सतत यू-ट्यूब पाहाता? पर्यावरणाला मोठा धोका! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 10:13 IST2025-01-04T10:12:30+5:302025-01-04T10:13:10+5:30

इलेक्ट्रॉनिक उपकरणे बदलण्याची हौस आणि आंतरजालावरील ‘टाइमपास’ आटोक्यात आणला तर डिजिटल कार्बन फूटप्रिंट कमी होण्याला हातभार लागेल.

Constantly watching YouTube A big threat to the environment | सतत यू-ट्यूब पाहाता? पर्यावरणाला मोठा धोका! 

सतत यू-ट्यूब पाहाता? पर्यावरणाला मोठा धोका! 

प्रियदर्शिनी कर्वे, इंडियन नेटवर्क ऑन एथिक्स अँड क्लायमेट चेंज (आयनेक) 

एकविसाव्या शतकात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढत गेला आहे. कोविड महासाथीत प्रवासावर बंधने आलेली असताना हा वापर अधिक वेगाने वाढला आणि नंतरही वाढलेलाच राहिला. एका जागतिक अभ्यासानुसार २०१३ मध्ये एक प्रौढ व्यक्ती सरासरी सहा तास आंतरजालावर घालवत होती, तर २०२२ पर्यंत यात एका तासाची भर पडली. गेल्या काही वर्षांत डिजिटल कार्बन फूटप्रिंट या विषयावरही बराच अभ्यास झाला आहे व त्यातून काही महत्त्वाच्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत. 

डिजिटल कार्बन फूटप्रिंटमध्ये कशाकशाचा समावेश होतो? - स्मार्टफोन, संगणक इत्यादी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे उत्पादन करण्यासाठी खाणकामापासून कारखान्यापर्यंत सर्वत्र ऊर्जा खर्च होत असते. अजून तरी खनिज इंधने हाच ऊर्जेचा मुख्य स्रोत असल्याने ऊर्जा वापरली की वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइडमध्ये भर पडतेच. कारखान्यातून आपल्या हातात हे उपकरण येण्यासाठीही ऊर्जा खर्च होते; आणि पर्यायाने कर्ब उत्सर्जनही होते.

आपल्या उपकरणाशी जोडलेले हे सर्व कर्ब उत्सर्जन आपल्याच डिजिटल कार्बन फूटप्रिंटमध्ये मोजले जाते. आपण उपकरण प्रत्यक्ष वापरतो तेव्हा जी वीज खर्च होते त्याच्याशीही कर्ब उत्सर्जन जोडलेले आहेच; पण, आपण जेव्हा आंतरजालावर काही कृती करतो तेव्हा जगभरात विखुरलेली इतरही इलेक्ट्रॉनिक उपकरणांची यंत्रणा वापरली जाते. त्यामुळे या उपकरणांच्या निर्मिती व वापराच्या कार्बन फूटप्रिंटचाही काही हिस्सा आपल्या नावावर जमा होतो. आपण नवे इलेक्ट्रॉनिक उपकरण घेतले की आपल्या आधीच्या उपकरणाची विल्हेवाट लागतानाही कर्ब उत्सर्जन होते. अगदी आपले आधीचे उपकरण योग्य पद्धतीने ई-कचरा म्हणून हाताळले गेले, त्यातील घटकांचा पुनर्वापर झाला, तरीही ऊर्जा खर्च होतेच. त्यामुळे आपण प्रदूषण टाळले तरी कर्ब उत्सर्जन टाळू शकत नाही.


थोडक्यात म्हणजे इलेक्ट्रॉनिक उपकरणे, आंतरजालावरील वावर यांची कार्बन फूटप्रिंट वाढते आहे. पण, म्हणजे डिजिटल तंत्रज्ञानामुळे जागतिक तापमानवाढीचा दर वाढतो आहे का? जगाच्या वेगवेगळ्या भागात राहणारे लोक एकत्र चर्चा करण्यासाठी जेव्हा आंतरजालाचा वापर करतात तेव्हा त्यांची डिजिटल कार्बन फूटप्रिंट निश्चितच शून्य नसते. पण, त्या सर्वांनी प्रवास करून एका ठिकाणी येऊन समोरासमोर बैठक केली असती तर जितके कर्ब उत्सर्जन झाले असते त्यापेक्षा ती कमी असते. अगदी आपले व्यक्तिगत बँकेचे काम आपण स्मार्टफोनद्वारे करतो तेव्हा आपले गर्दीच्या वेळी पेट्रोल जाळत बँकेपर्यंत जाणे-येणे टळलेले असते व त्यामुळे त्या कामासाठीचे कर्ब उत्सर्जन कमी होते आणि वेळही वाचतो.


दोनच दशकांपूर्वी जिथे दोन-तीन उपकरणे लागत तिथे आता एकच व कितीतरी लहान आकाराचे उपकरण वापरले जाते. या उपकरणांची वीज वापराची कार्यक्षमताही वाढत गेली आहे. कोणत्याही कामाला पाच-दहा वर्षांपूर्वी जितकी वीज लागत होती तितकी आता लागत नाही. इलेक्ट्रॉनिक कचऱ्याबाबतही जनजागृती आणि विल्हेवाटीच्या योग्य यंत्रणा या दोन्हीत वाढ झालेली आहे. थोडक्यात म्हणजे विशिष्ट कामांसाठी डिजिटल वावरामुळे या शतकाच्या सुरुवातीला जितके कर्ब उत्सर्जन होत होते ते आता कमी झाले आहे. आपला भौतिक वावर कमी होऊन डिजिटल वावर वाढलेला असल्याने डिजिटल कार्बन फूटप्रिंटमध्ये वाढ झालेली दिसते; पण, त्या बदल्यात भौतिक वावराची कार्बन फूटप्रिंट कमीही झालेली आहे. अर्थात आंतरजालावर माहितीच्या साठवणीत भर पडत गेल्याने त्यासाठीची इलेक्ट्रॉनिक उपकरणांची यंत्रणा व विजेचा वापर यात वाढ झाली आहे हेही खरे. पण, माहिती साठविण्यासाठी भौतिक यंत्रणा असती तर त्यातूनही कर्ब उत्सर्जन झालेच असते. 


गेल्या दशकभरात वीजनिर्मितीत सौर व पवनऊर्जेच्या वापराचे जगभरातील प्रमाण वाढले आहे आणि पुढेही वाढतच जाईल. यामुळे विजेचे कर्ब उत्सर्जन कमी झाल्यानेही आपल्या डिजिटल कार्बन फूटप्रिंटमध्ये घट होत राहील. पण, हातात इलेक्ट्रॉनिक उपकरण व त्याद्वारे आंतरजाल सहज उपलब्ध असल्यावर फक्त कामापुरताच त्यांचा वापर होत नाही. आज जेव्हा प्रत्येक प्रौढ व्यक्ती सरासरी सात तास इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरते तेव्हा त्यातील बराच वेळ समाजमाध्यमांवरचा वावर, रील्स पाहणे, चॅटिंग इत्यादी बिनकामाच्या, केवळ मेंदू गुंगवून ठेवण्याच्या गोष्टींसाठी खर्च होतो. काही प्रमाणात मनोरंजन हीसुद्धा माणसांची गरज आहे; पण, याचे व्यसन लागले तर हे आरोग्यासाठी आणि उत्पादकतेसाठी हानिकारक ठरते. इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापराचे व्यसन ही जागतिक पातळीवरील मोठी सामाजिक समस्या बनलेली आहे व सारे देश त्यावर उपाय शोधण्यासाठी धडपडत आहेत. अलीकडेच ऑस्ट्रेलियात लहान मुलांच्या स्मार्टफोन व समाजमाध्यमांच्या वापरावर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. थोडक्यात म्हणजे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा अनावश्यक वापर वाढत गेल्यामुळे बिनकामाची डिजिटल कार्बन फूटप्रिंट वाढत चालली आहे. 


अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, २०२४ साली ‘टिकटॉक’च्या वापराची कार्बन फूटप्रिंट ग्रीस देशाच्या कार्बन फूटप्रिंटपेक्षा जास्त आहे, तर ‘यूट्युब’ आणि ‘इन्स्टाग्राम’ फार मागे नाहीत. वारंवार इलेक्ट्रॉनिक उपकरणे बदलण्याची हौस आणि बिनकामाचे आंतरजालावर वेळ घालवणे यावर नियंत्रण ठेवता आले तर डिजिटल कार्बन फूटप्रिंट कमी होण्यालाही हातभार लागेल. थोडक्यात म्हणजे डिजिटल तंत्रज्ञान वापरत राहूनही डिजिटल कार्बन फूटप्रिंट कमी ठेवणे शक्य आहे. डोळसपणे त्या दिशेने वाटचाल करीत राहायला हवी.
    pkarve@samuchit.com

Web Title: Constantly watching YouTube A big threat to the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.