शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

भेदरलेले राईनपाडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 12:17 IST

मुले पळविणारी टोळी समजून सोलापूर जिल्ह्यातील पाच भिक्षेकऱ्यांना  जमावाने ठार करण्याचे राक्षसी क्रौर्य  ज्या गावात घडले ते राईनपाडा देशभर गाजले.

मिलिंद कुलकर्णी मुले पळविणारी टोळी समजून सोलापूर जिल्ह्यातील पाच भिक्षेकऱ्यांना  जमावाने ठार करण्याचे राक्षसी क्रौर्य  ज्या गावात घडले ते राईनपाडा देशभर गाजले.  धुळ्यापासून सुमारे ९० कि.मी.अंतरावर असलेल्या दुर्गम भागातील राईनपाडा १२ दिवसांनंतरही भेदरलेले आहे. गावातील सुमारे ३० पुरुषांना यापूर्वीच अटक झालेली आहे; तर अटकेच्या भीतीने बहुसंख्य पुरुष मंडळी गाव सोडून पळाली आहे. ५०-६० घरांचा हा पाडा १ जुलैला जसा होता, तसाच आज ‘फ्रीज’ झाल्यासारखा आहे.  घटनेच्यावेळी रस्त्यावर पडलेल्या दुचाकी तशाच आहेत. सहा आसनी रिक्षा रस्त्यात वाट अडवून उभी आहे. प्रत्येक घरात केवळ महिला, लहान मुले आहेत. कोणतेही वाहन किंवा अनोळखी माणूस गावात आला तरी भेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिले जाते. विचारपूस करायची तर भाषेची अडचण जशी येते तशी भीती आहेच.  बाहेरील माणूस म्हणजे पोलीसच अशी भीती महिला व मुलांमध्ये घर करुन बसली आहे. रस्त्यांवर शुकशुकाट कायम असतो. गायी, म्हशी, बकºया, कोंबड्या हे पशुधन बेवारशासारखं गावभर फिरत आहे. चांगला पाऊस झाल्याने भात आणि नागली लागवडीची योग्य वेळ असताना एखादा-दुसरा शेतकरी शेतात अथवा रस्त्यावर बैलजोडीसह दिसतो. 

आदिवासी प्रकल्प विभागाची शासकीय माध्यमिक आश्रमशाळा याठिकाणी आहे. ३०० विद्यार्थ्यांची निवासी तर १०० विद्यार्थ्यांची अनिवासी शिक्षणाची व्यवस्था याठिकाणी होते. लगतच्या १५-२० पाड्यांमधून आदिवासी मुले शिक्षणासाठी येतात. जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळादेखील  गावात आहे. ५५ मुलांची पटसंख्या आहे. मात्र दोन्ही ठिकाणी अनुक्रमे ७० आणि १७ मुले हजर होती. ‘त्या’ घटनेनंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये दहशतीचे वातावरण कायम आहे. आम्ही पाड्यांवर शिक्षक पाठवून समजावून सांगतो आहोत, हळूहळू पालक मुलांना पाठवू लागले आहेत, असे मुख्याध्यापक कुंवर म्हणाले. 

पोलीस दलाची व्हॅन मुख्य रस्त्यावर उभी आहे तर गावाच्या नावाच्या पाटीला पोलिसांचा सूचना फलक लावलेला आहे. १ जुलैनंतर त्या गावात झालेले हे दोन बदल...बाकी इतर पाड्यांसारखेच हे पाडे आहे. आठवड्यानंतर बससेवा सुरु झाली असली तरी प्रतिसाद कमीच आहे. रविवारी भरणारा आठवडे बाजार यावेळी भरलाच नाही. 

केंद्रीय संरक्षणराज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भुसे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार डी.एस.अहिरे, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्यासारखे वरिष्ठ मंत्री, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी याठिकाणी येऊन गेले. ज्या ग्रामपंचायत कार्यालयात पाच जणांना ठार केले; त्या खोलीला आता कुलूप आहे. दरवाजाची अगदी तळाची पाटी तुटलेली आहे; खिडक्यांची दारेही तुटलेली आहे...राक्षसीवृत्ती जागृत झालेल्या माणसांच्या क्रोैर्याच्या खुणा ती खोली अजून धारण करुन आहे...८-१० कि.मी. अंतरावर रोहोड या पाड्यात पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत दूरक्षेत्र या घटनेनंतर उभारण्यात आले आहे. एक फौजदार व चार पोलीस कर्मचारी तेथे तैनात करण्यात आले आहे. पण हे कर्मचारी सध्या आरोपींच्या शोधात फिरत आहेत.

राईनपाड्यापासून २० कि.मी.अंतरावर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्याची हद्द सुरु होते. काही आरोपींना याच तालुक्यात पकडले आहे. काही आरोपी लगतची राज्ये मध्य प्रदेश आणि गुजराथमध्ये पळाली असल्याच्या संशयामुळे पोलिसांची पथके तेथे जाऊन शोध घेत आहे. 

देश व राज्यातील प्रसारमाध्यमांमध्ये राईनपाडा एकदम चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे राष्टÑीय क्रमांक सहा वरील दहिवेल या गावापासून २० कि.मी.अंतरावरील दुर्गम भागातील या गावात दूरचित्रवाहिन्यांच्या ओबी व्हॅन, पत्रकार, छायाचित्रकारांचा राबता सुरुच आहे. काकर्दा ग्रुप ग्रामपंचायतीतील हे एक गाव; परंतु आश्रमशाळेच्या तीन मजली इमारतीमुळे एखाद्या मोठ्या गावात आल्यासारखे वाटते. सगळे आधी आश्रमशाळेत पोहोचतात. शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडे ‘त्या’ घटनेविषयी चौकशी करतात. मुले आधीच भेदरलेली आणि त्यात अशा आक्रमणामुळे पार गोंधळून जातात.  राक्षसी क्रौर्याचे समर्थन कुणीच करणार नाही; आठवडे बाजार भरला असताना जमावाकडून हे कृत्य घडलेले आहे. हल्लेखोर केवळ याच गावातील नसावे. पण त्यांची ओळख पटविणे, शोधणे, अटक करणे आणि नंतर न्यायालयात खटला चालविणे या प्रक्रियेत मोठा कालावधी लागणार आहे. पण अजाणतेपण, समूह मानसिकता, अंधश्रध्दा, अफवा याच्या परिपाकातून घडलेल्या या घटनेची शिक्षा हे गाव त्या दिवसापासूनच भोगतेय...