील महत्त्वपूर्ण धडा आहे तो स्वच्छतेचा! स्वत:चे शरीर, परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे, हा यातील एक धडा. एकीकडे आपण घरांची सफाई करताना परिसराबाबत बेजबाबदार वागतो. मूठभर सफाई कर्मचारी, तेही विशिष्ट समूहातील नेमणे, त्यांना पुरेसा पगार न देणे, साधने न देणे, अशा कृत्यांतून आपल्या आरोग्यासाठी झटणाऱ्यांची आपण अवहेलनाच करतो. ही अवहेलना केवळ त्या व्यक्तींची नसून, आपल्या स्वत:च्या आरोग्याची आहे, हा कोरोनाने दिलेला पहिला धडा आहे. परिसरात स्वच्छता राखण्याचे काम ठरावीक लोकांवरच लादू नका, त्यांनाही प्रतिष्ठा, साधने व समान मोबदला द्या, शक्य तेथे जबाबदारी उचला, हा कोरोनाने आपल्याला दिलेला पहिला महत्त्वपूर्ण संदेश आहे.

सूक्ष्म विषाणू असलेल्या कोरोनाची विध्वंसकता मोठी आहे. आकार व विध्वंसकता यांचा परस्परांशी फार काही संबंध नसतो. तसेच निसर्गातील एक सूक्ष्म कणसुद्धा माणसामाणसांत भेद करत नाही; तो सर्वांना समान निर्दयतेने आपल्या कह्यात घेतो, हा संदेश कोरोनाने दिला आहे. तसाही पूर, दुष्काळ, यापूर्वीच्या महामाºया या सर्वांनी तो धडा दिलाच आहे; पण निदान यावेळच्या आक्रमणाने तरी जाग यायला हवी!

पोटापाण्यासाठी अनेक लोक कुटुंबीयांना गावाकडे सोडून दूरच्या शहरांत जातात. अशांवर तर फार मोठे संकट कोसळले आहे. काहीजण कसेबसे गावी पोहोचले, तर अनेकजण मधेच कुठेतरी अडकले. काहींसाठी त्यांच्या गाववाल्यांनी आपापले दरवाजे बंद केले. ‘कठीण समय येता, कोण कामास येतो’ या ओळींचा प्रत्यय अनेकांना आला. सध्या देवालये व प्रार्थनास्थळे बंद आहेत. सरकारी डॉक्टर, आपत्ती निवारण पथके, पोलीस दल, आदी लोक मात्र दिवस-रात्र कार्यरत आहेत. संकट काळात माणूसच माणसाच्या मदतीला पुन्हा धावलेला आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्यांना आपण जपले पाहिजे, हाही धडा कोरोनाने आपल्याला दिलेला आहे.

या काळात अनेक लोक, विविध संस्था कोट्यवधी रुपयांची मदत गरजू व गोरगरिबांना करीत आहेत. स्वत:ला आपल्या संपत्तीचे विश्वस्त समजून काम करा, हा महात्मा गांधींनी व तत्पूर्वी गौतमबुद्धांनी दिलेला संदेश ते आपल्या कृतीतून प्रत्यक्षात उतरवत आहेत. याबाबत त्यांचे आभार मानावेत तितके थोडकेच; पण याबाबत हेही लक्षात घेतले पाहिजे की, ‘समान कामासाठी समान वेतन’, ‘सर्वांना काम व सर्वांना मोबदला’ यांसारख्या न्याय्य तत्त्वांचे पालन यापूर्वीच केले असते, तर आताची ही धावाधाव करावी लागली नसती.

लोकांना त्यांच्या वस्तीच्या ठिकाणाच्या जवळपास योग्य मोबदला देणारी कामे उपलब्ध करून दिली असती, तर त्यांना दूर जावे लागले नसते व आता होत असलेली गैरसोय सोसावी लागली नसती. ज्या कामात आपली शक्ती खर्च होत आहे, ती झाली नसती. ही केवळ झालेल्या चुकांची उजळणी नसून, भावी चुका टाळण्यासाठीचा इशारा आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे. विकासाचा जो असमतोल गत सत्तर वर्षांत आपण उभा केला, त्याचा फटका सध्या बसत आहे, हे ओळखले पाहिजे व सध्या या जखमांवरील मलमपट्टी करत असलो, तरी संकट टळताच दीर्घकालीन उपाययोजना तातडीने हाती घ्यायला हव्यात.

सध्या अन्नधान्य व भाजीपाल्यासाठी बाहेर पडणे मुश्कील होत आहे. काही लोक साठा करीत आहेत, तर काही चढ्या दराने त्याची विक्री करत आहेत. घरात बसून काहींना भीती सतावत आहे, तर कोणाला अस्वस्थ वाटत आहे. अशा वेळी असे होत आहे, तर युद्धकाळात लोकांचे काय हाल होत असतील, याचा अंदाज करता येईल. त्यामुळे परस्पर शत्रुत्वाची भावना न जोपासता अखिल मानवजातीविषयी करुणा जोपासणे, त्यांचे न्याय्य हक्क मिळू देणे किंवा मिळवून देणे, हे मानवजातीच्या हिताचे आहे, हा संदेश कोरोनाने दिला आहे. करुणा आणि कोरोना हे शब्द दिसायला जवळचे वाटत असले, तरी दोहोंचा परिणाम पूर्णत: एकमेकांच्या विरोधातला आहे.

आपण सर्व एका नौकेतील प्रवासी असून, बुडालो तर सर्व बुडणार अन् तरलो तर सर्व तरणार अशी सध्याची स्थिती आहे. ‘शांततेच्या काळात जितका घाम गाळाल, तितकेच युद्ध काळात कमी रक्त गमवावे लागेल’ असे एका विचारवंताने कधी काळी म्हटलेले आहे. ते लक्षात घेऊन देशावरील कोरोनाचे संकट टळताच ‘येरे माझ्या मागल्या’ अशा पद्धतीने न वागता सर्वांना सामाजिक व आर्थिक सुरक्षांचा लाभ मिळवून देऊन त्यातून सर्वांच्याच आरोग्य आणि राहणीमानात क्रांतिकारक परिवर्तन त्वरेने घडवून आणावे, हाच कोरोनाने दिलेला सर्वांत महत्त्वाचा धडा आहे, असे आपण मानले पाहिजे!

Web Title: Coronavirus lesson to the entire universe!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.