शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

आता तरी हाकलाल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 06:33 IST

शाह यांनी केवळ कर्नल कुरेशी यांचाच नव्हे, तर स्वपक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाचाही अपमान केला.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत प्रसारमाध्यमांना भारतीय सेनादलांच्या कारवायांची माहिती देण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या भारतीय लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांच्या संदर्भात मध्य प्रदेशचे मंत्री कुंवर विजय शाह यांनी केलेल्या अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्याची त्यांना चांगलीच मोठी किंमत मोजावी लागत आहे आणि ते अगदी रास्त आहे. 

शाह यांनी १२ मे रोजी केलेले धार्मिक आणि लिंगभेद करणारे वक्तव्य केवळ असंवेदनशीलच नव्हते, तर भारताच्या संविधानाचा आणि सेनादलांच्या धर्मनिरपेक्ष परंपरेचा सरळसरळ अपमान करणारे होते. शाह यांनी केवळ कर्नल कुरेशी यांचाच नव्हे, तर स्वपक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाचाही अपमान केला. विदेश सचिव विक्रम मिस्री यांच्यासह पत्रकार परिषदांना संबोधित करण्यासाठी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांची निवड जाणीवपूर्वक करण्यात आली होती. त्यामागे एक निश्चित विचार, धोरण आणि पाकिस्तानसाठी गर्भित संदेश होता. ते समजण्याची कुवत आणि वकूब शाह यांच्यात नाही, हे त्यांच्या अविचारी वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच मध्य प्रदेश उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांची चांगलीच कानउघाडणी झाली आहे. 

शाह यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याची १४ मे रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली. कर्नल कुरेशी लष्करी अधिकारी असताना त्यांचा धर्म का विचारात घेतला जातो, हे देशाच्या एकात्मतेसाठी धोकादायक नाही का, असे प्रश्न न्यायालयाने सरकारला विचारले. तेवढ्यावरच न थांबता, शाह यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हे नोंदविण्याचा आदेश न्यायालयाने दिला. मंत्र्याविरुद्ध गुन्हा दाखल करायचा म्हटला की भारतीय पोलिसांचे हातपाय लटपटतातच! त्यामुळे पोलिसांनी अर्धवट प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला. परिणामी उच्च न्यायालयाने १५ मे रोजी पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली. शाह यांच्या भाषणाचा एफआयआरमध्ये समावेश नसल्यावर प्रश्न उपस्थित करीत, स्वत: चौकशीवर लक्ष ठेवू, असे न्यायालयाने बजावले. झाली तेवढी फजिती पुरे असे मानून शाह गप्प राहिले असते, तर त्यांचेच भले झाले असते; पण ते पडले मंत्री महोदय! त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन एफआयआर रद्द करण्याची मागणी केली. ती फेटाळून लावत, सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शाह यांची आणखी खरडपट्टी काढली आणि त्यांना उच्च नायायालयात जाऊन माफी मागण्याची तंबी दिली. 

शाह यांचा माफीनामा तर अधिकच निंदनीय ठरला. न्यायालयाने ठणकावून सांगितले, की सशर्त माफी मान्य नाही, माफी सच्ची आणि बिनशर्तच हवी! भारतीय जनता पक्षाने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा नारा दिला होता आणि एका महिला लष्करी अधिकाऱ्यासंदर्भात वरिष्ठ नेत्याने एवढे अपमानास्पद वक्तव्य केले, तेव्हा पक्षाने तोंडात मिठाची गुळणी धरली आहे. सध्या भाजपमध्ये बाजूला पडलेल्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी, शाह यांच्या गच्छंतीसाठी एवढा वेळ का घेतला, असा प्रश्न नेतृत्वाला केला, हे बरे झाले. 

कर्नल कुरेशींची कारकीर्द अत्यंत अभिमानास्पद आहे. लष्कराच्या आर्मी सिग्नल कॉर्प्समध्ये १९९४ मध्ये अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या कुरेशी यांनी जम्मू-काश्मीर, तसेच ईशान्य भारतात दहशतवाद विरोधी मोहिमांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांनी २००१ मध्ये लष्कराचे पहिले मोबाइल डिजिटल कम्युनिकेशन नेटवर्क विकसित केले होते. त्या २००६ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांनी फोर्स-१८ या लष्करी सरावात ४० भारतीय पथकांचे नेतृत्व केले होते. तसे कर्तृत्व गाजवणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. त्यांनी नुकतीच पत्रकार परिषदांमधून पाकिस्तानची जी पोलखोल केली, त्यामुळे तर तमाम देशवासी त्यांच्या प्रेमात पडले होते. 

एवढी उत्तुंग कामगिरी बजावलेल्या महिला अधिकाऱ्याचा केवळ धर्म बघून वक्तव्य करणाऱ्या शाह यांच्यासारख्या लोकांमुळेच पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांना भारताच्या विरोधात कोल्हेकुई करण्याची संधी मिळते. शाह यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर भाजपने लगेच त्यांची हकालपट्टी करणे अपेक्षित होते. आता न्यायालये आणि उमा भारतीकृत खरडपट्टीनंतर तरी ती होईल का? 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानBJPभाजपा