सहकारावरील मांड पक्की
By Admin | Updated: March 26, 2015 23:30 IST2015-03-26T23:30:59+5:302015-03-26T23:30:59+5:30
मातब्बर नेत्यांनी आपल्या ताब्यातील साखर कारखाने राखतानाच सहकारावर ठोकलेली मांड अधिक पक्की केली. राज्यातील सत्तांतरानंतर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका चर्चित ठरत आहेत.

सहकारावरील मांड पक्की
मातब्बर नेत्यांनी आपल्या ताब्यातील साखर कारखाने राखतानाच सहकारावर ठोकलेली मांड अधिक पक्की केली. राज्यातील सत्तांतरानंतर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका चर्चित ठरत आहेत.
नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक रंगतदार वळणावर आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी आपल्या ताब्यातील कारखाने राखताना, पकड अधिक मजबूत केली आहे.
राज्यातील सत्तांतरानंतर लागलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांनी नगर जिल्ह्याचे राजकारण ढवळून काढले आहे. नगरच्या सहकारावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकहाती वर्चस्व आहे. सहकारातील या वर्चस्वाला यावेळी आव्हान मिळेल, अशी चर्चा होती. मात्र या मातब्बरांनी आता ‘ताकही फुंकून पिण्याचे’ धोरण अवलंबले आहे. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी कारखान्यांवरील पर्यायाने सहकारावरील पकड अधिक घट्ट करून घेतली. लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर (प्रवरा) कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. कारखान्याच्या राजकारणात विखे कुटुंबाच्या चौथ्या पिढीचा प्रवेश चर्चित ठरला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय यांनी कारखान्याचे अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली. मात्र त्याआधी विरोधाचे आव्हान मोडून काढण्याचे कसब त्यांनी साधले. सध्या शिर्डी मतदारसंघातील राधाकृष्ण विखे पाटील यांचे राजकीय व्यवस्थापन पूर्णपणे डॉ. सुजय यांच्या ताब्यात आले आहे. कारखाना अध्यक्षपदाच्या निमित्ताने ते अधिक ठसठशीतपणे अधोरेखीत झाले.
संगमनेरमध्ये विखे यांचे राजकीय विरोधक माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना विरोधकांनी आव्हान दिले. या विरोधाला विखे यांच्याकडून फूस असल्याची चर्चाही रंगली. त्यामुळे ‘सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना’ निवडणूक बिनविरोध करण्यात अपयश आले. आव्हानाचा अंदाज असल्याने थोरातांनी कोणताही धोका न पत्करण्याचे धोरण अवलंबले. अपेक्षेप्रमाणे कारखाना थोरातांच्याच ताब्यात राहिला. मात्र त्यांना विरोधकांच्या आरोपांना सामोरे जावे लागले.
नेवासा येथील मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे राजकारण आरोप-प्रत्यारोपांनी गाजले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या ताब्यातील या कारखान्यात गडाखांना भाजपाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या आव्हानापेक्षा त्यांची भाषा आणि आरोप यांची चर्चा अधिक झाली. विधानसभेतील पराभवानंतर उत्साहात असलेल्या गडाख विरोधकांना एकही यश हाती लागले नाही. नगरच्या सहकारावरील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला आव्हान देणे सोपे नाही, हे सिद्ध झाले. आगामी काही दिवसात आप्पासाहेब राजळे यांच्या ताब्यातील तीसगावचा वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या ताब्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांच्या ताब्यातील पिंपळगाव पिसा येथील कुकडी साखर कारखाना, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांच्या ताब्यातील श्रीगोंद्याचा नागवडे सहकारी साखर कारखाना यांच्या निवडणुकांचे निकाल हाती येतील. काही कारखान्यात आव्हाने आहेत. त्यामुळे बदलांकडे सहकाराचे लक्ष असेल.
भीतीचे भूत !
विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर शैक्षणिक स्पर्धेमुळे होणाऱ्या विपरीत परिणामाचे उदाहरण याच आठवड्यात समोर आले. नगर तालुक्यातील हिंगणगाव केंद्रावर चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत भाषा विषयाचा पेपर कठीण गेल्याने घाबरलेले दोन विद्यार्थी दुसऱ्या पेपरपूर्वी गायब झाले. त्यांना शोधताना यंत्रणेची त्रेधा उडाली. भेदरलेले हे विद्यार्थी सापडले, पण त्यांनी वाढती स्पर्धा, पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा यावर प्रश्नचिन्ह लावले आहे. एवढ्या लहान वयात अपेक्षेच्या ओझ्यामुळे येणारे नैराश्य आणि भीती भावी पिढीला कोठे घेऊन जाणार आहे?
- अनंत पाटील