Coronavirus: Every individual soldier in the war against Coronavirus | Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रत्येक व्यक्ती सैनिक

Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रत्येक व्यक्ती सैनिक

- विजय दर्डा

सध्याची परिस्थिती खूपच वाईट आहे, असे म्हणणे गैर होणार नाही. जाणकारांच्या मते कोरोनाच्या या साथीत आपण झपाट्याने तिसऱ्या टप्प्याकडे जात आहोत. परिस्थिती आटोक्यात आली नाही तर भारताची स्थिती काय होईल, याची कल्पनाही भयावह वाटते. चीनने दिलेल्या या महाभयंकर भेटीच्या संकटातून सावरणे सर्वशक्तिमान अमेरिका व युरोपीय देशांनाही शक्य झालेले नाही. वर्ल्डोमीटरनुसार आतापर्यंत या रोगाने ३१ हजारांहून अधिक बळी घेतले आहेत. हा आकडा दररोज झपाट्याने वाढत आहे.

न्यूयॉर्कमधील एका इस्पितळात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाºया एका भारतीय महिला डॉक्टरचा व्हिडिओ मी पाहात होतो. त्यांच्याकडे व्हेंटिलेटरची खूप टंचाई आहे. प्रसंगी गरज तीनची व एकच उपलब्ध अशी वेळ येते, असे त्या सांगत होत्या. अशा वेळी कुणाला व्हेंटिलेटर लावावा व कुणाचा काढावा हे ठरविणे मोठे जिकिरीचे होते. इटली व स्पेनमध्येही अशीच अवस्था आहे. आपल्याकडे कोरोना आणखी फोफावला तर काय होईल, याचा जरा विचार करा. आपल्याकडील वैद्यकीय सुविधांची स्थिती एरवीही काय आहे, हे आपण सर्वच जाणतो.

आपल्याकडे अजूनही अनेक लोक या महामारीकडे गांभीर्याने पाहात नाहीत, याचे मला दु:ख व चिंता वाटते. देशभर ‘लॉकडाऊन’ लागू करूनही अनेक लोक घरांबाहेर पडून रस्त्यांवर फिरताना दिसतात. त्यांच्यापैकी कुणाला कोरोनाची लागण झाली आहे व कुणाला नाही, हे समजण्यास काही मार्ग नाही. अशा घोळक्यांमधील एक जरी बाधित असेल तर त्याच्याकडून इतरांनाही लागण होणार हे नक्की! पंतप्रधान मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अन्य राज्याचे मुख्यमंत्रीही अपार मेहनत करत आहेत. मुख्य सचिवांपासून सर्व अधिकारी अहोरात्र काम करत आहेत.

वेळच्या वेळी तत्परतेने योग्य निर्णय घेतले जात आहेत. देशभरातील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉयसह वैद्यकीय सेवांमधील तमाम कर्मचारी निष्ठेने अविरत काम करत आहेत. घरी न जाता, इस्पितळांमध्येच राहून आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करत आहेत. गेल्या आठवड्याच्या याच स्तंभात मी अशा सर्वच कोरोना योद्ध्यांचा कृतज्ञतेने उल्लेख केला होता.

कोरोनाविरुद्धचे हे युद्ध फक्त सरकारी आरोग्य सेवांमधील लोकांनी लढायचे युद्ध नाही हे आपण सर्वांनी पक्के समजून घ्यायला हवे. हे युद्ध प्रत्येक व्यक्तीचे आहे व त्यात प्रत्येक नागरिकाला सैनिकाची भूमिका बजवावी लागणार आहे. काहीही झाले तरी घरातच थांबणे ही सर्व सैनिकांची सर्वात मोठी जबाबदारी आहे. जे ही जबाबदारी इमानेइतबारे पार पाडत आहेत त्यांना माझा मनापासून सलाम. पण जे निष्कारण घराबाहेर फिरत आहेत ते संपूर्ण मानवतेचे शत्रू आहेत. अशा लोकांविरुद्ध सक्तीने कारवाई करण्याची गरज आहे. अशा आणीबाणीच्या प्रसंगी जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारेही मानवतेचे, संपूर्ण देशाचे व समाजाचे तेवढेच शत्रू आहेत! आता मास्क मिळेनासे झाले आहेत.

सॅनिटायझर कमी पडत आहेत. बाजारातून पाकिटबंद गव्हाचे पीठ गायब झाले आहे. भावी पिढ्या पुन्हा असे करण्याचा मनात विचारही आणू शकणार नाहीत अशी कडक कारवाई या लोकांविरुद्ध सरकारने करायला हवी. त्याच बरोबर माझा स्वयंसेवी संस्थांना असा आग्रह आहे की, ज्यांना जेवणाची भ्रांत निर्माण झाली आहे व जे घरी परत जाण्यासाठी रस्त्याने शेकडो किमी चालत निघाले आहेत अशा लोकांकडे त्यांनी तातडीने लक्ष द्यावे. असे लोक जेथे कुठे आहेत तेथेच त्यांना थांबवून त्यांच्या राहण्या-जेवणाची सोय करावी व कोरोनासंबंधी त्यांना योग्य माहिती द्यावी, अशीही माझी सर्व राज्य सरकारांना विनंती आहे. ‘रोटी बँक’ चालवून गरीब आणि निराश्रित लोकांच्या पोटी तीन वेळचा घास घालणाºया डी. शिवानंदन यांचाही मी आवर्जून उल्लेख करीन. त्यांच्या मातोश्रींचे अलिकडेच निधन झाले. शिवानंदन फक्त आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठी गेले व लगेच परत येऊन गरिबांसाठीच्या अन्नछत्राच्या कामाला लागले. अशा समर्पित लोकांची देशाला गरज आहे.

ज्यांची दिवसभर आॅफिसात, कामधंद्यात झोकून देण्याची कित्येक वर्षांची दिनचर्या आहे अशा लोकांना नुसते घरात बसून राहणे खूप कठीण जात असणार याची मला कल्पना आहे. पण हे लक्षात ठेवा की तुमचे बाहेर जाणे म्हणजे कोरोनाला घरात घेऊन येणे आहे. मी माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने खूप फिरत असतो व असंख्य लोकांना भेटत असतो. परंतु सध्या कटाक्षाने घरात राहून ‘लॉकडाऊन’चे पूर्णपणे पालन करत आहे. कुणालाही प्रत्यक्ष न भेटता सर्व कामे फोन व इंटरनेटवर करत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत मीही एक सैनिक झालो आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा घरातच रहा. ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या अविस्मरणीय व लोकप्रिय मालिका दूरदर्शनवर पुन्हा दाखविण्याबद्दल माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांचे अभिनंदन. या मालिकांचा जाती-धर्माशी काही संबंध नाही. त्या जीवन कसे जगावे याचा धडा देतात.

मनुष्याप्रति आदर, सन्मान न्यायाने कसे वागावे याची शिकवण त्यातून मिळते. विश्वसनीय बातम्यांसाठी वृत्तपत्र हेच एकमेव माध्यम असल्याने तुमचा पेपरवाला रोजचे वर्तमानपत्र आणून देईल, यासाठी प्रयत्न करा. अफवांना जराही थारा देऊ नका. मस्त राहा, मजेत राहा व निरोगी राहा. कवी राहत इंदौरी यांनी म्हटले आहे ते किती योग्य आहे... एके क करत हे २१ दिवस भुर्रकन उडून जातील!

आणि अखेरीस....

दि. १६ मार्च २०२० रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘राजकारणापुढे पक्षांतरबंदी कायदा हतबल’ या शिर्षकाने प्रसिद्ध झालेल्या याच स्तंभात हरियाणाचे आमदार काँग्रेस सोडून जनता पक्षात गेल्याचा उल्लेख केला. खरे तर ते गयालाल संयुक्त विधायक दलात सामील झाले होते. परंतु डिक्टेशन घेताना लेखनिकाकडून झालेल्या त्रुटीमुळे तसा चुकीचा उल्लेख झाला. नंतर पुढे जेव्हा जनता पार्टी स्थापन झाली तेव्हा ते संयुक्त विधायक दल या पक्षात विलीन झाले होते. (लेखक लोकमत समूहाचे चेअरमन आहेत)

Web Title: Coronavirus: Every individual soldier in the war against Coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.