कोरोनाच्या विळख्यात सध्या जवळपास संपूर्ण जग सापडले आहे. चीनमध्ये या विषाणूने प्रेतांच्या राशी रचल्या, इटलीत किड्यामुंग्यांसारखी माणसे मरत आहेत, महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही कोरोना डोळे वटारून दाखवत आहे आणि भारतातही तो हातपाय पसरत आहे. महाराष्ट्रात कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या ४१ च्या घरात पोहोचली असून, संशयितांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्याकरिता घ्यायची काळजी, याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न सरकार, माध्यमे, सामाजिक संस्था करीत आहेत. मात्र, आपल्याकडील अनेकांना या संकटाचे जराही गांभीर्य नाही. सरकारने अगोदर मनोरंजनाची केंद्रे बंद केली, शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या देऊन परीक्षा पुढे ढकलल्या, मुंबई-पुण्यात जमावबंदी लागू केली, खासगी कंपन्यांना आपल्या निम्म्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास सांगितले. आता तर सर्व सरकारी कार्यालयांत आवश्यक तेवढेच कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.मात्र, अनेक जणांना कोरोनाची आपत्ती ही सोशल मीडियावर चहाटळ विनोद चघळण्याची संधी अथवा लोकांमध्ये अनाठायी घबराट निर्माण करणाºया कंड्या पिकवण्याची विकृत संधी वाटत आहे, हे दुर्दैव आहे. अशा संकटाच्या प्रसंगी अफवा पसरवणारी बनावट सरकारी परिपत्रके तयार करणारे किंवा बनावट व्हिडीओ तयार करणारे यांना कठोरात कठोर शासन करणारा कायदा करण्याची गरज आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने लोकांनी घरात बसावे व घरून काम करावे, अशी विनंती सरकार करीत आहे. मात्र, तरीही तोंडावर मास्क चढवून आणि हातावर तथाकथित सॅनिटायझर शिंपडून आपण कोरोनाची पर्वा करीत नाही, अशा आविर्भावात अनेक जण फिरत आहेत. विदेशवारी करून आलेल्या व संशयित रुग्ण असलेल्या हाताच्या बोटावर मोजता येण्याइतक्या काहींनी, तर रुग्णालयातून पळ काढून निघून जाण्याची तसेच देशाच्या काही भागात फेरफटका मारून येण्याची बेफिकिरी दाखवली आहे. वेगवेगळ्या शहरांत संशयित रुग्ण किंवा विदेशवारी करून आलेल्यांचे नातलग यांच्याकरिता विलगीकरण कक्ष उभारण्याकरिता एखादी शासकीय किंवा खासगी इमारत संपादित करण्याच्या प्रयत्नात स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक यांनी खोडा घातला आहे. आमच्या लोकवस्तीत विलगीकरण कक्ष नको, अशी चक्क उफराटी भूमिका त्यांनी घेतली आहे.
Coronavirus : कोरोनाचा फैलाव वाढतोय, शिस्त पाळा, अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 06:03 IST