कोडगी व्यवस्था!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:34 AM2017-12-11T00:34:09+5:302017-12-11T00:59:12+5:30

शेतकरी आत्महत्या हा विषय तसा तर गत तीन दशकांपासून विदर्भाच्या पाचवीलाच पूजलेला आहे; पण गत बुधवारी वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील सोयजना येथील ज्ञानेश्वर मिसाळ या शेतक-याने केलेली आत्महत्या, हा आमच्या एकंदरच व्यवस्थेच्या कोडगेपणाचा, निर्ढावलेपणाचा उत्तम नमुना म्हणता येईल.

 Cody arrangements! | कोडगी व्यवस्था!

कोडगी व्यवस्था!

Next

शेतकरी आत्महत्या हा विषय तसा तर गत तीन दशकांपासून विदर्भाच्या पाचवीलाच पूजलेला आहे; पण गत बुधवारी वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील सोयजना येथील ज्ञानेश्वर मिसाळ या शेतक-याने केलेली आत्महत्या, हा आमच्या एकंदरच व्यवस्थेच्या कोडगेपणाचा, निर्ढावलेपणाचा उत्तम नमुना म्हणता येईल. ज्ञानेश्वर मिसाळ हे मानोरा तालुक्यात प्रगतीशील शेतकरी म्हणून ओळखल्या जात असत; मात्र गत काही वर्षात निसर्गाने लागोपाठ दिलेल्या तडाख्यांमुळे ते हतबल झाले होते. गेले वर्ष वाईट गेले, यावर्षी तरी निसर्ग साथ देईल, या आशेपोटी ते शेतीत खर्च करीत गेले आणि कर्जाचा डोंगर वाढतच गेला. बँकांव्यतिरिक्त खासगी वित्त कंपन्या व सावकारांचेही कर्ज झाले. त्याची परतफेड कशी करायची ही विवंचना त्यांना खात होती. आता मायबाप सरकारच काही तरी तोडगा काढेल, ही आशा मनाशी बाळगून त्यांनी मुंबई गाठली. तिथे मंत्रालयात समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या भेटी घेतल्या. त्यांना सगळी आपबिती कथन केली आणि आपल्यापुढे आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. दुर्दैवाने त्यानंतरही काहीही हालचाल न झाल्याने, अखेर मिसाळ यांनी आत्महत्या केली. मिसाळ यांच्या आत्महत्येने आपल्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आत्महत्येचा इशारा देणाºया प्रत्येक व्यक्तीच्या समस्यांचे समाधान सरकार करू शकत नाही, हे अगदी मान्य; मात्र किमान त्या व्यक्तीला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी तर प्रयत्न केल्या जाऊ शकतात ना? मिसाळ यांच्यासोबत मंत्रीद्वयांना भेटण्यासाठी गेलेले आत्माराम चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, असा कोणताही प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. याला व्यवस्थेचा कोडगेपणा व निर्ढावलेपणा नाही म्हणायचे तर काय म्हणायचे? सरकार या व्यवस्थेकडून सर्वप्रथम अपेक्षा असते ती संवेदनशीलतेची! राज्यकर्त्यांच्याच संवेदना बोथट झाल्या, तर जनतेने अपेक्षा तरी कुणाकडून करायची? ज्यांचे नाव घेऊन हे सरकार सत्तेत आले, कृषी कर्जमाफी योजनेला ज्यांचे नाव देण्यात आले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा किंचितसा तरी आदर्श या बाबतीत सत्ताधाºयांनी स्वत:समोर ठेवायला नको? कुठे शेतकºयाला अजिबात त्रास होता कामा नये, असे स्वत:च्या सैन्याला बजावणारा तो थोर राजा अन् कुठे अडचणीत सापडल्याने मदतीची आस बाळगून आलेल्या शेतकºयाला साधा दिलासाही न देऊ शकणारे आजचे राज्यकर्ते? राज्यकर्त्यांनी हा कोडगेपणा सोडला नाही, तर एक दिवस जनता या व्यवस्थेचेच विसर्जन करून टाकेल!

Web Title:  Cody arrangements!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.