ऐतिहासिक तळ्याचे पाणी पुन्हा ‘चवदार’ करण्यास कटिबद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 09:52 IST2026-03-20T09:51:52+5:302026-03-20T09:52:20+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील महाडच्या चवदार तळ्याचा संघर्ष सामाजिक न्यायाचा अभूतपूर्व लढा होता. या सत्याग्रह दिनानिमित्त विशेष लेख.

ऐतिहासिक तळ्याचे पाणी पुन्हा ‘चवदार’ करण्यास कटिबद्ध
संजय शिरसाट, मंत्री, सामाजिक न्याय, महाराष्ट्र शासन -
भारतीय समाजव्यवस्थेत समानता, स्वाभिमान आणि मानवी हक्कांसाठी उभ्या राहिलेल्या चळवळींमध्ये ‘महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह’ एक ऐतिहासिक टप्पा मानला जातो. एका पाण्याच्या तळ्यावरून उभा राहिलेला हा संघर्ष केवळ जलहक्काचा नव्हता, तर तो मानवी अस्मिता आणि सामाजिक न्यायाचा लढा होता. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी नेतृत्वाखाली २० मार्च १९२७ रोजी महाड येथे झालेला हा संघर्ष केवळ पाणी पिण्यापुरता मर्यादित नव्हता, तर तो हजारो वर्षांच्या गुलामगिरीच्या शृंखला तोडून मानवी प्रतिष्ठा प्रस्थापित करण्याचा एक प्रारंभबिंदू होता. आज आपण या ऐतिहासिक घटनेच्या शताब्दी वर्षाच्या (२०२७) उंबरठ्यावर उभे असताना, राज्य शासन या स्मृतिभूमीचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध आहे.
चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांना दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या - जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा आणि विचारांमध्ये परिवर्तन घडवा. त्यांनी स्पष्ट केले होते की, विचारात परिवर्तन झाल्याशिवाय आचरणात परिवर्तन होऊ शकत नाही. अस्पृश्यांना समानतेचा हक्क नाकारला जात असताना, त्यांनी संघटित लढ्याद्वारे चवदार तळ्याचे पाणी पिऊन सामाजिक परिवर्तनाची दिशा दाखवली. त्यांच्या आंदोलनामागे स्पष्ट विचार, उदात्त उद्देश आणि संघटित कृती होती. बाबासाहेबांच्या मते, समाजपरिवर्तनासाठीचा विचार अत्यंत महत्त्वाचा असून, तोच व्यक्तीच्या आचरणाला दिशा देतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आंदोलने सामाजिक न्याय, समानता आणि जन्मसिद्ध हक्क प्रस्थापित करण्यासाठी होती. त्यांच्या लढ्याचा मुख्य उद्देश समाजातील हीनत्वाची भावना दूर करून लोकांच्या मानसिकतेत बदल घडवणे हा होता. पाणी ही निसर्गाची देणगी असून, ती सर्वांसाठी समान आहे, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. हा सत्याग्रह केवळ पाण्याचा प्रश्न नव्हता, तर तो मानवी हक्क आणि स्वाभिमानासाठीचा निर्णायक संघर्ष होता. या आंदोलनातून अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा आजही मिळते. सामाजिक न्यायमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर, मागील वर्षी २० मार्च २०२५ रोजी मी महाड येथील पवित्र चवदार तळ्याला भेट दिली होती. त्यावेळी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. अनेक अनुयायांच्या मनात एक खोल खंत होती की, ज्या तळ्याने जगाला समतेचा संदेश दिला, त्या तळ्यातील पाणी आज हिरवे पडले असून, ते पिण्यायोग्य राहिलेले नाही. त्यांच्या या तीव्र भावनांनी माझे मन हेलावून गेले. बाबासाहेबांनी ज्या पाण्यासाठी ऐतिहासिक संघर्ष केला, ते पाणी शुद्ध करून सर्वांना पुन्हा एकदा त्याच्या मूळ ‘चवदार’ स्वरूपात उपलब्ध करून देणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
पंजाबमधील अमृतसर येथील शीख धर्मीयांच्या पवित्र सुवर्ण मंदिरात अहोरात्र जलशुद्धीकरण करणारा विशेष प्रकल्प यशस्वीपणे राबविला जात आहे. त्याच धर्तीवर क्रांती आणि समतेची प्रेरणा देणारी ऊर्जाभूमी असलेल्या महाड येथील चवदार तळ्याचा कायापालट करण्याचा निर्णय आम्ही घेतला. या संकल्पपूर्तीसाठी राज्य शासनाने तावडीने पावले उचलत १८ फेब्रुवारी २०२६ रोजी शासन निर्णय (जीआर) निर्गमित करून ५५ कोटी ७९ लाख ८५ हजार ६५३ रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२६-२७ हे वर्ष ‘सामाजिक समता आणि समरसता वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. महाडच्या या भूमीला जागतिक दर्जाचे प्रेरणास्थान बनवणे, हाच शासनाचा निर्धार आहे. आज, २० मार्च २०२६ रोजी सत्याग्रहाच्या ९९व्या वर्धापनदिनी, या महत्त्वाकांक्षी जलशुद्धीकरण आणि सुशोभीकरण कामांचा खऱ्या अर्थाने शुभारंभ होत आहे. पुढील वर्षी जेव्हा आपण या सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष (२०२७) साजरे करू, तेव्हा हा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला असेल. त्या सुवर्णक्षणी चवदार तळ्याचे पाणी खरोखर ‘चवदार’ होईल आणि प्रत्येक भीमसैनिकाला ते तृप्त होऊन चाखता येईल, याची मला मनोमन खात्री आहे. राज्यातील स्मारके आणि स्मृतिस्थळांचे जतन व संवर्धन करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मात्र, केवळ स्मारके उभारणे हा उद्देश नसून, त्यातून सामाजिक समतेचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हेच आमचे खरे ध्येय आहे.